
जग किती पटपट बदलतं नाही? काही काळाआधी केवळ टेक्स्ट मॅसेजेस करता यायचे आणि आज व्हॉट्सअॅप वरुन फोटो, व्हिडियो पाठवणं इतकचं काय तर व्हिडियो कॉल पण करता येतो. आपल्या टी.व्ही. वर येणाऱ्या मालिकांचं पण तसंच आहे. जेंव्हा दूरदर्शन नवीन आलं होतं, तेंव्हा तर माझा जन्मही झाला नव्हता, मात्र मी लहान असताना बघितलेल्या मालिका आणि आताच्या मालिकांमध्ये खूप फरक जाणवतो. काही अशाच मालिका आहेत, ज्या तुमच्या, माझ्या आणि सगळ्यांच्याच मनाला भिडलेल्या आहेत. आजही त्या मालिकांचा विषय निघाला की, आपल्या मनात त्या मालिकेची एक ना एक आठवण ताजी होतेच. आणि मग त्या जुन्या मालिकांच्या विश्वात आपण हरवून जातो. चला तर मग आजही एक चक्कर मारुया त्याच जुन्या मालिकांच्या विश्वात..
१. ये जो है जिंदगी :
शरद जोशी यांनी लिहिलेली आणि कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका. आजही गूगल वर या मालिकेचे एपिसोड्स अनेक लोक शोधत असतात. १९८४ मध्ये आलेल्या या मालिकेने अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावले. मालिकेच्या नावाप्रमाणेच आयुष्यातल्या छोट्या छोट्या गमती जमती दाखवत "हेच ते आयुष्य" असं सांगणारी ही मालिका आहे. शफी इनामदार, स्वरूप संपत, सतीश शहा, टीकू तंसानिया, राकेश बेदी यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांनी या मालिकेत काम केले आहे. उत्तम दर्ज्याचा अभिनय, उत्तम संवाद आणि उत्तम दिग्दर्शन याची सांगड घालणारी ही मालिका आजही सर्व प्रेक्षकांच्या मनात जीवंत आहे.
२. मालगुडी डेज : प्रसिद्ध लेखक आर.के. नारायण यांच्या कथांवर आधारित, कदाचित आतापर्यंतच्या दूरदर्शनच्या इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध मालिका. म्हणजेच मालगुडी डेज. १९८६ मध्ये ही मालिका पहिल्यांदा दूरदर्शनवर आली. त्याची विशेष ट्यून तानाना ताना नाना ना.. आजही कितीतरी लोकांची रिंगटोन आहे. कन्नड दिग्दर्शक आणि अभिनेता शंकर नाग यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. आर.के नारायण यांचे भाऊ आणि कॉमन मॅनचे जनक आर.के. लक्ष्मण यांनी या मालिकेसाठी कार्टून डिझाइन केले, जे आजही प्रसिद्ध आहेत. हरीश पटेल, अनंत नाग, देवेन भोजानी सारख्या दिग्गज कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. गावाची पार्श्वभूमी, ग्रामीण वातावरण, सामान्य मनुष्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सामान्य घटना, हे सर्व या मालिकेत दिसून येतं. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही मालिका. ही मालिका हिंदी, तामिळ, तेलगू आणि मलयाळम भाषेत प्रदर्शित करण्यात आली. मालगुडी डेज म्हटले की आजही चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू नक्कीच येतं.
३. नुक्कड : सुमारे १९८६-८७ च्या काळात दूरदर्शन वर अनेक मालिका गाजल्या. नुक्कड देखील त्यातीलच एक. निम्नमध्यमवर्गीय परिवाराच्या रोजच्या आयुष्यातील ही कहाणी. प्रबोध जोशी यांच्या सारख्या दिग्गज लेखकाचे लेखन आणि कुंदन शहा आणि सईद अख्तर मिर्जा यांच्या सारखे मोठे दिग्दर्शक, तसेच दिलीप धवन, रमा विज, संगीता नाईक, अवतार गिल यांच्या सारख्या दिग्गज अभिनेत्यांचा अभिनय. यामुळे ही मालिका खूप प्रसिद्ध झाली. ४० एपिससोड्सच्या या मालिकेतील खोपडी, कादिर भाई, घंशू भिकारी हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
४. तू तू मैं-मैं : या मालिकेला कोण विसरू शकेल. आजच्या सास-बहू ड्रामा मालिकांच्या किती तरी आधी सासू आणि सुनेच्या नात्यावर अत्यंत सुंदर पद्धतीने प्रकाश पाडणारी ही मालिका. १९९५ मध्ये पहिल्यांदा ही मालिका प्रदर्शित करण्यात आली. सासू आणि सून कितीही भांडल्या तरी त्यांच्यातील प्रेम, घरातील सासऱ्याची आणि नवऱ्याची 'बिच्चारी' असलेली भूमिका आणि रीमा लागू, सुप्रिया पिळगावकर, महेश ठाकुर, कुलदीप पवार यांचा सुंदर अभिनय. साध्या सुध्या घरतील सासू सुनेच्या या कथेने प्रेक्षकांना वेड लावले होते. आजच्या वेब सीरीयल्स सारखेच या मालिकेचा ही प्रत्येक भाग वेगळ्या कथेवर आधारिक असायचा. प्रत्येका बाबतील तू तू मैं मैं आणि नंनर 'हुँह' करणाऱ्या देवकी आणि राधाला आपले प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत.
५. हम पाँच :
अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेली ही हम पाँच मालिका म्हटले की या मालिकेतील घर, टपोरी काजल भाई, नाचत नाचत दार उघडणारी स्वीटी, अतिहुशार छोटी, ताईगिरी करणारी मीनाक्षी, राधिकेच्या भूमिकेतील विद्या बालन आणि फोटोतून बोलणारी या पाचही बहिणींची आई हेच डोळ्यापुढे येतं. तुमच्या आमच्या सारख्या घरातील ही कहाणी. ही मालिका सर्वप्रथम १९९५ मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. पाच वेग वेगळ्या स्वभावाच्या मुलींचा बाप अशोक सराफ. आपल्या दिवंगत बायको प्रिया तेंडुलकर आणि आताची बायको शोमा आनंद यांच्यात पूर्णपणे फसलेल्या अशोक सराफला बघून आपसुकच हसु येतं. ही मालिका आजही प्रेक्षकांच्या डोळ्यापुढे जशीच्या तशी उभी आहे.
६. हिप हिप हुर्रे : १९९८ मध्ये किशोरवयीन मुलांच्या आयुष्यावर प्रकाश पाडणारी ही मालिका. ते ही अगदी त्यांच्याच भाषेत. इयत्ता १२वीतील मुलांच्या शाळेची ही कहाणी. या कहाणीत मित्र मैत्रीणींचा ग्रुप आहे, मैत्री आहे, प्रेम आहे, भावना आहेत, आणि त्या वयाच्या मुलांना अगदी आपलीशी वाटतील अशी पात्रं आहेत. डेटिंग, ड्र्ग्स, करिअर ते मैत्री पर्यंत सगळे फ्लेवर या मालिकेत होते. मालिकेतील मोना, बेला, राघव, मीरा, सायरस, मझहर, रफी, अलीशा, मेहुल, समँथा, प्रतीशा, किरन, जॉन, पूरब, नोनी हे सर्व पात्र आजही आपल्याला आठवतात. पूरब कोहली, श्वेता साळवे, शब्बीर आहलुवालिया, विशाल मल्होत्रा यांच्या सारखे अभिनेते दूरदर्शन सृष्टीला या मालिकेमुळे मिळाले. किशोरवयीन मुलांच्या आयुष्याला आजही रिलेट करेल अशी ही मालिका आहे.
७. साराभाई वर्सेस साराभाई : जवळ जवळ १० वर्षांपूर्वी आलेली ही मालिका आमच्या जनरेशनची आजही लाडकी मालिका आहे. यूट्यूब आणि गूगल वर सर्वाधिक सर्च केली गेलेली ही मालिका. मी तर या मालिकेला 'स्ट्रेस बस्टर' असे नाव दिले आहे. एक उच्च दर्ज्याचा विनोद, ज्यामध्ये अश्लीलता नाही, कुणाची मानहानि नाही, तरीही खळखळून हसवणारी ही मालिका आजच्या मालिकांपेक्षा आणि कॉमेडी शोज पेक्षा कितीतरी पटीने जास्त मनाला भिडते. हाय सोसायटी सासू माया साराभई (रत्ना पाठक शहा), तिचा मस्तीखोर वेंधळा आणि इरिटेटिंग नवरा इंद्रवदन साराभाई (सतीश शहा), मिडिल क्लास सून मोनीशा साराभाई (रुपाली गांगुली), मम्माज बॉय रोसेश साराभाई (राजेश कुमार), या सगळ्यांमध्ये धर्मसंकटात अडकलेला मोठा मुलगा साहिल साराभाई (सुमीत राघवन) टेक्नोप्रेमी आणि प्रचंड आत्मविश्वास असलेला बावळट जावई दुष्यंत (देवेन भोजानी), आणि ठार बहिरे हैं हैं करणारे मधुसूदन फूफा हे सगळे अगदी आपले जवळचे नातेवाईक वाटायला लागतात. साराभाई म्हटले की रोसेशच्या डेडली कविता, माया चं 'इट्स सो मिडिलक्लास' असं बोलणं, मोनीशाच्या चुकांची लिस्ट वाचून दाखवणं हेच आठवतं. ही मालिका पुन्हा त्याच कलाकारांसोबत सुरु व्हावी अशी सगळ्याच चाहत्यांची इच्छा आहे.