"पूजाताई! तू सांगितलेल्या सगळ्या विज्ञानाच्या गोष्टी शाळेत सांगून झाल्या! आता मला नवीन गोष्ट सांग!" पूजाने घरात पाय ठेवल्या बरोबर सागरने आपली मागणी पुढे केली!
"सांगेन की!”, पूजाचा छोट्या मावस भावावर फार जीव. त्याच्यासाठी आणलेले चॉकलेट त्याला देऊन, पूजा हात पाय धुवून आली. “तुला ज्ञानेश्वरीतली वैज्ञानिक संकल्पना सांगायची ना?”
“तर त्यासाठी आपल्याला जायचे आहे १२९० सालात. तेंव्हा महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, दक्षिण मध्य प्रदेश व दक्षिण गुजरात या भागात यादव साम्राज्य पसरले होते. त्यांची राजधानी होती – देवगिरी. समृद्धी आणि ऐश्वर्याने नटलेल्या महाराष्ट्रातून सोन्याचा धूर निघत होता! काव्य, शास्त्र, गणित, स्थापत्य, गायन, वादन आदी कला भरभराटीस आल्या होत्या!
“यादव राजा रामदेव राय राज्य करत असतांनाचा हा काळ. प्रवरा नदीच्या काठावरील नेवासे या गावी, ज्ञानेश्वर गीतार्थ सांगत होते.
“ज्ञानदेवांनी संस्कृत गीता मराठीत आणली. सर्वसामान्य माणसाला अर्थ कळवा म्हणून माहितीतली उदाहरणे देऊन अवघड संकल्पना समजावून दिल्या. त्या उदाहरणांमधील एक वैज्ञानिक उदाहरण आपण आज पाहू.
“ज्ञानोबा म्हणतात -
नातरी अवसेच्या दिवशी | भेटली बिंबे दोनी जैशी |
तेवी एकवळा रसी | केला एथ || ११.५ ||
“याचा अर्थ असा की - ज्याप्रमाणे अमावासेला सूर्य आणि चंद्र दोन्ही एकाच ठिकाणी येतात, तसे या ११ व्या अध्यायात शांत व अद्भुत रस एकत्र आले आहेत!
“अर्ध्या ओवीवरून आपल्या लक्षात येते की त्या काळी हे माहित होते की – चंद्र सूर्य प्रकाशाने प्रकाशतो. आणि चंद्र आणि सूर्य आकाशात एकाच स्थानी आल्यावर आपल्याला चंद्राची अंधारातली बाजू दिसते, तीच अमावस्या! या सर्व घटना व त्याचे कारण general knowledge होते!”, पूजा ताईने सांगितले.
“पौर्णिमेला चंद्र सूर्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला असणार हे पण त्यांना माहित होते!”, सागरचा निष्कर्ष, “चंद्रकला आणि त्यामागचे कारण ग्रीक लोकांना माहित होते, पण आधुनिक जगात साधारण १५ व्या शतकाच्या आसपास कळायला लागले होते. तेही शास्त्रज्ञांना!”
-दिपाली पाटवदकर