उज्जैनचे सूर्य मंदिर
"आबा, बरेच दिवस झाले, तुम्ही सूर्य मंदिरांबद्दल माहिती सांगणार होता!", सुमित म्हणाला.
"आपण फार दिवस आकाशात फिरलो. आता थोड पृथ्वीवर उतरायला हरकत नाही! पृथ्वीवरच्या सूर्यमंदिरांचा प्रवास आपण विक्रमादित्याच्या काळातील मंदिरा पासून सुरु करू!" आबा म्हणाले.
"अजूनही ते विक्रम - वेताळाचे भूत उतरले नाहीये तुझ्या आबांच्या मानगुटीवरून! पुन्हा एकदा वेताळाच्या bearing मध्ये आहेत ते!" दुर्गाबाई चेष्टेने म्हणाल्या.
"विक्रमादित्याच्या दरबाराचे चित्रण वेताळा इतके authentic कोण करू शकेल? चल! तुला दोन हजार वर्षांपूर्वी, विक्रमादित्याच्या राजधानीत, उज्जैनला घेऊन जातो.” वेताळाच्या character मध्ये शिरत आबा म्हणाले. विक्रमादित्याचा दरबार, पडद्याआडून दाखवत असल्याप्रमाणे आबा हळू आवाजात सांगू लागले, “हा त्याचा दरबार! तो तेजस्वी सम्राट कसा शोभून दिसतो पहा सिंहासनावर. ते ३२ पुतळ्यांचे सिंहांसन त्याला इंद्राने दिले होते असे म्हणतात. शिवाजी महाराजांना भवानीमातेने तलवार दिली होती, तसेच काहीसे. त्याच्या दरबारातले काही नवरत्न तू ओळखशील - आयुर्वेदाचार्य धन्वंतरी, महाकवी कालिदास, अमरकोशकार अमरसिंह, व्याकरणकार वररुची, ज्योतिर्शास्त्रद्न्य वराहमिहीर, आदी.
“आपला interest आहे वराहमिहीर मध्ये. आदित्यदास या सूर्योपासक ज्योतिषाचा मुलगा मिहीर. मिहीरने वडिलांकडून astronomy व astrology चे धडे घेतले.
“त्याच्या नावाची आख्यायिका अशी आहे की - मिहीरने विक्रमादित्याच्या मुलाचा १८व्या वर्षी मृत्यू होईल असे भाकीत केले. खरोखरच १८व्या वर्षी एका वराहाच्या हल्ल्यात तो मृत्यू पावला. तेंव्हापासून मिहीरला 'वराहमिहीर' असे म्हणू लागले!
“वराहमिहीर astronomy, astrology, arithmetic, trigonometry, geometry, meteorology चा गाढा अभ्यासक होता. त्याने आर्यभट्टच्या सिद्धांतांचा अभ्यास करून त्यात improvisation केले. ग्रीक व रोमन गणिताचा अभ्यास केला. वराहमिहिराने लिहिलेला 'पंचसिद्धान्त' हा ग्रंथ पुढची अनेक शतके गणित व astronomy च्या अभ्यासासाठी वापरत. त्याने शून्याचे व negative अंकांचे गणितातील गुणधर्म विकसित केले. त्याच्या बृहत संहिता या पुस्तकात, पावसाचा अंदाज बांधण्याचे सूत्र दिले आहे. त्याने तयार केलेली पाऊस मोजायची पद्धत परवा परवा पर्यंत भारतात वापरात असत. शिवाय ज्योतिष शास्त्रावर बृहत जातक, लघु जातक इत्यादी ७ - ८ ग्रंथ लिहिले. त्याच्या कामाचा आवाकाच प्रचंड होता!
“त्याच्या मागून एक हजार वर्षांनी आलेल्या अल-बरूनी, या पर्शियन शास्त्रज्ञाने, वराहमिहिराचे सिद्धांत अरेबिक मध्ये लिहिले. पुढे त्याची लॅटिन भाषांतरे यूरोपीय शास्त्रज्ञांनी अभ्यासली.”
"काय अफलातून माणूस आहे हा वराहमिहीर!" सुमित म्हणाला.
“वराहमिहिराची उज्जैन मध्ये एक वेधशाळा होती, त्याबद्दल ऐक.
“उज्जैन मधून कर्क वृत्त जाते. म्हणजे उज्जैनला २१ जूनला, मध्यनाला सूर्य बरोबर डोक्यावर येतो. शिवाय Astrology व astronomy च्या अभ्यासामुळे, उज्जैन फार पूर्वीपासून भारताचे Greenwich होते. Zero Longitude शहर. आजही सर्व पंचांगांमध्ये उज्जैन प्रमाणे वेळा दिल्या असतात ते याचसाठी.
“तर, उज्जैनला कर्कवृत्तावर एक सूर्यमंदिर होते. हे मंदिर वराहमिहिराची वेधशाळा होती. त्याने अनेक astronomical observations येथून केले. सायन व निरायन मधील वाढता फरक, त्याने इथे मोजला. या फरकाला अयनांश अथवा ‘Precession of equinoxes’ असे म्हणतात. असो. तर आज सूर्यमंदिराच्या जागेवर कर्कराजेश्वरचे शिवमंदिर पाहायला मिळते.”
“सूर्याचे मंदिर cum वेधशाळा! ते सुद्धा बरोबर कर्क वृत्त आणि Zero Longitude वर! म्हणजे पृथ्वीच्या मध्यावर! सही! सूर्याला या पेक्षा उत्तम अर्ध्य काय असू शकते!” सुमित म्हणाला.
“काय बोललास सुमित, वाह! अगदी खरंय! विज्ञानाच्या धर्माचे दैवत सूर्य, चंद्र आणि ग्रहच होत!
“तू आता पुढच्या शनिवारी, म्हणजे अमावास्येला येणार. तेंव्हा तुला उज्जैनच्याच अजून एका astronomical मंदिरा बद्दल सांगीन.” आबा म्हणाले.
"अमावास्येला पुढची गोष्ट, म्हणजे तुमची विक्रम-वेताळाची जोडी जमलीच की एकदम! पण घरीच ये बाबा, उगा नाहीतर दोघे स्मशानात जाऊन गोष्टी करत बसाल!" दुर्गाबाई हसत म्हणाल्या!
"बरी आठवण केलीत दुर्गाबाई! पुढची गोष्ट खरोखरच स्मशानात बसून सांगण्यासारखी आहे!" आबा डोळे मिचकावून म्हणाले.
दिपाली पाटवदकर