
वर्ष २०१६ आता संपत आलं आहे. कॅलेंडरवर शेवटचा महीना बघितला की, आठवण होते ती नवीन वर्षाच्या कँलेंडरची. कधी विचार केला आहे की, कॅलेंडर नसेल तर आपलं आयुष्य कसं असेल? विचार करणं ही शक्य नाही. आणि कॅलेंडर म्हटले की पहिले नाव डोळ्यासमोर येते ते कालनिर्णय. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या सर्वांच्याच घरांमध्ये भिंतीवर कालनिर्णय असतंच. आता तर आपल्या मोबाईल मध्ये आणि कारमध्येही असतं. कालनिर्णय आणि आपलं नातं खूप जुनं आहे. अगदी १९७३ पासूनचं.
काही जाहीरातींची आपल्या आयुष्यात एक मोठी भूमिका असते नाही. जुन्या जाहीरातींचे बोल कानावर पडले की त्यावेळच्या सगळ्या आठवणी (बरेचदा त्या जाहीरातीशी निगडित नसलेल्याही) ताज्या होतात. कधी कधीतर १५ वर्षांआधी ही जाहीरात टी.व्ही वर दाखवत असताना मी काय करत होतो/होते हे ही आठवतं... अशीच एक जाहीरात म्हणजे 'कालनिर्णय' या कॅलेंडरची. कालनिर्णय म्हटलं त्याची टॅगलाईन, 'भिंतीवरी कालनिर्णय असावे' हे आपसुकच तोंडात येतं.
कालनिर्णयमधील साहित्य, त्यातील पंचांग, अगदी विविध पदार्थांच्या रेसिपीपासून ते आरोग्यासाठी असलेल्या विविध योगासनांच्या माहितीपर्यंत सगळंच असायचं, म्हणजे अजूनही असतं. तसं पाहिल्या गेलं तर कालनिर्णय म्हणजे केवळ एक कॅलेंडर. पण त्याकाळी संपूर्ण महाराष्ट्रात या कॅलेंडरच्या जाहिराती गाजल्या. त्याचे कारण कदाचित त्यामध्ये असलेले दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी, मच्छींद्र कांबळी, वर्षा उजगांवकर, रेणुका शहाणे यांच्या सारखे दिग्गज अभिनेते, आणि अभिनेत्र्या असतील, किंवा तुमच्या आमच्या सारख्यांच्या रोजच्या आयुष्यात डोकावणाऱ्या त्या जाहीराती असतील, किंवा त्या जाहीरातींचे विशिष्ट बोल आणि चाल असेल, मात्र कालनिर्णयच्या जाहिराती देशभरात प्रसिद्ध झाल्या आणि आता तर त्याच्याशिवाय नवीन वर्षाची सुरुवात होणे शक्यच नाही.
लहानपणी मित्र मैत्रीणीं कट्ट्यावर जमले की त्यांच्यात कालनिर्णयचं गाणं कोण जास्त छान म्हणू शकेल अशी स्पर्धा व्हायची. आणि सगळे एक सुरात ते गाणं म्हणायचे. कालनिर्णयच्या जाहिरातींसोबत महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या अनेक लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. आजही ते समोर आले की त्या आठवणी ताज्या होतात.
एखाद्या वस्तुच्या विक्रीचा प्रतिसाद त्याच्या सादरीकरणावरून ठरतो. एखाद्या साध्याशा वस्तुचे प्रस्तुतीकरण योग्य असेल तर त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होवू शकते, तर एखादी वस्तु उत्तम असेल, मात्र त्याचे प्रस्तुतीकरण योग्य नसेल तर काहीही केलं तरी त्याची विक्री होणार नाही. जाहिरातींनी हेच सिद्ध केले आहे. आम्ही सहज गप्पा मारत असताना एक मैत्रीण म्हणाली, "एखाद्या कॅलेंडरची इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यामागे त्याच्या जाहीराती यशस्वी करण्यासाठी घेतलेली मेहनत आहे. आणि या कालनिर्णयच्या जाहीरातींमधून ते दिसून येतं." त्यावर लगेच एक मित्र म्हणाला की, "अगं पण त्यासाठी वस्तु पण तितकीच उच्च दर्ज्याची असणं आवश्यक आहे." खरंय कालनिर्णयनं या दोन्हीची उत्तम सांगड घातली आहे.
आजही आमच्या पिढीतील मुलं मुली विदेशात जाताना आपल्या सोबत कालनिर्णय नक्की घेवून जातात. सामान्य माणसाच्या घरात कालनिर्णय म्हणजे एक परंपरा आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर ९ भारतीय भाषांमध्ये ते प्रसिद्ध झां आहे विविध भाषी लोकही कालनिर्णयाशी जोडले गेले आहेत. तसंच याची स्थानिक आवृत्ती निघाल्यामुळे स्थानिक पंचांगाचा लाभ स्थानिक नागरिकांना घेता येतो.
कालनिर्णय ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. आज जरी ते भिंतीवरुन मोबाईलच्या अॅप वर आलं असलं तरीही आजही भिंतीवर कालनिर्णय हे लागतंच. तसं पाहिल्या गेलं तर ते आधीपासूनच खूप आधुनिक होतं. मात्र आधुनिकतेसह परंपरा जपण्याचं कामंही कालनिर्णयनं चोख केलं आहे. आधी मुलगी सासरी गेली कि तिची आई 'माँ की देन' म्हणून कालनिर्णय पाठवत असत, मात्र आज मुलगी विदेशात शिकायला जाताना आई तिच्या सोबत कालनिर्णय देते. पद्धत बदलली असली तरी नातं आणि भआवना त्याच आहेत. एकूण काय तर कालनिर्णय आता केवळ एक कॅलेंडर न राहता आपल्या घरातली परंपरा आणि संस्कृती झालं आहे, आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनलं आहे. वर्षानुवर्षाची ही परंपरा काळानुरूप नवीन रुप जरी धारण करत गेली तरी त्या परंपरेची जागा आपल्या आयु्ष्यात तशीच असणार हे नक्की.