“काय ग तुझ सारखं, ‘नवीन शब्द शिक! नवीन शब्द शिक!’ काय त्यात इतकं? रविवारचे जरा मस्त game खेळू दे! नवव्या level पोचलो आहे मी, माहितय!”, प्रीतम म्हणाला.
“खेळ की! पण तास अन् तास game खेळण्यातला अर्धा तास पुस्तक वाच!”, विदुला म्हणाली, “कसं आहे प्रीतम, शब्दांमध्ये खूप ताकद असते. प्रत्येक शब्दापासून आपल्याला शक्ती मिळते. आपला शब्द संग्रह जितका व्यापक, जितका उत्तम, तितकी positive energy आपल्याला प्राप्त होते. कसं ते सांगते. ज्याला कमी शब्द माहित असतात, तो कमी प्रश्न विचारतो. त्याला नवीन संकल्पना शिकायला वेळ लागतो. तेच प्रत्येक नवीन शब्द विचारांचे एक नवीन दालन उघडतो. कार्य करायची नवीन वाटा, नवीन पद्धती उपलब्ध करून देतो. कार्य शक्ती सुद्धा शब्द सामर्थ्याने वाढते!”
“आणि Trend होणारे Hash Tags पण word power च आहेत की! किती उलथापालथ करू शकतात ते!”, प्रीतम म्हणाला.
“हम्म अगदी खरय! अजून एक काय आहे, जे शब्द आपल्याला माहित असतात, ते गुण आपण अंगी बाळगू शकतो. सद्गुण वाढवायचे असतील तर त्यांचे वर्णन आपण शब्दात वाचलेले असेल, तर ते अंगी बाणायला मदत होते.
“इतकंच काय, बढती हवी असेल, उच्च पदावर काम करायचे असेल तरी सुद्धा उत्तम शब्दसंग्रह हवाच! Dr. O’Connor यांनी वेगवेगळ्या पदावर काम करणार्यांचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासाचा निष्कर्ष असा होता की, ज्यांचा शब्दसंग्रह उत्तम होता, ते उच्चपदस्थ होते. हा आलेख पहा -
माय लेकाचा संवाद ऐकणारा बाबा म्हणाला, “आणि उत्तमोत्तम शब्दरत्नांची खाण म्हणजे ज्ञानेश्वरी! अरे, काय सुंदर शब्दसंपदा आहे! ‘तनुमनुप्राणे’, ‘नित्ययज्ञ’, ‘स्वकर्मकुसुमवीरा’, असे शब्द वाचून कुणाला तरी ‘तन मन अर्पण करून, जीव ओतून, आपले काम करावे’ असे कधीतरी वाटेल न! ज्ञानेश्वर म्हणतात – मी शब्दांच्या ताटात अमृताचे जेवण वाढले आहे! ही पाकसिद्धी केवळ तुमच्यासाठी केली आहे, खाऊन तृप्त व्हा!”
-दिपाली पाटवदकर