
चित्रपट म्हणजे अनेक लोकांचा वीकपॉईंट. एखादा नवीन चित्रपट आला रे आला की तो बघायचाच असेही काही लोकांचे असते. मात्र बरेचदा नेहमीच्या बॉलिवुड सिनेमापेक्षा लघुपट बघणे प्रेक्षकांना आवडते. असेच काही उत्तम लघुपट गेल्या दोन वर्षात आले आहेत. वेळ काढून आवर्जून बघावे असे हे लघुपट आहेत. उत्तम दिग्दर्शन, उत्तम लेखन आणि उत्तम अभिनय याची सांगड घालणारे हे लघुपट आहेत.
१. कृती :
शिरीष कुंदर यांचे उत्तम दिग्दर्शन असलेल्या या लघुपटात रहस्य आहे, कथा आहे, आणि उत्तम अभिनय आहे. मानसिक रुग्णाबद्दल असलेल्या या कथेत मनोज वाजपेयी, राधिका आपटे आणि नेहा शर्मा यांनी मुख्य भूमिकेत काम केले आहे. २२ जून २०१६ ला प्रदर्शित झालेल्या या लघुपटाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.
२. नयनताराज नेकलेस :
दोन मैत्रिणींची ही कहाणी. एक उच्चभ्रू आणि दूसरी मध्यमवर्गीय. मध्यमवर्गीय स्त्रीच्या मनात आपल्या उच्चभ्रू मैत्रीणीला बघून उद्भवणारी स्वप्नं आणि तिच्या सल्ल्यावर तिने स्वत:मध्ये केलेल्या बदलावर ही कहाणी आहे. पण या कहाणीचा शेवट खूपच अनपेक्षित आहे. जयदीप सरकार या लघुपटाचे निर्देशक आहेत तर कोंकणा सेन शर्मा आणि तिलोत्तमा शोमे यांनी या लघुपटात मुख्यभूमिकेत काम केले आहे.
३. अहल्या :
रामायणातील अहिल्येची कहाणी कोणाकोणाला आठलते? तशीच ही कहाणी पण त्यात आहेत बरेच ट्विस्ट आणि टर्न. सुजॉय घोष यांच्या सारख्या दिग्गज दिग्दर्शकाची ही कहाणी. यामध्ये दिग्गज अभिनेता सौमित्र चटर्जी, राधिका आपटे आणि तोता राय चौधरी हे मुख्य भूमिकेत आहेत. दर वेळी श्री साधु यांच्या घरी कोणी आले की त्यांच्या इथे असलेल्या सुंदर बाहुल्यांविषयी कुतुहल निर्माण होतं. कुणीही आलं की यातील एक बाहुली पडतेच. पण त्या बाहुल्यांमागे काय रहस्य आहे. दर वेळेला एक बाहुली का पडते? जाणून घेण्यासाठी बघा अहल्या.
४. इंटीरिअर कॅफे नाईट : प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि शेरनाझ पटेल यांचा उत्कृष्ट अभिनय आणि अधिराज बोस यांचे सुंदर दिग्दर्शन असलेले लघुपट म्हणजे इंटीरिअर कॅफे नाईट. भूतकाळात विरह झालेल्या एका जोडप्याची ही कहाणी. भावना, अधीरता आणि हरवलेलं नातं परत मिळवण्यासाठी केलेली धडपड हे सगळं या लघुपटात दिसून येतं.