पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर अनेक त्रास सहन करावे लागत असतानाही, सर्वसामान्य लोकांनी त्याचे स्वागत केले. हा त्रास अजूनही कमी झालेला आहे असे नाही. परंतु, ज्या राक्षसाला ‘कोणी मारू शकेल’ असे लोकांना वाटत नव्हते, त्या राक्षसाला ‘कोणी तरी मारले’ या आनंदात लोक हा त्रास सहन करायला तयार झाले आहेत. सध्या लोकांना नोटांचा तुटवडा असल्याचा त्रास जाणवत आहे. या टंचाईला तोंड देण्यासाठी अनेकांनी रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहाराचा आश्रय घेतला. सर्वसामान्य स्थितीत ज्या तांत्रिक सुविधा चहावाला किंवा भाजीपालावाले यांच्यापर्यंत पोहोचायला अनेक वर्षे लागली असती, त्या सुविधांचा त्यांनी काही दिवसांतच स्वीकार केला. यामुळेही नोटांच्या चणचणीमुळे निर्माण झालेला तणाव कमी होण्यास मदत झालेली आहे. परंतु, हे तात्कालिक परिणाम आहेत. याचे नेमके दीर्घकालीन परिणाम कसे होतील, याचे चित्र पुरेसे स्पष्ट झालेले नाही. या स्थितीत तुलना करायची असेल, तर कृष्ण आणि बलरामयांनी केलेल्या कंस वधाशी करता येईल.
अत्याचारी व बलशाली कंसाचा वध होऊ शकेल, असे त्याच्या भीतीच्या छायेत वावरणार्या मथुरावासीयांना कधी वाटले नव्हते. परंतु, कृष्ण आणि बलरामयांनी ते घडवून आणल्यानंतर स्वाभाविकच मथुरा आनंदित झाली. परंतु, कंसवध हा पुढच्या घडामोडींचा पहिला भाग होता. कंसाचा वध झाल्यानंतर त्याचा सासरा जरासंध संतापला आणि त्याने मथुरेवर आक्रमण सुरू केले. जरासंधाच्या प्रबळ शक्तीपुढे मथुरेचा निभाव लागणे कठीण होते. त्यामुळे जे लोक कंसाच्या वधाने आनंदित झाले होते, तेच लोक कृष्ण आणि बलरामयांच्यावर आपल्याला संकटात टाकल्याबद्दल टीका करू लागले. कंसाला मारले, तेव्हा कृष्ण आणि बलरामयांची वाढलेली लोकप्रियता सहन न झाल्याने अस्वस्थ झालेला एक वर्ग होताच. प्रत्येक समाजात असा वर्ग असतोच. ही परंपरा पार रामाच्या वेळच्या धोब्यापर्यंत जाते. रामाने रावणावर मिळविलेला विजय, अयोध्येत सुरू असलेला राज्यरोहणाचा आनंद अशा लोकांना रावणाच्या अटकेत असलेल्या सीतेच्या चारित्र्याची काळजी अधिक. तीच परंपरा आजची प्रसारमाध्यमे चालवीत आहेत. जरासंधाचे आक्रमण सुरू झाल्याने अशा लोकांचा आवाज मोठामोठा होऊ लागला आणि ‘आपण हे घडणार असे केव्हापासूनच सांगत होतो,’ असा त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. त्यातच मथुरेच्या दुसर्या बाजूने कालवयन याने आक्रमण केल्याची बातमी आली आणि ती टीका आणि निंदा अधिक धारदार होण्यास सुरुवात झाली. कृष्णासमोर आपले जीवनध्येय स्पष्ट असल्यामुळे मथुरेची कायमची असुरक्षितता हा त्याच्या चिंतेचा विषय होताच. त्यामुळे कृष्ण आणि बलरामयांनी मथुरावासीयांसाठी द्वारकेची निवड केली होती. द्वारका हे उत्तमबंदर असल्यामुळे कृषी आणि व्यापार या दोन्हींसाठी ते चांगले केंद्र होते. त्यामुळे कालवयन आणि जरासंध यांच्या भीतीने मथुरावासीयांनी द्वारकेचा आश्रय घेतला असला, तरी नंतर तेथेच आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी द्वारका संपन्न केली. मथुरेचा कृष्ण नंतर ‘द्वारकाधीश’ म्हणून ओळखला जाऊ लागला. अडचणींचा आणि संकटांचा बाऊ न करता त्यांना योग्य तर्हेने हाताळले, तर काय होऊ शकते, हे यादवांनी द्वारकेत करून दाखविले. द्वारकेत यादव सुरक्षित झाले आणि कृष्ण अखिल भारतीय राजकारण करायला मोकळा झाला.
नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे, अर्थव्यवस्थेचा संकोच होईल, अशा अनेक भीती व्यक्त केल्या जात आहेत. तार्किकदृष्ट्या पाहिले, तर त्या चुकीच्याही नाहीत. परंतु, पुष्कळदा अडचणी कोणत्या आहेत यांचा विचार करण्यापेक्षा त्यातून निर्माण होणार्या संधी कोणत्या आहेत, याचा विचार करणारी माणसेच जगाला नव्या दिशेने घेऊन जात असतात. नोटाबंदीतून आलेल्या अडचणीमुळे लोक एका नव्या मानसिकतेत आणि भावविश्वात गेले आहेत. रोकडविरहित अर्थव्यवस्था आपल्या जीवनाचा भाग नाही, असे त्यांनी गृहीत धरले होते. त्यांच्या मनाची अशी व्यवस्था आपण यशस्वीपणे हाताळू शकतो, असा विश्वास आता निर्माण झालेला आहे. त्या विश्वासाला व्यावहारिक स्तरावर यशस्वी कसे करता येईल, हा प्रश्न आहे. हे जर यशस्वीपणे करता आले, तर या संकटात एका नव्या क्रांतीचा जन्म होईल. केवळ या शक्यतेनेही अनेक मोदीविरोधक अस्वस्थ झाले आहेत. युरोपात आणि अमेरिकेत रोकडविरहित अर्थव्यवस्था असूनही तेथे काळा पैसा कोठे कमी झाला आहे? अशासारखे प्रश्न आता ते विचारत आहेत. जणू काही अशी एखादी व्यवस्था म्हणजे एक जादूची कांडी असते आणि तिने ते प्रश्न सुटतात अशी समजूत करून देऊन ते लिखाण करीत असतात. अशा एखाद्या धोरणामुळे अथवा व्यवस्थेने कोणताही प्रश्न सुटत नसतो. त्या प्रश्नाच्या निराकरणाच्या शक्यता त्यामुळे किती वाढतात, याचा विचार करायचा असतो. केवळ अर्थव्यवस्था रोकडविरहित झाली, म्हणून सर्व प्रश्न सुटणार नाहीत. अर्थव्यवस्थेचा आकार वाढून त्यात उद्योगाच्या आणि रोजगाराच्या संधी कशा वाढतील, याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे उद्योग आणि कोणत्या प्रकारचे रोजगार वाढतात असाही प्रश्न आहे. रोजगार जसे समाजाच्या मूलभूत गरजा भागविणार्या क्षेत्रामध्ये वाढू शकतात, तसेच ते समाज उद्ध्वस्त करणार्या, व्यसने आणि जुगार अशासारख्या क्षेत्रांमध्येही वाढू शकतात. काळा पैसा हे अनेक वेळा अतिरिक्त धन असते आणि ते अशा प्रकारच्या उद्योगांना आणि क्षेत्रांना आर्थिक रसद पुरवीत असते. समाजातील तशाच प्रकारच्या प्रवृत्ती प्रभावी बनत जातात. लोकांचा काळ्या पैशावरील राग या अनुभवातूनही आलेला आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करून सरकारने अर्थव्यवस्थेची सूत्रे खर्या अर्थाने आपल्या हाती घेतली आहेत. त्याची भविष्यातील दिशा कशी असेल, यावर भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. यातून सरकारच्या हाती अनेक प्रकारांनी जे आर्थिक स्रोत येतील, त्याचा उपयोग सर्वसामान्य व्यक्तीचे जीवनमान सुधारण्याकडे केला गेला, त्या क्षेत्रातील गुंतवणूक वाढविली, त्या गुंतवणुकीतून त्या क्षेत्रातील उद्योग वाढले, तिथले रोजगार वाढले, तर भारताची केवळ अर्थव्यवस्थाच नव्हे, तर समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थाही वेगळे वळण घेईल.
अमाप संपत्तीच्या जोरावर आपल्याभोवती जो कार्यकर्त्यांची फौज बाळगू शकतो, तो राजकीय नेता अशी आज राजकारणाची अवस्था झालेली आहे. अशा राजकीय नेत्यांना सामाजिक विकासाचे, सांस्कृतिक प्रगतीचे भानही नसते आणि जाणही नसते. अशा पैशाचा ओघ कमी झाला, तर या पैशाच्या आधारावर पोसली गेलेली राजकीय संस्कृती नष्ट व्हायला सुरुवात होईल आणि त्यातून सामाजिक विकासाची आणि संस्कृतीची अधिक चांगली जाण असलेले लोक राजकारणात येण्यासारखे वातावरण तयार होईल. केवळ दुधाचा व्यवसाय करणारे मथुरावासी नंतर द्वारकावासी होऊन संपन्न झाले, तसे हे परिवर्तन असेल. त्यामुळे खर्या अर्थाने भारत आज परिवर्तनाच्या तिठ्यावर उभा आहे. यापैकी एक रस्ता हा अर्थव्यवस्थेचा संकोच करून तिच्यावर नकारात्मक परिणामकरणारा ठरणारा आहे, तर दुसरा रस्ता काही दिवसांनी आहे, त्याच कथेची नव्या स्वरूपात पुनरावृत्ती करणारा आहे आणि तिसरा रस्ता प्रचलित व्यवस्थेची सर्वंकष चौकट बदलणारा आहे. त्यापैकी कोणत्या मार्गावर आपली वाटचाल असेल, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. त्यामुळेच जगातील प्रत्येक घटनेवर आपण भाष्य केलेच पाहिजे, अशा उत्साही मंडळींव्यतिरिक्त इतर समंजस मंडळी स्थिती अधिक स्पष्ट होण्याची वाट पाहत आहेत.
-दिलीप करंबेळकर