सेक्युलर गॉडस्

    04-Nov-2016
Total Views |

माणसामध्ये असलेली आत्मजाणीव हा प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये झालेला क्रांतिकारी बदल आहे. माणसामधली ही आत्मजाणीव अनेक अंगाने विकसित झाली. निसर्गाच्या लहरीनुसार त्याच्याशी सुसंगत बदल घडवून आणत, आवश्यक तेव्हा त्याच्याशी संघर्ष करत प्राणी जगत असतात, परंतु आपल्या अस्तित्वाला निसर्गाच्या लहरीपलीकडे काही विशेष अर्थ आहे, याची त्यांना जाणीव नसते. माणसामध्ये ती असते. तीच ’आत्मजाणीव.’ मानवी संस्कृतीचा विकास याच आत्मजाणीवेतून झालेला आहे. मानवामध्ये जशी आत्मजाणीव निर्माण होऊ लागली तसे त्याला आपल्या शक्तीच्या सीमीततेची जाणीव होऊ लागली व त्याबरोबरच आपल्या भवितव्याबाबतची असुरक्षितता त्याच्या मनात निर्माण होऊ लागली. आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या भोवतालच्या निसर्गाशी संबंध प्रस्थापित केले पाहिजेत याची त्याला जाणीव झाली. त्यातूनच ’ईश्वर’ या संकल्पनेचा जन्म झाला. ईश्वराच्या माध्यमातून आपण निसर्गाला प्रसन्न करून घेतले, तर निसर्गही आपल्यावर प्रसन्न राहील हा देवघेवीचा व्यवहार सुरू झाला. त्यानंतर ‘ईश्वर’ ही संकल्पना मानवी संस्कृतीत अनेक अंगाने विकसित झाली. तो एक वेगळ्या चर्चेचा विषय आहे. निसर्गाबद्दल असलेले गूढ, त्यातून निर्माण झालेली भीती, त्या भीतीतून निर्माण झालेली ईश्वराची संकल्पना व त्या ईश्वराच्या भरवशावर आपण सुरक्षित राहू शकतो, हा विश्वास ही साखळी निर्माण झाली. ईश्वरावर भरवसा ठेऊन माणसाने काही दिवस काढले, पण त्यातून त्याचा भ्रमनिरास होऊ लागला. अनेक अडचणीच्या प्रसंगी ईश्वराची उपासना करूनही त्याचा परिणाम दिसेना. त्यातून महापुरुषांची संकल्पना निर्माण झाली. ईश्वर स्वतः माणसाच्या मदतीला आला नाही तरी तो काही माणसांना अधिक शक्ती देऊन आपल्या जगात पाठवतो व त्यांच्याकरवी तो आपल्याला मदत करतो, अशी महापुरुषांची संकल्पना विकसित झाली. दैवी किंवा अतिदैवी शक्तीचे अधिष्ठान असलेल्या माणसांना देवत्व प्राप्त झाले, परंतु अधिक चिकित्सा करता अशा व्यक्तींच्याही मर्यादा असतात, त्यांचेही पाय मातीचेच असतात याचा त्याला अनुभव आला. हे जग चालण्यामागे काही नियम आहेत, निसर्ग स्वतःच्या अनियंत्रित इच्छेने नाही, तर काही विशिष्ट नियमांनी चालतो. ते नियम आपणाला समजावून घेता आले, तर निसर्गाला आपल्या ताब्यात आणता येऊ शकते, असा बौद्धिक आत्मविश्वास माणसामध्ये निर्माण झाला. त्यामुळे ईश्वरावरचा भरवसा किंवा महापुरुषांची वाट पाहाण्याऐवजी विज्ञानाच्या आधारे किंवा आपल्या तर्कशक्तीवर भरवसा ठेऊन, कारण व परिणामांची साखळी निर्माण करून आपली विचारशक्ती प्रगल्भ बनविणे यावर तो अधिक भरवसा ठेऊ लागला. ही विचारसरणी म्हणजे ‘इहवाद’ किंवा ‘सेक्युलॅरिझम’. त्यामुळे ‘इहवाद’ किंवा ‘सेक्युलॅरिझम’ या संकल्पनेत ‘ईश्वर’ किंवा ‘महापुरुष’ या संकल्पनेला स्थान नाही. म्हणून जे ‘ईश्वर’ या संकल्पनेवर विश्वास ठेवतात त्यांना सेक्युलरवादी ’प्रतिगामी’ म्हणून हिणवत असतात. या प्रक्रियेकडे एक ऐतिहासिक प्रक्रिया म्हणून पाहाण्यापेक्षा आपल्या बौद्धिक श्रेष्ठतेचे किंवा अहंकाराचे प्रदर्शन करीत ते टीकेचे आसूड ओढीत असतात. परंतु, अशा सेक्युलर मंडळींचाही स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर विश्वास नसल्याने त्यांनाही अशा ईश्वरांची किंवा महापुरुषांची आवश्यकता भासतेच. काही जणांना तो मार्क्समध्ये सापडतो, तर काही जणांना तो फ्रॉईडमध्ये किंवा अगदी आपल्या गावात बोलायचे तर नेमाडेंमध्ये. ’परमेश्वर कधीच चुकत नाही’, ही आदिमानवामध्ये असलेली श्रद्धा यांच्यामध्येेही असते.
 
महाराष्ट्रातील अशा सेक्युलर गॉडस्‌वर विश्वास ठेवणार्‍यांची काही वानगीदाखल प्रसिद्ध उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. एका सेक्युलर, ज्येष्ठ पत्रकाराचा नेहरू घराण्यावर एवढा विश्वास आहे की ’दे डू नो रॉंग’ हे त्याचे कोणत्याही राजकीय प्रश्नावरचे साधे-सोपे व बाळबोध उत्तर असते. चुकत असतात ते इतर, बरोबर असतात ते नेहरू घराण्यातील लोक, अशी त्याची श्रद्धा असते. त्याच्या मते बुद्धिमत्तेचे वाटप हे घराणे पाहून केलेले असते व नेहरू घराण्याला दिल्यानंतर उरेल ती बुद्धिमत्ता इतरांना वाटली जाते. त्याच रांगेतील दुसरे एक पत्रकार आहेत. त्यांचे देवघर मात्र अधिक मोठे आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन, रतन टाटा यासह आणखी काही देव त्यांच्या देवघरात आहेत. त्यांच्या देवांचा शोध घेणे सोपे आहे. त्यांच्या वर्णनाची सुरुवातच ’अहाहा!!!अबब!!’ आदी विशेषणांवरून होते. ते वर्णन वाचताना गीतेतील कृष्णाने अर्जुनाला दिलेल्या विराट दर्शनाची आठवण येते. त्यांचे देवही कोणतीही चूक करू शकत नाहीत. त्यांच्या दृष्टीने रघुराम राजन यांचा प्रत्येक शब्द म्हणजे बुद्धिमत्तेचा अंतिम आविष्कार. मग तो अर्थशास्त्रातील असो की राजकीय चर्चेतील. रिझर्व्ह बँकेशी संबंधित असो की नसो. जे विषय आपले नाहीत त्यात इतरांनी पडू नये, असा सल्ला ते इतरांना देत असतात. त्या नियमाला मात्र त्यांच्या देवाचा अपवाद. तसेच, ’ईश्वरी कोपा’ इतकाच ’टाटांचा कोपही’ सात्विक असतो असा त्यांचा दावा असतो. तो कोप का झाला आहे याचे जगाला ज्ञान होण्याआधीच ’तो नैतिकतेच्या कारणातून झालेला आहे’ असा साक्षात्कार त्यांना झालेला असतो. नारायण मूर्ती यांना इन्फोसिसची सूत्रे पुन्हा हाती घ्यावी लागली हा त्यांचा व्यावसायिक कमीपणा, पण तेच रतन टाटांना करावे लागले, तर ते त्यांचे नैतिक कर्तव्य. ईश्वरी महानता असणार्‍या रतन टाटांना मिस्त्री यांच्या कथित अनैतिकेची कल्पना न येणे (हेच खरे कारण असेल तर) ही व्यावसायिक घोडचूक असू शकते, असे त्यांना वाटत नाही. एवढी नैतिकता जपणार्‍या टाटांना नीरा राडिया टेपबाबत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे का ठोठवावे लागले, हाही प्रश्न त्यांना पडत नाही. प्रश्न टाटांच्या नैतिकतेचा नाही. आज उद्योगजगतात त्याच घराण्याने ती सर्वाधिक जपली आहे. प्रश्न त्याला देवत्व देऊन त्या देवत्वाची बौद्धिक गुलामगिरी पत्करणार्‍यांचा आहे. आता रतन टाटा यांनी घेतलेल्या विविध व्यावसायिक निर्णयांची चर्चा सुरू आहे ती व्यावसायिक स्तरावर करायची की, ’टाटा डज नो रॉंग’ या भाबडेपणातून करायची असा प्रश्न आहे.
 
पण सेक्युलर गॉडची पूजा करणार्‍यांची मानसिकता, त्यांनी कितीही बुद्धिमत्तेचा आव आणला तरी मानवी संस्कृतीच्या प्राथमिक स्तरावरील मानवा इतकीच बाळबोध असते. स्वतःबद्दच्या अस्तित्वाचा विश्वास जपण्यासाठी आद्य मानवांना ईश्वराची पूजा आवश्यक वाटत होती, तर आपल्यातील नसलेल्या बौद्धिक आत्मविश्वासाचे जतन करण्यासाठी अशा बुद्धिमंतांना अशा देवांची गरज भासते. आदिम अवस्थेत मानवाने आपल्याला तारणार्‍या देवांबरोबरच आपणाला त्रास देणार्‍या भुताखेतांच्या कल्पनेचीही निर्मिती केली. तसेच एकदा कृत्रिमदेव तयार केल्यानंतर त्यांना विरोध करणारे सैतान कृत्रिमपणेही निर्माण करणे हीही गरज बनते. जे लोक आपल्या देवांना विरोध करतात, ते सैतानच आहेत, अशा डॉन क्विझोटी आविर्भावात त्यांचे वर्णन करणे हा त्याचाच एक भाग आहे. ’’इतिहासाची पुनरावृत्ती होत असते व ती होत असताना फार्सच्या स्वरूपात होते,’’ असे मार्क्सचे वचन आहे. तशी झालेली पुनरावृत्ती आपण पाहात आहोत. गेली चार-पाच शतके प्रथमयुरोप व नंतर अमेरिकेने जगाचे बौद्धिक, सांस्कृतिक, लष्करी, वैज्ञानिक नेतृत्व केले होते. त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून त्यांच्याकडे राजकीय नेतृत्व आले. आज पश्चिमेकडे कोणीही पहिल्या दर्जाचा राजकीय नेता दिसत नाही. ओबामा यांच्याकडून ती अपेक्षा होती, पण ती साध्य झालेली नाही. अमेरिकेतील विद्यमान अध्यक्षीय उमेदवारांबद्दल तर आनंदच आहे. केवळ ट्रम्प यांची कुचेष्टा करून तो प्रश्न समजणार नाही. त्याची कारणे गंभीर आहेत व ती शोधण्याचा प्रयत्न केला तर ज्यांना आज हे लोक सेक्युलर गॉड म्हणून पूजा करू इच्छितात त्यांचे स्वरूप उघडे पडेल. युरोपमध्येही जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मर्केल वगळता कोणीही विश्वास देणारा नेता समोर नाही. मर्केल यांचे नेतृत्वही फार तर युरोपपुरते मर्यादित आहे. त्यांचाही मध्य पूर्वेतील निर्वासितांसंबंधातील दृष्टिकोन जर्मनी व युरोपच्या हिताचा नाही. याची चिकित्सा करण्याची त्यांना गरज वाटत नाही. इतिहास असे सांगतो की, जेव्हा गोंधळाची स्थिती निर्माण होते तेव्हा देव-देव्हार्‍यांचे प्रस्थ वाढते. आपल्या देशावरचा, समाजावरचा, संस्कृतीवरचा भरवसा सुटला की, आत्मविश्वास संपतो व या मानसिकतेतून गोंधळाचा जन्म होतो. त्यामुळे आपले महत्त्व वाढविण्याकरिता राष्ट्रभक्तीसारख्या संकल्पनांना ‘सैतानी’ ठरवणे ही अशा ’सेक्युलर गॉड डिव्होटींची’ व्यावसायिक गरज बनते. आपल्या देवाची भक्ती वाढविण्याकरिता कथित ’सैतानाबद्दलची’ भीती वाढवत राहाणे यांना आवश्यक वाटते. कारण देवांना काय वाटते ते महत्त्वाचे नसते, कारण देवांना त्यातून काहीच फरक पडत नसतो. भक्तांना मात्र आपली प्रतिष्ठा वाढविण्याकरिता ते आवश्यक असते.
- दिलीप करंबेळकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121