स्त्रियांसाठी नृत्यविश्व उभं करणाऱ्या आद्य नृत्यसाम्राज्ञी : सितारा देवी

    25-Nov-2016   
Total Views |



भारतीय स्त्रिया अनेक कलागुणांनी संपन्न असतात, यात वादच नाही. आजच्या जगात अगदी कॉर्पोरेट जग सांभाळण्यापासून ते रंगमंचावर नृत्य सादर करण्यापर्यंत एक भारतीय स्त्री सर्व करु शकते. मात्र काही दशकांपूर्वी हे शक्य होतं का? भारतीय स्त्रियांना रंगमंचावर उतरुन स्वत:ची कला सादर करण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यात अनेक नृत्यांगनांचा हात आहे. त्यातील आद्य नाव म्हणजेच "कथक साम्राज्ञी" सितारा देवी.



आजच्या जगात मंचावर नृत्य सादर करणे, भावमुद्रा सादर करणे हे मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी काही नवीन नाही. मात्र आजच्या या खुल्या परिस्थिती पर्यंत पोहोचण्यासाठी काही नृत्यागनांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यातील एक म्हणजे सितारा देवी. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२० रोजी झाला. लहानपणीच काही कारणांनी त्या आई वडीलांपासून लांब झाल्या आणि एका 'दाई माँ' ने त्यांचा सांभाळ केला. ८ वर्षांच्या झाल्यानंतर सितारा देवी आपल्या आई वडीलांना भेटल्या. खरे तर त्याकाळच्या प्रथे प्रमाणे त्यांचे लग्न वयाच्या आठव्या वर्षीच लावून देण्यात आले होते. मात्र शिक्षणाच्या हट्टापाई त्या या लग्नासाठी तयार झाल्या नाहीत आणि त्यांचे हे लग्न मोडले. आणि इथूनच खरी सुरुवात झाली त्यांच्या उज्ज्वल भविष्याची.

कामछगढ विद्यालयात शिकत असताना, त्यांनी सत्यवान आणि सावित्रीच्या कथेवर आधारित नृत्यनाटिकेत आपल्या उत्तम कलेचे प्रदर्शन केले आणि नृत्याच्या क्षेत्रात त्यांचे पहिले पाऊल पडले. नृत्याचे क्षेत्र त्यावेळी मुलींसाठी आज इतके खुले नव्हते. एका घरंदाज मुलीने नृत्य क्षेत्रात उतरणे आणि जगासमोर नृत्य करणे जगमान्य नव्हते. त्यांच्या परिवाराला समाजाने वाळीत टाकले होते. मात्र या प्रवासात त्यांच्या वडीलांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे वडील आचार्य सुखदेव यांनी समाजाच्या सर्व मान्यतांना न जुमानता त्यांच्या नृत्यक्षेत्रात त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. कदाचित त्यांच्या या भक्कम पाठिंब्यामुळेच आज कथकच्या क्षेत्रात सितारा देवी आद्य स्थानावर आहेत.


भारताची नृत्य परंपरा खूप जुनी आहे. वेद पुराणांमध्ये उल्लेखित असलेल्या भारतीय नृत्याचे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत, ते म्हणजे उत्तरभारतीय नृत्य आणि दक्षिण भारतीय नृत्य. उत्तर भारतातील प्रसिद्ध कथक नृत्याचे शिक्षण सितारा देवी यांनी लखनऊ घराण्याचे प्रसिद्ध गुरु अच्छन महाराज (बिरजू महाराज यांचे वडील) आणि शंभू महाराज यांच्या कडून घेतले. वयवर्ष १० असतानाच त्या एकल नृत्यसादरीकरण करत होत्या. नृत्यासाठी असलेल्या अगाध प्रेमामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले आणि त्यांचे आगमन झाले मायानगरी मुंबई येथे.

Embeded Object

खरेतर इतक्या लहान वयात देखील त्यांना नृत्याची पूर्ण समज होती. त्यांच्या चित्रपटांमधील प्रवासाची सुरुवात देखील खूप लहानपणीच झाली. मुंबई येथील जहाँगीर हॉल येथे त्यांनी आपले पहिले सादरीकरण केले आणि प्रसिद्धीच्या ६० वर्ष मोठ्या आयुष्याकडे त्यांची वाटचाल सुरु झाली.

'नृत्य साम्राज्ञी' सितारा :
वयाच्या १६व्या वर्षी सितारा देवी यांच्या नृत्याने मंत्रमुग्ध होवून गुरु रवींद्र नाथ टागोर यांनी त्यांना 'नृत्य साम्राज्ञी' ही उपमा दिली. येत्या काळात ही उपमा अगदीच खरी ठरली. देश विदेशात सितारा देवींचे अनेक मोठे मोठे कार्यक्रम झाले. लंडन येथील रॉयल अल्बर्ट आणि व्हिक्टोरिया हॉल तसंच न्यूयॉर्क येथील कॉर्नेगी हॉल मध्ये त्यांनी आपल्या कलेने लाखो दर्शकांना मंत्रमुग्ध केले. सितारादेवी यांच्यात शिकण्याची जिद्द होती. केवळ कथकच नाही तर भरतनाट्यम आणि इतर लोकनृत्यांचे शिक्षण देखील त्यांनी घेतले. या शिवाय रूसचा बॅले हा नृत्यप्रकार देखील त्यांनी आत्मसात केला. सितारा देवी यांच्या कथक मध्ये बनारस आणि लखनऊ दोन्ही घराण्यांचे मिश्रण दिसून येते. अशा या नृत्य साम्राज्ञीचे भारतीय नृत्य क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे.


चित्रपट क्षेत्रातील त्यांची कारकीर्द :
भारतीय चित्रपटात नृत्य क्षेत्र सितारा देवी यांच्या नावाशिवाय पूर्ण होवूच शकत नाही. खरेतर सितारा देवी यांनी लहान पणीच बाल कलाकार म्हणूनही सिनेमात काम केले. मात्र त्यांच्या नृत्यकलेमुळे चित्रपट क्षेत्रात त्यांनी विशेष दर्जा मिळवला. त्यांच्या चित्रपटातील कारकीर्दीत शहर का जादू (१९३४), वतन (१९३८), मोरी आँखे (१९३९), स्वामी (१९४१), रोटी(१९४२), लेख (१९४९) हलचल (१९५०) आणि मदर इंडिया (१९५७) हे काही चित्रपट प्रसिद्ध आहेत. त्याकाळातील उच्च दर्ज्याच्या अभिनेत्री म्हणून सितारा देवी ओळखल्या जायच्या, मात्र कथक नृत्यावरच्या अगाध प्रेमामुळे आणि साधनेमुळे त्यांनी अभिनय क्षेत्र आणि कथक मध्ये निवड करताना कथक नृत्याचीच निवड केली. सिने क्षेत्रातील प्रसिद्ध मधुबाला, रेखा, माला सिन्हा आणि अलीकडच्या काजोलने देखील कथक नृत्याचे शिक्षण सितारा देवी यांच्याकडून घेतले.


भारत सरकारने त्यांचा १९७० साली पद्मश्री देवून सन्मान केल्या. तसेच त्यांचा, १९८७ साली संगीत नाटक अकादमी सन्मान, १९९१ मध्ये शिखर सन्मान आणि १९९४ साली कालीदास सन्मान देवून गौरव करण्यात आला.

आजच्या स्त्रियांसाठी सन्माननीय नृत्यविश्वाची अमूल्य भेट :
खरे तर त्यांचे योगदान भारतीय नृत्य क्षेत्रात खूप मोठे आहे. आज भारत खूप बदलला आहे. भारतात नृत्याच्या क्षेत्रात देखील काळाच्या ओघात खूप बदल झाला आहे. मात्र हा बदल घडविण्यामागे सितारा देवी आणि त्यांच्या सारख्या अनेक दिग्गजांचा हात आहे. भारतीय स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी नृत्य क्षेत्राला समाजमान्य करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात नृत्य कलेचा समावेश करण्यात आला. नृत्याचा एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला. विविध नृत्य विश्वविद्यालये आणि महाविद्यालये सुरु करण्यात आली. नृत्याला एक सन्माननीय दर्जा देण्यात आला. या महान कार्यात सितारा देवी यांचा मोलाचा वाटा होता.

आज नृत्य क्षेत्राला आमच्या पीढीतील मुली "करिअर" म्हणून, "प्रोफेशन" म्हणून निवडू शकतात, ते सितारा देवी आणि त्यांच्या सारख्या दिग्गजांच्या अपार कष्टांमुळे. आज देशात अनेक नृत्य महाविद्यालये आहेत. अनेक खाजगी नृत्य संस्था आहेत. अनेक स्त्रिया आणि मुलींने नृत्य क्षेत्राला करिअर म्हणून स्वीकारले आहे. यामुळे रोजगार निर्मितीही झाली आणि नृत्यकलेला सन्मानही मिळाला आहे. आमच्या पीढीला स्वच्छंदपणे नृत्य सादर करण्याची मुभा मिळाली कारण या दिग्गजांनी समाजाच्या अनेक रूढी रितींना सहन केले तसेच त्यापुढे जावून एका नवीन समाजाचा निर्माण केला.

२५ नोव्हेंबर २०१४ रोजी अल्पशा आजाराने मुंबईच्या जसलोक रुग्णालयात सितारा देवी यांची प्राणज्योत मालवली. भारतीय नृत्य क्षेत्राने आपला एक अमूल्य हीरा गमावला मात्र सितारा देवी भारतीय स्त्रियांसाठी एक सन्माननीय क्षेत्र, नृत्य क्षेत्राला आत्मसात करणारी समाज व्यवस्था आणि एक सुंदर कलाविश्व सोडून गेल्या.

 

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121