राम किशन ग्रेवाल ह्या हरियाणातल्या माजी सैनिकाच्या कथित आत्महत्येने अरविंद केजरीवाल आणि राहूल गांधी ह्या बरेच दिवस उपाशी असलेल्या राजकारणातील गिधाडांना एक चांगला विषय चघळायला मिळाला. #OROP म्हणजेच वन रँक वन पेन्शन ही योजना योग्य रीतीने लागू न केल्यामुळे निराश होऊन राम किशन ग्रेवाल ह्यांनी आत्महत्या केली असे सांगण्यात येते. पण हे प्रकरण दिसते तितके सोपे नाही.
राम किशन ग्रेवाल हे त्यांच्या गावचे सरपंच होते. ३१ ऑक्टोबरला त्यांनी संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रीकर ह्यांना उद्देशून हिंदीत एक विनंती पत्र टाईप करून घेतलं होतं ज्यात त्यांनी पर्रीकर ह्यांना ह्या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर माजी सैनिकांच्या पेन्शनचे प्रश्न मार्गी लावावेत अशी विनंती केली आहे. त्या पत्रात कुठेही आत्महत्येचा साधा उल्लेखही नाही. पण ते पत्र संरक्षण मंत्रालयाला न पाठवताच लगेचच दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १ नोव्हेंबरला राम किशन ग्रेवाल ह्यांनी हाताने त्याच पत्रावर दोन ओळींची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. आजतक ह्या चॅनेलने ग्रेवाल ह्यांच्या त्यांच्या मुलाशी झालेल्या शेवटच्या संभाषणाची ध्वनिफीत प्रसारित केली आहे. त्यात ते अत्यंत शांतपणे मुलाला सांगतात की 'हॅलो, जोरात बोल, असं आहे की मी पॉयजन खाल्लंय' आणि मुलगाही अत्यंत शांतपणे, अजिबात विचलित न होता त्यांच्याशी बोलतोय, 'काय घेतलंय, किती घेतलंय' असे प्रश्न विचारतोय. ऑडिओमध्ये मागून काही इतर लोकांचेही आवाज आहेत जे राम किशन ग्रेवाल ह्यांना बोलण्यासाठी प्रॉम्प्ट करत आहेत. ते लोक कोण आहेत? त्यांनी राम किशन ग्रेवाल ह्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त का केलं नाही?
देखिये #OROP मामले में सूबेदार राम किशन ग्रेवाल का आत्महत्या से पहले का ऑडियो आया सामने #Hallabol pic.twitter.com/0CZJS79v2f
— AajTak (@aajtak) November 2, 2016
दुसरी गोष्ट अशी आहे की राम किशन ग्रेवाल २००४ मध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात रिटायर झाले तेव्हा त्यांना १३,००० रुपये मिळत होते. २०१४ मध्ये मोदी सरकारने वन रँक वन पेन्शन ची मागणी मान्य केल्यावर त्यांची पेन्शन वाढून २८,००० झाली. त्यातले २३,००० त्यांना मिळालेही होते. पण ५००० रुपये बँकेत प्रशासकीय दिरंगाईमुळे अडकून राहिले होते. पण केवळ ५००० रुपयांसाठी एखादा माजी सैनिक आत्महत्येसारखं भ्याड पाऊल उचलेल हे शक्य वाटत नाही.
राहता राहिली #OROP ची म्हणजे वन रँक वन पेन्शन ची बात. वन रँक वन पेन्शन म्हणजे काय तर वेगवेगळ्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या पण एकाच रँकच्या सैनिकांच्या पेन्शनच्या रकमेत फरक असू नये. ती रक्कम सगळ्यांसाठी सारखीच असावी ही मागणी. १९७१ पूर्वी ही वन रँक वन पेन्शन अस्तित्वात होती. पण इंदिरा गांधींनी १९७३ मध्ये वन रँक वन पेन्शन ही योजना सैनिकांकडून काढून घेतली. इंदिरा गांधींनी सैनिकांच्या निवृत्तीवेतनात २० ते ४० टक्के कपात केली आणि मुलकी अधिकाऱ्यांचे भत्ते आणि वेतन जवळ जवळ वीस टक्क्यांनी वाढवलं, तेही सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला धुडकावून लावून. तेव्हापासून माजी सैनिकांमध्ये असंतोष धुमसतोय.
१९७१ पासून ते १९१४ पर्यंतच्या चार दशकांच्या काळात वन रँक वन पेन्शन ही माजी सैनिकांची मागणी बासनात गुंडाळून ठेवली गेली. ह्या ४० वर्षांमधली तीस वर्षे केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. २००४-२०१४ ह्या दहा वर्षात मनमोहन सिंग ह्यांच्या मंत्रिमंडळाला माजी सैनिकांची ही रास्त मागणी मान्य करणे सहज शक्य होते. आज मारे सैनिकांचा पुळका आलेले राहूल गांधी तेव्हा काय करत होते? मनमोहन सिंग सरकारचा एक वटहुकूम त्यांनी जाहीररीत्या पत्रकार परिषदेत फाडून देखील दाखवला होता. एवढी ताकद असणाऱ्या राहूल गांधींना इच्छा असती तर त्यांच्या लाडक्या आजीचे हे वन रँक वन पेन्शनचे पाप निस्तरणे सहज शक्य होते. पण सत्तेत असताना काँग्रेसने #OROPच्या मागण्यांबाबत काहीही केले नाही आणि आज त्याच काँग्रेस सरकारमध्ये संरक्षण मंत्री असलेले ए. के अँथोनी हे तोंड वर करून साळसूदपणे सांगतात की राहूल गांधी ह्यांनी पंतप्रधान मोदीनां #OROPच्या मागण्या मान्य करा असे सांगितले होते.
ए. के अँथोनी संरक्षण मंत्री असताना त्यांनी स्वतः काय केले तर कामावर असताना बेशुद्ध पडले आणि त्यांच्या बायकोची रद्दड पेंटिंग्स तब्बल २८ कोटी रुपयांना एअर इंडियाच्या गळ्यात बांधली! त्यांचे मालक राहूल गांधी ह्यांनी राम किशन ग्रेवाल ह्यांच्या मृतदेह ठेवलेल्या इस्पितळात जाऊन तमाशा केला. इस्पितळात इतर पेशंट असतात, लोकांची वर्दळ असते. राजकीय लढाई खेळण्याचा रंगमंच हा नव्हे हे भान देखील त्यांना राहिले नाही. आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर काय, प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे हा त्यांचा व्यवसायच आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर #सर्जिकलस्ट्राईक्स केले तेव्हा आपल्या सैन्यावर अविश्वास दाखवताना केजरीवाल ह्यांना आपल्या सैनिकांचे शौर्य आठवले नाही, पण आता #OROPच्या मुद्द्यावर राजकारण करण्यात मात्र केजरीवाल सगळ्यात पुढे!
ह्या राजकारणी गिधाडांना जनतेनेच लक्षात राहील असा धडा शिकवायची गरज आली आहे!
शेफाली वैद्य