“केतू, काय गाढवासारखा लोळत पडला आहेस, उठ! काहीतरी कर!”
“नुसतच लोळत नाहीये कायी! वाचन आणि लेखन करत आहे मी!”, आळोखे पिळोखे देत केतन म्हणाला.
“पांडुरंगा! कसले दिवस दाखवतोस रे बाबा! राजकुमार केतू, What’s App वर वेळ घालवणे म्हणजे वाचन आणि लेखन? आज माझ्या ज्ञानात नवीन भर पडली हो!”, आजी हात जोडून म्हणाली!
“अग आजी, असं काय करतेस? २५ वेगवेगळे ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुपवर पाहायला लागते काय चालले आहे ते. शिवाय आणि बाकीच्यांना पण काय काय सांगायचे असते, ते personal chat वर सांगायला लागते!” केतनने समजावून सांगितले.
“अरे पण तास अन् तास? सकाळ, दुपार, संध्याकाळ, डोस prescribe केल्याय का? नाश्त्याच्या आधी ८९ मिनिटे, जेवणानंतर ३८ मिनिटे, अभ्यास करतांना दर ६ मिनिटांनी ३ मिनिटे, आणि रात्री घरात सामसूम झाली की झोप लागेपर्यंत! भेटवच तुमचा डॉक्टर कोण आहे ते! अरे किती गोष्टी करण्यासारख्या आहेत! अभ्यासच कर असे नाही, काहीतरी छंद जोपासावा, चांगली पुस्तके वाचावी, घरातली काही कामे करावीत, गाडी पुसावी, मित्रांबरोबर खेळावं, फिरून यावे!
“मोठ्या लोकांची चरित्रे पहिली, किंवा अगदी आजूबाजूच्या चार मोठ्या लोकांकडे पहिले तरी कळते – की ते आपला प्रत्येक क्षण जपून वापरतात. आपले ध्येय ठरवून, ध्येयासाठी झिजतात! जनसेवा असेल, वैद्यकीय सेवा असेल, शिकवत असतील, शिकत असतील, संशोधन करत असतील ... जो काही व्यवसाय करत असतील त्यासाठी ते फार कष्ट करतात! आणि जे असे करतात त्यांना यश आणि कीर्ती मिळते!”आयुष्य वेचती जीवे .
ज्ञानेश्वर म्हणतात – अर्जुना! खूप कष्ट घेऊन, सायास करून लोक आपले जीवन वेचतात. आणि आपली कीर्ती वाढवतात! आपल्या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी, एक एक क्षण वेचतात.
लोक सायास करूनि बहूते | वेचिति अपुली जीविते |
परि वाढविती कीर्तीते | धनुर्धरा || २.२०८ ||
-दिपाली पादवदकर