एक काळ असा होता की, आपल्या लाडक्या संपादकाने काय लिहिले आहे हे पाहायला वाचक सकाळी उठून आपल्या वर्तमानपत्राची वाट पाहात असत. काही दर्जेदार पॅनल डिस्कशन्स अशी होत की, प्रेक्षक न चुकता त्यावेळी सगळी कामे बाजूला ठेवून टीव्हीसमोर जाऊन बसलेली दिसत. पण हल्ली काहीतरी विपरीतच घडत आहे. पारंपरिक माध्यमांची जागा मुक्त माध्यमांनी घेतली आणि हा आमूलाग्र बदल घडून आला. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी अवघे न्यूज चॅनलचे विश्व व्यापून उरलेल्या संपादकांची अवस्था ‘आता उरलो नावापुरता’ अशीच झाली आहे. वाहिन्यांमध्ये येणार्या आर्थिक संकटांनी अनेकांना बेरोजगार केले आहेच. पण बहुतांश लोकांना आता ट्विटर वगैरेंसारख्या मुक्त माध्यमांवर जगण्याची वेळ आली आहे. कधीकाळी समाजासाठी दीपस्तंभासारखे भासणारे संपादक आता ट्विटरवर सार्वजनिक निर्भर्त्सनेची सोपी टार्गेट झाले आहेत. ’सोशल मीडियावरील अमके भक्त तमके भक्त हे करीत असतात,’ असा या मंडळींचा दावा आहे. पूर्वी ज्यांच्या लेखांसाठी, विश्लेषणासाठी किंवा संदर्भासाठी अमक्या एका संपादकाला वाचले किंवा पाहिले जायचे, त्यांच्यावर आज कुणी काय टिपणी केली आहे, हे पाहायला लोक जातात. ही सगळी मंडळी केवळ मनोरंजनापुरती शिल्लक आहेत. केवळ भारतीय माध्यमांची ही स्थिती आहे, असे नाही तर अमेरिकन माध्यमांचीही स्थिती अशीच झाली आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीतही लोकांचा कौल माध्यमे ज्या दिशेने कलली होती त्याच्या बरोबर विरोधात गेला. भारतीय माध्यमांची स्थिती अशी का व्हावी याची कारणमीमांसा करायला हवी. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रबोधनाच्या भूमिकेत माध्यमे होती. स्वातंत्र्यलढ्याचे खर्या अर्थाने वहन जर कुणी केले असेल, तर ते या माध्यमांनीच. त्याकाळच्या सर्वच मोठ्या नेत्यांनी आपली वर्तमानपत्रे काढली आणि ती गाजवलीसुद्धा. टिळक, गांधी, आंबेडकर अशा सर्वच नेत्यांची वृत्तपत्रे भारतीयांसाठी दीपस्तंभाची भूमिका निभावत होती. स्वातंत्र्य मिळाले आणि देशाच्या जडणघडणीत नव्याने एक अध्याय जोडला गेला. नेहरूंनी समाजवादी मॉडेल स्वीकारले आणि नवनव्या गोष्टी भारतात आल्या. हा सगळा काळ माध्यमांनी प्रबोधनाचा म्हणून स्वीकारला. ‘माध्यम’ म्हणून बजावायला लागणार्या भूमिका या काळातही माध्यमांनी उत्तमबजावल्या. यानंतरचा भलामोठा काळ नेहरूंची स्वप्ने भंगण्याचा होता. नेहरूंच्या मृत्यूनंतरही हा तोल जातच राहिला. संवादमाध्यमातले एक प्रभावी माध्यमम्हणून ‘सिनेमा’ ओळखला जातो. अमिताभचा गाजलेला ‘अँग्री यंग मॅन’ याच काळाची निर्मिती होता. यानंतर आलेली आणीबाणी आपल्या माध्यमांना लढण्याचे एक निराळे कारण देऊन गेली. आणीबाणीनंतर मात्र माध्यमांचे विश्व पूर्णपणे बदलत गेले. यात दोन प्रकारची माध्यमे उदयास आली. काहींनी ‘लाइफ-लिजर’कडे पत्रकारिता वळविली, तर काहींनी स्वत:ला नकारात्मकतेच्या गर्तेत ढकलून दिले. मजेशीर बाब म्हणजे, ही नकारात्मकता म्हणजेच भारतीय जनमानसाची खरी भावना आहे, असे ही मंडळी मानायला लागली. या भावनेचे अस्सल उद्गाते आपणच असल्याचा साक्षात्कारही याचवेळी झाला.
रामजन्मभूमी आंदोलन हा आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा. शाहबानो प्रकरणापासून सुरू झालेली हिंदू जनमानसाच्या मनातली खदखद रामजन्मभूमी आंदोलनाच्या स्वरूपात मोकळी झाली. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या यात्रांना, शिलापूजनाच्या मोहिमांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. लाखो लोक या आंदोलनात सहभागी झाले. राममंदिराच्या निर्मितीपेक्षा या देशात मतांसाठी मुस्लिमांचे जे लांगुलचालन केले गेले त्याच्या विरोधातला हा राग होता. मात्र तत्कालीन माध्यमांनी या संपूर्ण टप्प्याचे वर्णन ’देशात वाढविला गेलेला धार्मिक उन्माद’ असे केले. भारतीय जनमानसापासून माध्यमे तुटण्याचा काळ हा इथून सुरू झाला होता. अगदी परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत माध्यमे अशीच गाफील होती. अहमदाबादचा हा चहावाला कधीच देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही, असाच ल्युटंट दिल्लीलाच देश मानणार्यांचा समज होता आणि अखेरपर्यंत तोच समज खरा मानण्यात यांनी धन्यता मानली. दिल्लीत बसून आपण देशात काय व्हावे ते ठरवू शकतो, असा या मंडळींचा समज होता. कॉंग्रेस सरकारच्या काळात सत्तेची पदे स्वत:कडे ठेऊन बाकी जागा अशा मंडळींसाठी सोडल्या होत्या. प्रामुख्याने डाव्या असलेल्या या विचारवंत पत्रकारांना आणि संपादकांना या देशाच्या मातीत काय चालू आहे हे समजले नाही. रायरेश्र्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करणार्या शिवबांपासून ते मार्सेलिसच्या समुद्रात बिनधास्तपणे उडी मारणार्या सावरकरांपर्यंत या देशात एक वेगळे काही भावविश्र्व आहे याची या नकारात्मकतेच्या गर्तेत गेलेल्यांना कधीही पर्वा नव्हती. मुळात ही पर्वाच नसल्याने परवलीच्या क्षणी हे भावविश्र्व कसा प्रतिसाद देते याचा प्रत्यय माध्यमांना आलाच नाही.
या सगळ्याच मंडळींची सद्दी आता संपल्यातच जमा आहे, कारण माध्यमांच्या जगतात मुक्त माध्यमांनी शिरकाव केला आहे आणि शिरकाव म्हणजे केवळ शिरकाव नव्हे तर जनमानसाच्या कल्पनाशक्तीलाच ताब्यात घेण्याचे काममुक्त माध्यमांनी केले आहे. माध्यमातून तयार होणारे अभिमत हे एकेकाळी माध्यमे ताब्यात असणार्याचीच मक्तेदारी होती. ही मंडळी म्हणतील तोच देशाचा कल असे. आता मात्र ही परिस्थिती पूर्ण पालटली आहे. लोकांना लिहायला, बोलायला, अभिव्यक्त व्हायला स्वतंत्र मुक्त माध्यमे उपलब्ध झाली आहेत. मत मांडण्याची अधिकृत जागा म्हणजे आज मुक्त माध्यमे होऊन बसली आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला चलनवलन प्राप्त करून देण्याची जबाबदारी उचलणार्या माध्यमांना जागतिकीकरणाचा झटका हा असा बसला आहे. ज्या गतीने माध्यमांमध्ये बदल घडून येत आहेत ते पाहाता माध्यमांचा रोख पुढच्या काळात काय असेल, हे सांगणे खरोखरच मुश्कील असेल. दिशा देणार्या, संपादन करणार्या संपादकांची गरज खरोखर असेल का? हाही एक प्रश्नच आहे. मजकुराचे संपादन करून देणारे संपादक मानले जातील की अधिकाधिक लोकांना त्यांच्या प्रतिमानिर्मितीच्या गरजेला अधिकाधिक प्रमाणात स्थान उपलब्ध करून देणारे माध्यमातले नेते असतील, या प्रश्नांची उत्तरे माध्यमात कामकरणार्यांना शोधावी लागतील. ‘व्होट फॉर कॅश’ या दिल्लीत गाजलेल्या नोटाकांडात ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून पुढे आलेल्यांनाच तिहारच्या तुरुंगात जावे लागले होते. दिल्लीतील ज्या उच्चभ्रू चॅनलला त्या व्यक्तीने मोठ्या विश्वासाने या सगळ्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सोबत घेतले होते, त्यांनी ऐनवेळी ती वृत्तेच प्रसारित केली नाहीत. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून दिल्या गेलेल्या मोठ्या रकमेची मोठी चर्चा रंगली होती. माध्यमांनी विश्र्वासार्हता गमावण्यासाठी त्यांचा अंदाज चुकणे जसे घातक आहे, तसेच अशा प्रसंगी त्यांनी केलेली बेईमानीही कारणीभूत आहे. या सगळ्या घुसळणीनंतर आज भारतातलीच नव्हे, तर जगभरातील माध्यमे एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहेत. पूर्वी ’आम्ही छापू तेच खरे’ या भूमिकेतून अधिकाधिक लोकांना आपल्या माध्यमात सामील करून घेण्याचे कौशल्य माध्यमात कामकरणार्यांना करावे लागले. आपले तेच लोकांवर लादण्याचे दिवस गेले आहेत. पुढचा हा प्रवास निश्र्चितच सोपा नसेल. माध्यमक्षेत्रात घडणार्या या समुद्रमंथनाने अनेकांना बाहेर फेकून दिले आहे. विचारसरण्यांनाही आपले स्वरूप बदलून अधिकाधिक सर्वसमावेशक व्हावे लागेल. ज्या गतीने तंत्रज्ञान बदलते आहे, त्या गतीने माध्यमांनी बदलणेही गरजेचे असेल.
- किरण शेलार