प्रेमाचे देणे
अनु पाय आपटत स्वयंपाकघरात गेली. चिडचिड करत पाण्याचा पेला काढाला. तो कसातरी अर्धवट भरला. आणि सलील समोर आणून आदळला. “हे घे!”
खेळून दमून आलेला सलील, बूट काढतांना म्हणाला – “काय ग तायडे? दहावेळा तुला क्लास मधून घ्यायला येतो आणि मी साधं पाणी मागितलं तर कसा रागराग करते!”
तशी अनु अजून कावली, आणि तोंड वेंगाडून पुन्हा नखांना रंग लावत बसली.
इतक्यात पुस्तकामागून बाबा म्हणाला, “प्रेमाचे मूर्तिमंत रूप म्हणजे कर्म. तुम्ही तुमचे काम जर नावडीने, कंटाळवाणे करत असाल, तर काम करू नका! सरळ देवळाच्या दारात जाऊन बसा, आणि जे स्वतःचे काम प्रेमाने करतात त्यांच्या कडून भीक घ्या!”
बाबाने पुस्तकातून डोकं वर काढून पाहिलं, तर सलील आणि अनु दोघेही त्याच्याकडे पाहत होते. तसं पुस्तक बंद करत बाबा म्हणाला, “अरे, असं मी नाही, खलिल जिब्रानने म्हणून ठेवलं आहे. उगीच कोणावर उपकार केल्यासारखं काम करू नका. कसं आहे अनु, आपण काम तर करणारच असतो. मग प्रेमाने केलं तर बिघडलं कुठे?”
“का पण?”, अनुचा प्रश्न.
“अग, दादाला बर वाटावे म्हणून नको. पण तुझे तुला तरी बरे वाटले का असे करून? किंवा तुला कोणी ‘गिळा आता!’ असे म्हणून आईस्क्रीम जरी दिलं तरी उतरेल का ते घशा खाली? सांग बरे.”, बाबा म्हणाला.
“हं! खरं आहे बाबा! दादा, थांब तुला परत पाणी आणून देते!”, असे म्हणून अनु पाणी घेऊन आली सुद्धा!
ज्ञानेश्वर म्हणतात – आपल्या वाटणीला आलेलं काम अतिशय आनंदाने करावे. उत्साहाने करावे. त्यात प्रेमाचा ओलावा असावा. सर्वान्तर्यामी वास करणाऱ्या ईश्वराची हीच परम सेवा आहे.
ते विहित कर्म पांडवा | आपुला अनन्य ओलावा |
आणि हेची परम सेवा | मज सर्वात्मकाची || १८.९०६ ||
-दिपाली पाटवदकर