८ नोव्हेंबर २०१६ ही तारीख भारतीयांच्या सदैव लक्षात राहील. काल रात्री आठ वाजता देशाला उद्देशून केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत ही घोषणा केली. मध्यरात्रीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मोदी सरकारच्या ह्या एका धाडसी निर्णयाने काळ्या धनाविरुद्धच्या लढयाला निर्णायक स्वरूप मिळाले आहे. नोटांच्या थप्प्या तळघरात रचून ठेवणारे व्यापारी, घर घेताना 'कॅश कॉम्पोनन्ट' पाहिजेच असा आग्रह धरून बसणारे बडे बिल्डर. आपली फी घेताना काही टक्के 'कॅश' मध्ये मागणारे वकील, डॉक्टर इत्यादी लोक आदी सगळ्यांचेच ह्या निर्णयाने चांगलेच धाबे दणाणले असेल. मोदी सरकारच्या कार्यकाळातलाच नव्हे तर एकूणच स्वतंत्र भारताच्या इतिहासातला हा बहुधा सगळ्यात धाडसी निर्णय असेल. हा निर्णय घेऊन मोदीजींनी आपले सरकार रिस्क घ्यायला घाबरत नाही हे सप्रमाण सिद्ध केलेले आहे.
भारतासारख्या खंडप्राय आणि विस्कळीत अर्थव्यवस्था असलेल्या देशात असा निर्णय घेणे सोपे नक्कीच नाही. ह्या निर्णयामागची पार्श्वभूमी गेले अडीच वर्षे तयार होत होती. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे १५ ऑगस्ट २०१४ मध्ये जन-धन योजना जाहीर केली. ह्या योजनेमार्फत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला बॅंकिंग सिस्टममध्ये समाविष्ट करण्याचा उद्देश्य होता. आतापर्यंत जन-धन योजनेखाली २५ कोटींहून अधिक नवीन बँकखाती उघडली गेली आहेत आणि जवळ जवळ ४५००० कोटी रुपयांचे धन ह्या खात्यांमार्फत देशाच्या बॅंकिंग सिस्टममध्ये आले आहे. ह्या २५ कोटी नवीन बँक खात्यांमधली जवळ-जवळ २३ टक्के खाती 'शून्य ठेव' होती, म्हणजे खाती तर उघडली होती पण पैसे मात्र बँकेत ठेवले गेले नव्हते म्हणून मोदी सरकारवर विरोधकांनी सडकून टीका केली होती, पण आता त्या खात्यांचा फायदा सगळ्यानांच कळेल.
चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० च्या नोटा बँकेत आणि पोस्ट ऑफीस मध्ये असलेल्या खात्यांमधून जमा करता येतील. त्यासाठी मोदी सरकारने १० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत चांगली पन्नास दिवसांची घसघशीत मुदत दिली आहे. त्या मुदतीतही काही कारणामुळे लोकांना त्यांच्याजवळ असलेल्या ५०० आणि १०००च्या नोटा बॅंकेत जमा करता आल्या नाहीत तरी त्यांनी घाबरुन जायचे कारण नाही. ३१ डिसेंबर २०१६ नंतर ५०० आणि १०००च्या नोटा बॅंकेत जमा करायच्या असतील तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिस मध्ये जाऊन एक निवेदन देऊन ह्या नोटा तिथून तुम्ही तुमच्या खात्यात जमा करू शकता.
तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या ५०० आणि १०००च्या नोटा बॅंकेत तुमच्या खात्यात जमा केल्यानंतर तुम्हाला जर पैसे काढायचे असतील तर १० नोव्हेंबर नंतर दिवसाला १०,००० रुपयांपर्यंतची रोख रक्कम तुम्ही एका दिवसात काढू शकता. ३० डिसेंबर पर्यंत एका आठवड्यात २०,००० पर्यंतची रक्कम तुम्हाला अश्या पद्धतीने बॅंकेतून काढता येईल. तुमच्या नावावर अजूनही बँक खाते नसेल तर तुम्ही जन-धन योजनेखाली कुठल्याही बॅंकेत कधीही खाते उघडू शकता.
आज ९ नोव्हेंबर रोजी सर्व बँका आणि एटीएम बंद असतील. काही ठिकाणी १० नोव्हेंबरपर्यंत बँका आणि एटीएम बंद असण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे सामान्य नागरिकांना आणि प्रवासी, रुग्ण वगैरे लोकांना तोशीस पडू नये, त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून पेट्रोल पंप, सरकारी दूध बूथ, विमानतळ, रेल्वे स्टेशन, सरकारी, एअरलाईन काउंटर, रेल्वे तिकीट बुकिंग काउंटर, सरकारी बस स्थानकांचे तिकीट काउंटर, सरकारी किराणा मालाची दुकाने, इस्पितळे, स्मशान आणि दफनभूमी ह्या सर्व ठिकाणी पुढच्या ७२ तासांपर्यंत ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारल्या जातील.
१० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्ही कुठल्याही बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स सारखे एखादे सरकारी ओळखपत्र दाखवून तुमच्याकडे असलेल्या ४००० रुपयांपर्यंतच्या जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बदलून घेऊ शकता. एखाद्या बँकेत जाऊन ४००० रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेताना त्या बॅंकेत तुमचे खाते असलेच पाहिजे असा नियम नाही. कुठल्याही बॅंकेच्या कुठल्याही शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ४००० रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेऊ शकता. ह्या सर्व तरतुदी फक्त रोख रकमेसाठीच आहेत. डेबिट किंवा क्रेडिट कार्डने होणारे व्यवहार, इंटरनेट बँकिंग, चेकने होणारे व्यवहार हे सर्व पूर्वीप्रमाणेच चालू राहतील.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे पहिले काही दिवस सामान्य जनतेला ह्या निर्णयाचा त्रास होऊ शकतो, पण देशातले काळे धन जर बाहेर आणायचे असेल तर हा त्रास आपण सहन केलाच पाहिजे. १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या ह्या धाडसी निर्णयामुळे कितीतरी गोष्टी साध्य होणार आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे काळे धन आता चलनात येईल, कारण साठवून ठेवलेल्या १००० आणि ५०० च्या नोटा उपयोगात आणायच्या असतील तर एकच मार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे हे सगळे धन बँकेत जमा करणे!
ह्या निर्णयाचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे गेल्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था कोलमडवण्याच्या दृष्टीने पाकिस्तानच्या ISI ने करोडो रुपयांच्या ५०० आणि १००० च्या बनावट नोटा नेपाळमार्गे भारतात पसरवल्या आहेत. त्या सगळ्या नोटा आता बाद होणार आहेत. ह्या निर्णयाचा जिहादी दहशतवादाच्या फंडिंगवर दूरगामी परिणाम होणार आहे. भारतातली माओवादी चळवळ ही काळ्या पैश्याच्या आधारावरच उभी आहे. त्या चळवळीचेही ह्या निर्णयाने कंबरडे मोडणार आहे. केरळ, आंध्र, तामिळनाडू ह्या सारख्या राज्यांमध्ये सध्या 'हजार रुपये घ्या, ख्रिस्ती व्हा' ही धर्मपरिवर्तनाची मोहीम जोमात सुरु आहे, त्या मोहिमेवर देखील ह्या निर्णयाचा दूरगामी परिणाम होणार आहे. दोन महिन्यानंतर उत्तर प्रदेश मध्ये निवडणूका आहेत. त्या निवडणुकांच्या तोंडावर हा अत्यंत धाडसी निर्णय घेऊन मोदी सरकारने भ्रष्टाचाराशी दोन हात करण्याचा आपला निर्धार जाहीर केलेला आहे.
कुठल्याही शस्त्रक्रियेचा निर्णय घेणे सोपे नसते, कारण तो निर्णय घेताना धोका असतो. कुठल्याही सर्जरीनंतर रुग्णाला एकदम बरं वाटत नाही. काही काळ त्याला त्रास होतो, वेदना होतात. पण पुढे त्याचे आरोग्य चांगले व्हावे ह्यासाठी ती शस्त्रक्रिया आवश्यक असते म्हणूनच ती केली जाते. १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे देशातल्या दोन नंबरच्या पैश्यावर आणि समांतर अर्थव्यवस्थेवर केलेली सर्जरीच आहे. काही दिवस आपल्या सगळ्यांनाच कदाचित थोडा त्रास सहन करावा लागेल खरा पण पंतप्रधान मोदी ह्यांनी देशाला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे, आपण सगळे मिळून काळ्या धनाविरुद्धची ही लढाई लढूया. भारत भ्रष्टाचारमुक्त बनवण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने उचललेले हे फार मोठे पाऊल आहे. त्याचे आपण सगळ्यांनीच स्वागत केले पाहिजे!
- शेफाली वैद्य