परिसंवाद- भारताचे राष्ट्रीयत्व भाग - ५

    02-Nov-2016
Total Views |

मी भारतीय... 


माझी तिळी मुलं सहा वर्षांची होती तेव्हा आम्ही काही काळाकरिता दुबईला रहायला गेलो होतो. मुलांना तिथल्या एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश मिळाला होता. पहिल्याच दिवशी माझी मुलगी, अनन्या वर्गात शिरली. दुबई तसं स्थलांतरितांच शहर आहे. त्या इवल्याशा वीस मुलांच्या वर्गात दहा देशांमधून आलेली मुलं होती.

मधल्या सुट्टीत मुलं एकमेकांची ओळख करून घेताना अनन्याने सांगितलं की ती भारतातून आलेली आहे. एक मूळचा भारतीय वंशाचाच असणारा पण यूकेचा रहिवासी असलेला मुलगा लगेच नाक मुरडून म्हणाला की, ‘‘भारत? तो तर खूप घाणेरडा देश आहे. तेथे लोक रस्त्यावर कचरा टाकतात, तिथली स्वच्छतागृहे खूप घाणेरडी असतात आणि तिथले लोक पान खाऊन रस्त्यावर थुंकतात’’. त्याच्या भारतातल्या प्रवासात जे त्याने पाहिलं होतं तेच तो बोलून दाखवत होता कदाचित. माझ्या लेकीला खूप वाईट वाटलं आणि रागही आला, तरीही स्वतःवर ताबा ठेवून ती शांतपणे म्हणाली, ‘‘हो, भारत थोडा घाण आहे खरा. पण भारतात खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप चांगली माणसे आहेत. तुला माहित नाही म्हणून तू असा बोलतो आहेस, पण माझ्या आईला हे कळलं ना, तर ती तुझ्यावर खूप रागवेल.’’  तिच्या टीचरच्या कानावर हे संभाषण पडलं. त्यांनी लगेच त्या मुलाला समजावलं आणि अनन्याची माफी मागायला लावली. नंतर त्यांनी मला आवर्जून अनन्याचं कौतुक करणारी मेल पाठवली. मला अनन्याने ही सगळी घटना घरी येऊन सांगितली तेव्हा मला तिचा खूप अभिमान वाटला. राष्ट्रवाद या शब्दाची व्याख्या तिला त्या वयात समजत नव्हती, पण तिच्या कृतीत मात्र राष्ट्रवाद पुरेपूर उमटला होता. 

मराठी विश्‍वकोशात ‘राष्ट्रवाद’ या शब्दाचा अर्थ ’राष्ट्र आणि राष्ट्रभूमी यांना आदर्श मानून त्यांवर निष्ठा ठेवणारी आधुनिक राजकीय विचारप्रणाली व त्यावर आधारलेला ध्येयवाद’ असा दिलेला आहे. याचाच अर्थ तुमची राजकीय विचारप्रणाली एरवी कशीही असो, पण तुमचा आदर्श जर राष्ट्र आणि राष्ट्रभूमीची प्रगती, तिचा अभिमान असा असेल तर तुमची राजकीय विचारप्रणाली ही राष्ट्रवादाने ओतप्रोत भरलेलीच असणार ह्यात शंका नाही. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदुत्ववादी विचारांचे सावरकर होते, साम्यवादी विचारांचे भगतसिंग होते आणि गांधीवादीही होते, पण त्या सगळ्यांची ’स्वतंत्र भारत’ या एकाच संकल्पनेवर निष्ठा होती. त्यामुळे ते सगळेच राष्ट्रवादीच होते यात शंकाच नाही. 

मी गोव्याची. माझ्या घरात माझ्या लहानपणापासून प्रखर राष्ट्रवादी वातावरण होतं, पण घरातल्या मोठ्या माणसांची राजकीय विचारधारा तशी एक कधीच नव्हती. माझे आजोबा कट्टर सावरकरवादी. सावरकरांची सगळी पुस्तके माझ्या घरी होती. त्यांचेच सख्खे धाकटे भाऊ हे पक्के गांधीवादी. माझे वडील तेव्हा तरुण, सळसळत्या रक्ताचे. साम्यवादी विचारांनी भारावलेले. भगतसिंग त्यांचे आदर्श. वडिलांनी एकविसाव्या वर्षी कॉलेज अर्धवट सोडून गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली, ती ही सशस्त्र क्रांतीच्या लढ्यात. त्यांच्या आयुष्याचं एक पूर्ण दशक ते आझाद गोमंतक दल या क्रांतिकारी संघटनेत सामील होऊन पोर्तुगीज सरकारशी झगडत राहिले. घरी मोठी माणसं बोलायला लागली की राजकारणावरून वादावादी व्हायची, आवाज चढायचे, तरीही सगळ्यांना एकमेकांच्या विचारांबद्दल आदर होता आणि मुख्य म्हणजे सगळ्यांचीच निष्ठा एक स्वतंत्र बलशाली भारत या संकल्पनेवर आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं आणि राजकीय विचार कसल्याही छटेचे असोत, त्या विचारांचं अंतिम ध्येय मात्र राष्ट्र हेच असलं पाहिजे, हा धडाही मिळाला, तो ही घरातल्या जाणत्यांच्या कृतीतून. प्रत्येकाने आपापल्या परीने देशसेवाच केली. 

माझ्या लेखी तरी ‘राष्ट्रवाद’ या शब्दाची हीच परिभाषा आहे. तुम्ही स्वतंत्र भारताचे प्रतिनिधी आहात ही जाणीव तुमच्या प्रत्येक छोट्या-छोट्या कृतीत उमटली पाहिजे. मग तुम्ही देशात असा की परदेशांत, तुम्ही सैनिक असा की शिक्षक!

 - शेफाली वैद्य

अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121