रामचंद्र गुहा(संग्रहित छायाचित्र)
प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी गेल्या आठवड्यात एक विधान केले. ते म्हणाले, ’’डाव्यांनीच उजव्यांना जागा सोडली आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रवादाचे श्रेय पूर्णपणे मिळाले.’’ त्यांचे विधान नेमके असेच्या असे नसले तरी त्यांचा आशय मात्र असाच आहे. रामचंद्र गुहा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ’लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ सारख्या जागतिक संस्थांमध्ये अध्यापनाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. धोरणविषयक घडामोडीचे ऐतिहासिक मूल्यमापन करण्याचे काम विविध वृत्तपत्रात लेख लिहून गुहा करीत असतात. आपल्या डाव्या विचारसरणीतून गाठलेल्या टोकांसाठीदेखील गुहा ओळखले जातात. गुहा आपले बहुसंख्य लिखाण ‘इंडियन एक्सप्रेस’मधून करीत असतात आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्येच त्यांनी वरील उद्गार काढले आहेत. गुहा म्हणतात ते बरोबरच आहे. डाव्यांनी आपली संपूर्ण हयात राष्ट्रवादी विचारांनी काम करणार्यांची कुचेष्टा करण्यात आणि आपल्या पद्धतीने त्यांचे अवमूल्यन करण्यातच घालविली. अठरावे आणि एकोणिसावे शतक हे औद्योगिक क्रांतीचे होते. मोठमोठाले कारखाने आले आणि मानवी संस्कृतीची वाटचालच पूर्णपणे बदलून गेली. चाकाच्या शोधानंतर आलेली गतिमानता कारखान्यांच्या यंत्रावर येऊन त्या काळात स्थिरावली होती. साहजिकच मनुष्यबळाच्या रूपात इथे कामगारांची मोठी गरज निर्माण झाली आणि त्यातून कामगारांचे शोषण सुरू झाले. या शोषणाला जाहीर वाचा फोडण्याचे काम मार्क्सने केले, यात काही शंकाच नाही. समाजात गतिमानतेने घडत जाणार्या घटनांचे योग्य ते मूल्यमापन करून त्याला संकल्पनाबद्ध करण्याचे काम विचारवंत करीत असतात. कामगारांच्या शोषणातून आलेल्या एका शोषक व्यवस्थेचे चित्रण मार्क्सने उत्तमरित्या केले आणि जगभरात केवळ प्रेषित मोहम्मदाशीच तुलना करता येईल, असा कट्टर वर्ग मार्क्सच्या विचारांनी जगभरात निर्माण झाला. यातून विद्वान आले, कामगार नेते आले, राजकारणी आले, प्राध्यापक आले, कलाकारही आले. पाहता पाहता ‘मार्क्स’ हा नव्या युगाचा नायकच झाला. मार्क्सची विचारसरणी ही औद्योगिक क्रांतीतून निर्माण होणार्या मानवी शोषणाच्या विरोधात आलेली प्रतिक्रिया होती.
जसजसे जग औद्योगिक क्रांतीकडून तंत्रज्ञानाकडे जाऊ लागले तसतशी मार्क्सची मांडणी फिकी वाटू लागली. मार्क्सची मात्रा जिथे लागू पडत होती ती क्षेत्रेच मुळात आक्रसू लागली. गतिमानता हे देखील एक मूल्य मानणार्या पाश्र्चिमात्यांनी मार्क्सचे देव्हारे माजविण्याचे उद्योग बंद केले आणि नव्या शोधाकडे सरकू लागले. मार्क्सने आजार नेमका शोधला होता; मात्र उपाय काही त्याला सापडला नाही. पूर्वेच्या अध्यात्म वगैरे संकल्पना पाश्र्चिमात्यांनी तपासून पाहायला सुरुवात केल्या. यातूनच नवनव्या मूल्यरचनांच्या शोधाला सुरुवात झाली. भौतिकशास्त्र आणि अध्यात्मयांची सांगड घालणारे ‘ताओ ऑफ फिजिक्स’ हे डॉ. फ्रित्जॉफ कॅप्रा यांचे पुस्तक याच बौद्धिक चिकित्सेचे प्रतीक आहे. पंच्याहत्तरीच्या काळात म्हणजेच मार्क्सिस्टांच्याच भाषेत सांगायचे तर ‘उन्मादाच्या काळात’ हे लिखाण झाले आहे. कॅप्रा हे अणुशास्त्रज्ञ मात्र अध्यात्माची खोली तिचे महत्त्व न नाकारता तपासून पाहतात. कॅप्रांचे उदाहरण इथे देण्याचे कारण म्हणजे, रामचंद्र गुहा जे आज सांगत आहेत त्याची बिजे डाव्यांच्या नकारात्मक आणि झापडबंद वृत्तीत दडलेली आहेत. आपल्याला न पटलेले सर्व नाकारायचे, हिंसेचे राजकारण करीत राहायचे आणि हिंसा करण्याची क्षमता संपली की, विद्वेषाचे वातावरण निर्माण करायचे हा डाव्यांचा गेल्या काही वर्षातला उद्योग झाला आहे. स्वत: रामचंद्र गुहादेखील या रंगपंचमीत मागे राहिलेले नाही. गुहांनी केलेली संघाची, गुरुजींची मूल्यमापने ही अशाच चष्म्यातून केलेली आहेत. ज्या मुलाखतीत गुहा डाव्यांना वरचा सल्ला देतात, त्याच मुलाखतीत ते काश्मीर प्रश्नाचे वर्णन करताना ‘‘दोन मूलतत्ववादी गट एकमेकांना इंधन देत आहेत,’’ असे म्हणतात. देशातील वाढत्या हिंदुत्ववादी शक्तींचे वर्णन ते ’मूलतत्त्ववादी’ असे करतात. डाव्यांनी ‘राष्ट्रभक्ती’ हा घटक नाकारल्याने उजव्यांचे फावले, असा त्यांचा दावा आहे. यातही ’आम्ही म्हणू तेच राष्ट्रभक्त, आम्ही म्हणू तेच देशप्रेमी,’ अशी संघाने भूमिका घेतली, असे ते म्हणतात. डाव्यांचा विखारीपणा आणि बौद्धिक विद्वेष म्हणतात तो असा. मुळात संघाने अशी काही भूमिका कधीच घेतलेली नाही. उलट या देशावर प्रेम करणार्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची संघाची सोपी सुटसुटीत आणि सर्वांना लागू पडेल अशी वाटचाल आहे. देशापेक्षा निराळा असा संघाचा कुठलाही अजेंडा नाही. डावे आणि संघ यांचा विचार एकाच ठिकाणी करता येत नाही, तो याचमुळे. राष्ट्र, अध्यात्म आणि अशी कितीतरी मूल्ये डावी विचारसरणी मान्यच करायला तयार होत नाही. जगातल्या सर्वच गोष्टी शोषक-शोषित एवढ्याच चौकटीत कशा बसवता येतील? त्यापलीकडेही मानवी जग आहेच. ज्या राष्ट्रवादावर विचार करण्याची वेळ आज गुहांवर आली आहे, ती विचारसरणी नसून संकल्पना आहे हे गुहांसारख्या विद्वानाला कळू नये, हे पटणारे नाही. मात्र, राष्ट्रवादाची संकल्पना राबविण्याची ऐतिहासिक जबाबदारी ज्यांच्यावर येऊन पडली आहे. त्यांच्याविषयीचा द्वेष त्यांना तसे करू देत नाही. अखिल डाव्यांची हीच तर शोकांतिका आहे. भ्रष्ट आणि घराणेशाहीचे बुजगावणे देशावर लादणार्या कॉंग्रेसपेक्षा डावे कधीही चांगले. मात्र, डाव्यांच्या या वैचारिक गोंधळाचे काय करायचे?
राष्ट्रवादाची संकल्पना जागतिक आहे. तंत्रज्ञानामुळे जग एक खेडे होत असले तरीही ‘त्यात आमचे काय’ हीदेखील भावना सोबतच प्रबळ होत आहे. राष्ट्रवादाच्या संकल्पना या अशा कविकल्पना नसून भूमीशी निगडित आहेत. कसेही असले तरीही ट्रम्प सर्वसाधारण अमेरिकनांना भावले. जागतिक मूल्यांची पोपटपंची करणार्या हिलरी, ओबामांपेक्षा इस्लामी दहशतवादाच्या प्रश्नाला सरळ समोरून तोंड फोडणारे ट्रम्प लोकांना आवडले. डाव्यांचे गाडे हे इथे फसले आहे. ज्या पश्र्चिमेकडून मार्क्स आला, त्याच पश्र्चिमेकडून आजचा राष्ट्रवादही आला. ज्यांनी पश्र्चिमेकडे राष्ट्रवाद मांडला त्यांनी त्या त्या ठिकाणी त्यासाठी संघर्षही केला. भारतात ज्यांनी तो संघर्ष आपला मानला, भूमी हे तत्त्व मान्य करून तिच्या रक्षणासाठी व परमवैभवासाठी आपली आयुष्ये दिली, त्यांच्याविषयी भ्रमपसरविण्याचे उद्योग डावे अव्याहतपणे करीत आले आहेत.
‘अल जजिरा’च्या संकेतस्थळावर सनी हंदल नावाच्या कॅनेडियन लेखकाचा लेख आहे. ‘इसिस’चा वाढता प्रभाव आज पश्र्चिमेतील देशांसाठी धोका आहे, अशी मांडणी आज केली जात आहे. पण हंदल याच्या अगदी उलट मांडणी करतो. तो म्हणतो,’’पाश्र्चिमात्य राष्ट्रे नंतर येतील. ‘इसिस’चा सर्वात मोठा धोका हा सर्वाधिक मुसलमानांनाच आहे.’’ मानवी संस्कृती म्हणून ‘इसिस’ मुसलमानांना कुठल्या जगात घेऊन जाईल आणि तिथे त्यांच्या बायका आणि मुलांचे काय होईल, याचे भाकीत आज गुहादेखील करू शकणार नाहीत. डाव्यांचेही काहीसे असेच झाले आहे. भारतीय डाव्यांना झालेला संसर्ग तर अधिकच गंभीर आहे. विचारसरणीच्या पलीकडे विद्वेषाच्या आजाराला हे लोक बळी पडले आहेत. राष्ट्रभक्ती, स्थानिक आकांक्षा वगैरेंशी त्यांना काहीच देणेघेणे नाही. कोणत्या का कारणाने असो, नरेंद्र मोदींना या देशातील जनतेने विक्रमी बहुमताने निवडून दिले आहे. लोकमताच्या या भावनेचा साधा आदरही ही मंडळी करू शकत नाहीत. गणेश देवी नावाच्या तथाकथित विचारवंताला मोदींना मिळालेले बहुमतही मान्य नाही. यांचा हा आजार कधी बरा होणार? हा खरोखरच मोठा प्रश्न आहे.
-किरण शेलार