परिसंवाद- भारताचे राष्ट्रीयत्व भाग - ४

    02-Nov-2016   
Total Views |

नरेंद्र मोेदींचा भारत

आणखी ४०-५० वर्षांनी आपण हयात नसू, पण जगाने भारताची ओळख ’मोदींंचा भारत’ अशी करून घ्यावी, अशी या माणसाची महत्त्वाकांक्षा आहे. व्यक्तिगत संपत्ती, सत्ता वा आपली स्मारके, पुतळे अशी कुठलीही इच्छा त्याच्या मनात नाही. आपण देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हाचा भारत वा त्याची ओळख आपल्यानंतर पूर्ण बदलून जावी, अशी महत्त्वाकांक्षा असलेली माणसे अशा मोठ्या पदावर पोहोचणार्‍याने बाळगायला हवी. तसे नसेल तर त्यांनी त्या आसनावर बसून इतिहासजमा व्हायचे असते.

१९६७ सालातली गोष्ट असावी. अजित वाडेकर पहिलीच कसोटी खेळत होता आणि समोर वेस्ट इंडिजचा संघ होता. कर्णधार गॅरी सोबर्सकडे तुफान वेगाच्या गोलंदाजांची फौज होती आणि जोडीला पाचसहा शतकवीरांची फलंदाजी हाताशी होती. त्यातला हक्काचा एक फलंदाज (बहुधा बेसिल बुचर वा कॉनराड हंट) ऐनवेळी जखमी झाला आणि त्याच्या जागी बदली खेळाडू घ्यावा लागला. त्यामुळे मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या त्या कसोटीत, अकस्मात क्लाइव्ह लॉईड याला संधी मिळाली. अशी संधी तितक्या तगड्या संघात चुकूनच मिळत असते. तिचे सोने केले तरच मोठा पल्ला मारता येत असतो. लॉईडने त्या संधीचे सोने केले. तिसर्‍या क्रमांकावर येत त्याने ८० धावा फटकावल्या आणि पुढल्या प्रत्येक सामन्यात त्याला वगळणे अशक्य होऊन बसले. सोबर्सचा जमाना संपत आला, तेव्हा त्याच लॉईडच्या नेतृत्वाखाली मग नव्या संघाची वेस्ट इंडिजने उभारणी केली. त्यातून एकाहून एक दिग्गज निर्माण झाले. खुद्द लॉईड विश्ववचषक लागोपाठ दोनदा जिंकणार्‍या संघाचा निर्विवाद कर्णधार म्हणून नावारूपाला आला. तशीच संधी अनेकांना मिळालेली असते, पण तिचे सोने किंवा माती करणे त्यांच्या हाती असते. देशाच्या कसोटी संघात संधी मिळणे ही खूप छोटी गोष्ट झाली. राज्याचे मुख्यमंत्रिपद किंवा देशाचे पंतप्रधानपद करोडो नव्हे, तर अब्जातून मिळणारी अलभ्य संधी असते. तिथे पोहोचल्यावर काय करायचे याचे ध्येय ज्यांना ठाऊक नसते, त्यांना इतिहासजमा व्हावे लागते आणि ज्यांना आपल्याला मिळालेल्या संधीची अपूर्वता उमजलेली असते, ते इतिहास घडवतात; किंबहुना इतिहास स्वत:ला घडवून घेण्यासाठी त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहातो. नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायचे असेल, तर हाच निकष आहे. अनेकांना मोदी उमजला नाही, तो हाच! कारण तो इतरांप्रमाणे आणखी एक सत्तालंपट नेता असल्याची समजूतच, त्याला समजून घेण्यातला मोठा अडथळा आहे.

राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचे आहे आणि शरद पवारांनाही त्या पदाची महत्त्वाकांक्षा होती. पण कशासाठी अशा महान पदापर्यंत पोहोचायचे, याची नेमकी कल्पनाही त्यांना नसावी. त्यातून मिळणारा मानमरातब, प्रचंड ,अमर्याद अधिकार सत्ता हे आकर्षण असू शकते. पण असे अधिकार जगाचा व जनजीवनाचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी असतात. आपल्या हयातीत काय मिळणार, ही त्यातली दुय्यम बाब असते. त्यापेक्षा जगाच्या इतिहासात नोंद घेण्यासारखे कर्तृत्व गाजविण्याची ती संधी असते. कारण आपल्यामागे शिल्लक राहाते, ती कर्तबगारीची छाप असते. महान सम्राटांचा पराक्रम त्यांच्या चार-सहा पिढ्यांनाही पुरला नाही. त्यांची ओळखही नंतरच्या पिढ्यांना उरली नाही. पण ज्यांनी जगात बदल घडवून आणले, अशा व्यक्तींचे स्मरण कित्येक शतके गेली तरी पुसले जात नाही. पंतप्रधान वा देशाची सर्वंकष सत्ता हाती घ्यायला निघालेल्या व्यक्तीला त्याचे भान असेल, तर तो आपली छाप सोडून जातो. इंदिरा गांधी यांना पित्याच्या पुण्याईने तशी संधी मिळाली. पण त्या छायेतून बाहेर पडून त्यांनी इतिहासावर आपली छाप सोडली आहे. मोदी यांच्यासमोर असे आदर्श आहेत. त्यांना आपल्या कुटुंबासाठी वा स्वत:साठी काहीही नको आहे आणि तेच मोदींचे सर्वात मोठे बळ आहे. मिळणारी प्रत्येक संधी व अधिकार, जगावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कायम पाडण्यासाठी वापरायला हा माणूस पहिल्या दिवसापासून सिद्ध आहे. कधीही आमदारकी वा कुठल्याही निवडणुकीचे तिकीट न मागणारा हा माणूस, एके दिवशी अकस्मात राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि सत्तेपासून अलिप्त राहिलेल्या या माणसाने गुजरातचा अपूर्व मुख्यमंत्री होऊन आपली छाप सोडली. २००१ पर्यंत त्या राज्याची ओळख ’गांधीनु गुजरात’ अशी होती. २०१४ मध्ये त्यांनी गुजरात सोडला, तेव्हा त्याच राज्याची ओळख ’मोदीनु गुजरात’ अशी झालेली होती. या मोदींकडे कोणी डोळे उघडून बघितले आहे काय? विरोधक आणि कॉंग्रेस सोडून द्या, अजून भाजपच्याही अनेक नेत्यांना नरेंद्र मोदी ओळखता आलेला नाही. हा माणूस संघाच्या विचारसरणीने पूर्णत: ओथंबलेला आहे. तो आज भाजपचा चेहरा असला व त्यामुळे मते मिळत असली, तरी मोदींना भाजपला केवळ सत्तेत आणण्यावर समाधान नाही. संघाच्या मूळ विचारसरणीशी बांधील राहून भाजपमध्ये शरीराने वावरणारा स्वयंसेवक; अशी मोदी यांची खरी ओळख आहे. ’अखंड भारत’ हा संघाचा मूळ विचार आहे आणि लोकशाही, देशाची सत्ता, आधुनिक जगाचे कंगोरे आणि विविध जागतिक मतप्रवाह; यातून भारतीय उपखंडाला एका संघराज्यात कसे परावर्तित करायचे, अशा विचारांनी अखंड वेळ कार्यरत असलेला स्वयंसेवक, ही मोदींची वास्तव ओळख आहे. त्यात सत्ता, त्यातून मिळणारे अधिकार किंवा व्यक्तिगत अहंकार वा स्वार्थ, यापैकी कशालाही मोदींच्या जीवनात स्थान नाही. आपल्यासोबतचे पक्षातले अनेक सहकारी, त्यात ते किती शेवटपर्यंत साथ देतील, याविषयी सुद्धा हा माणूस साशंक आहे. म्हणूनच पक्षातले अंतर्विरोध, बेबनाव आणि भारतीय राजकारणातले अडथळे जाणून घेत, त्याने ‘अखंड भारता’चे स्वप्न आपल्या हयातीत साकार करण्याची निदान सुरुवात व्हावी, इतके मर्यादित काम हाती घेतले आहे. त्या दिशेने वाटचाल करताना दोन वर्षांत त्यांनी दक्षिण आशियाई देश आपल्या पंखाखाली आणले आहेत आणि जगालाही आपल्या साथीला आणण्यात यश मिळवले आहे. आपल्या ध्येयपूर्तीच्या मार्गातले दोन मोठे अडथळे म्हणून चीन, पाकिस्तानला जगापासून एकाकी पाडलेले आहे. त्याचवेळी देशांतर्गत राजकारणात आपल्यासाठी अढळपद निर्माण केलेले आहे. आणखी दोन मुदती तरी कार्यसिद्धीसाठी आवश्यक आहेत, हे मोदी ओळखून आहेत. त्याचा अर्थ भाजपला आणखी दहा वर्षांची सत्ता मिळणे असा नसून, देशाचा व जगाचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी तितका काळ आवश्यक असावा.

आणखी ४०-५० वर्षांनी आपण हयात नसू, पण जगाने भारताची ओळख ’मोदींंचा भारत’ अशी करून घ्यावी, अशी या माणसाची महत्त्वाकांक्षा आहे. व्यक्तिगत संपत्ती, सत्ता वा आपली स्मारके, पुतळे अशी कुठलीही इच्छा त्याच्या मनात नाही. आपण देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हाचा भारत वा त्याची ओळख आपल्यानंतर पूर्ण बदलून जावी, अशी महत्त्वाकांक्षा असलेली माणसे अशा मोठ्या पदावर पोहोचणार्‍याने बाळगायला हवी. तसे नसेल तर त्यांनी त्या आसनावर  बसून इतिहासजमा  व्हायचे असते. पण, त्या पदावर जाऊन जे इतिहास घडवितात, त्यांची ओळख काळालाही पुसता येत नाही, असे मानवी इतिहासच सांगतो. तीन दशके उलटून गेल्यावर आपण इंदिराजींंना विसरू शकलेलो नाही. कारण त्यांनी पंतप्रधानपदाची शान वाढवली होती. मोदींना त्याच्या पुढली पायरी गाठायची दुर्दम्य इच्छा आहे. त्यांना पुढली लोकसभा जिंकण्याची क्षुल्लक मनिषा नाही की, सत्ता आणखी दहा वर्षे तरी हाती राहावी, असा लोभ नाही. हाती असलेली सत्ता बदलासाठी किती प्रभावीपणे वापरता येईल, यासाठी हा माणूस अखंड विचार करतो, हे त्याचे वेगळेपण आहे. त्यात मग काश्मीरचा पाकव्याप्त प्रदेश पुन्हा देशाच्या ताब्यात आणणे असू शकते, तसेच पाकिस्तानसह पुढे संपूर्ण उपखंडाचे संघराज्य, अशी जगातली महाशक्ती म्हणून भारताची उभारणी करण्याचा मनसुबा असू शकतो. तो मनसुबा समजून घ्यायचा तर संघाचा मूळ उद्देश वा विचारांचे सार जाणून घ्यावे लागेल आणि त्यातच मोदींच्या अडीच वर्षातल्या वाटचालीचे धागेदोरे शोधावे लागतील. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा असा चेहरामोहरा बदलून गेला, तर त्यामध्ये स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अनेक महान नेते धुरीणांचे चेहरेही पुसट होऊन जातील. ५० वर्षांनंतर आपण नसू, मोदीही नसतील. पण लोक या देशाला कोणाचा देश म्हणून ओळखतील? जरा याचा विचार करून बघा. मग ‘मोदी’ नावाचा पंतप्रधान कुठल्या दिशेने वाटचाल करतोय, याची चाहूल लागू शकेल. त्याला पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. त्या पदापर्यंत कशासाठी पोहोचावे, ही त्यातली महत्त्वाकांक्षा मोलाची आहे.

 

 - भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
404 - Page Not Found

404

Page not found

Sorry, we couldn't find the page you're looking for.

Return to homepage
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121