आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. हा निर्णय प्रत्येक भारतीयाच्या जीवनाला स्पर्श करणारा होता. अगदी युद्धाचा निर्णय घेतला, तरी त्याची झळ प्रत्येकाला पोहोचतेच असे नाही. परंतु, हा निर्णयच असा होता की, प्रत्येकाला त्याची झळ बसणे आणि त्याचा जीवन व्यवहार अवघड बनणे अपरिहार्य होते. या निर्णयाची शक्ती त्याच्या आश्चर्यकारकतेत असल्याने, लोकांचा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्यावर मर्यादा होत्या, परंतु असे असूनही अगदी ग्रामीण भागातील लोकांनी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देऊन हालअपेष्टा सहन केल्या व पंतप्रधानांनी घोषित केल्याप्रमाणे काळा पैसा आणि दहशतवादी कारवायांत गुंतलेले बनावट चलन या विरोधातील युद्धाला मनापासून साथ दिली. भारतीय जनतेने असा अद्भुत चमत्कार काही पहिल्यांदाच केलेला नाही. आणबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत अशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी आपल्या राजकीय सुसंस्कृतपणाचा परिचय जगाला दिला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जनमानसातील अभूतपूर्व ऐक्याचा प्रत्यय आलेला होता. त्यामुळे एरवी अशिक्षित वाटणारा (आता तीही स्थिती राहिलेली नाही) भारतीय नागरिक परिस्थितीला किती समर्थपणे तोंड देऊ शकतो, याची प्रचीती त्याने वेळोवेळी दिलेली आहे.
गेल्या अनेक वर्षांत माजलेल्या भ्रष्टाचारामुळे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानने निर्माण केलेल्या बनावट चलनामुळे देशाचे किती नुकसान होत आहे, याची चर्चा होती. परंतु, त्याविरुद्ध निर्धाराने लढाई करण्याचे धाडस कुणी दाखविले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते धाडस दाखविले आणि लोक त्यांच्यामागे उभे राहिले. लोकांना किती व कशा प्रकारे या निर्णयाचा त्रास भोगावा लागला, याच्या कहाण्या प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु, एवढा त्रास भोगूनही लोकांमधील असंतोषामुळे आंदोलन, लूटमार याची एकही घटना आतापर्यंत झालेली नाही. ज्या राजकीय नेत्यांना या निर्णयाचा फटका बसला, त्यांनी लोकांना चिथावण्याचे केलेले प्रयत्नही अयशस्वी ठरले. त्यामुळे एक स्पष्ट झाले की, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची लोकांची तयारी होती, आपल्याला त्रास झाला तरी त्याबद्दल त्यांची तक्रार नव्हती. त्यांच्यावर विश्वास टाकून लढणार्या नेत्याची फक्त कमतरता होती. ती मोदी यांनी पूर्ण केली आणि देशातील चित्र पूर्णपणे बदलून गेले! एरवी बँकेतील कर्मचारी त्यांच्या वेळोवेळी पुकारण्यात येणार्या संपाबद्दलच प्रसिद्ध आहेत, परंतु यावेळी त्यांनी सुट्ट्यांतही अभूतपूर्व परिश्रमाने काम केले आणि चलन रद्द करण्याच्या निर्णयाचा धक्का कमी करण्यास मदत केली.
एका अर्थाने लोकशाही समाजव्यवस्थेत घडलेली ही निःशब्द आणि रक्तहीन क्रांतीच म्हणावी लागेल! लोकांच्या मते, असे त्रास वेळोवेळी होतच असतात. मुंबई येथे २६ जुलैला अतिवृष्टी झाली, तेव्हा त्यामुळे झालेला त्रास लोकांनी सहन केला. तो सहन केल्याशिवाय इलाज नव्हता. हा त्रास मात्र त्याचे कारण जाणून लोकांनी पत्करला, हे त्याचे वेगळेपण!
दुर्दैवाने या आव्हानाला तोंड देण्यात प्रसारमाध्यमे केवळ कमी पडली एवढेच नव्हे, तर हे युद्ध अयशस्वी कसे होईल, ते ते सर्व प्रयत्न करण्याचा त्यांनी आपल्या परीने प्रयत्न केला. काळ्या पैशाचे व दहशतवादाचे आव्हान एवढे मोठे आहे की त्याला केवळ एक-दोन योजनांनी तोंड देता येणार नाही, हे कळण्याएवढी अक्कल केवळ प्रसारमाध्यमांना होती आणि लोकांना नव्हती, असे नव्हे. लढाया अनेक पातळ्यांवर आणि सीमांवर लढाव्या लागतात, याची त्यांनाही कल्पना होती. ज्याच्या मनात प्रामाणिकपणा आहे, तो याचबरोबर अनेक लढायाही लढू शकतो, असा विश्वास लोकांच्या मनात होता आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांनी चालविलेल्या या बुद्धिभ्रमाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. गेल्या आठवडाभरातील वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतील पहिल्या पानांवर आलेले मथळे जरी चाळले आणि प्रत्यक्षात कानावर आलेल्या घटनांचा वेध घेतला, तरी लोकांची समजण्याची पातळी आणि प्रसारमाध्यमांनी गाठलेली पातळी यातील फरक पुरेसा स्पष्ट होईल. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकप्रबोधनाचे ब्रीद घेऊन आपल्या देशात पत्रकारिता निर्माण झाली. त्या वेळी त्यांना खूपच आव्हानात्मक स्थितीत काम करावे लागले. त्यामुळे पत्रकारिता करणे म्हणजे सुळावरची पोळी, असे समजले जात होते. अशाही स्थितीत त्या वेळी पत्रकारांनी आपला प्रबोधनाचा मार्ग सोडला नाही. स्वातंत्र्याच्या आणि सामाजिक चळवळीत आव्हाने होती, कष्ट होते, तशाही स्थितीत प्रसारमाध्यमांनी तशा चळवळी करण्यास प्रवृत्त केले. आज पत्रकारांची व वृत्तपत्रांची आर्थिक स्थिती चांगली आहे. फुकट वृत्तपत्रे वाटण्याइतकी चांगली आहे आणि इतरांना हेवा वाटेल अशी पत्रकारांची मिळकत आहे. असे असूनही समाजमनाशी असलेला त्यांचा संबंध पूर्णपणे तुटलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे लोकांना होणार्या दुःखांच्या घडलेल्या वा कल्पित कथांनी आपले वृत्तपत्र सजवूनही लोकांवर त्याचा सुतराम परिणाम झालेला नाही. या उलट, आपल्याला होणार्या त्रासाचे भांडवल करून या वृत्तपत्रांना आपली लढाई लढायची आहे, याचे भान लोकांना होते. पूर्वी असे म्हणत की, विठ्ठलराव गाडगीळ यांना पत्रकार कोणतीही प्रतिक्रिया विचारायला गेले की ते विचारत- यावर शरद पवार यांचे मत काय आहे? त्यांच्या नेमकी उलट प्रतिक्रिया गाडगीळांची असे. तसाच आता बहुसंख्य वर्तमानपत्रांचा व वाहिन्यांचा धर्म झाला आहे. त्यांना स्वतःचे असे कोणतेही मत नाही, तत्त्वज्ञान नाही, बांधिलकी नाही. मोदी किंवा भाजपा जे करील, बोलेल त्याच्या विरोधात लिहिणे आणि बोलणे म्हणजे विचारस्वातंत्र्य, असा अर्थ झाला आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी मोदी यांच्या निर्णयाला, दहशतवादावर नियंत्रण आणण्यास निश्चितपणे फायदा होईल, असे सांगताना, पाकिस्तानमधून बनावट नोटा येत आहेत, हे मनमोहन सिंग पंतप्रधान असल्यापासून व मोदी पंतप्रधान झाल्यावरही सर्वांना माहीत होते. परंतु, या सरकारने हा निर्णय घ्यायला अडीच वर्षे लावली, अशी प्रतिक्रिया दिली. जणू काही मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्या घेतल्या पहिली गोष्ट हीच करायला हवी होती! वास्तविक पाहता, काळा पैसाधारकांना त्यापासून मुक्त होण्याचा वैध मार्ग उत्पन्न करून देण्यापासून आपल्या योजनेला मनापासून सहकार्य देईल, असा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आणेपर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागतात, हे टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकपदावर राहिलेल्या त्यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराला माहीत नसेल, असे कसे म्हणावे? स्वतःला बुद्धिमता वरिष्ठ समजणार्या काही जणांनी ही योजना जाहीर झाल्यापासून तिला हिणविण्याचा, विरोध करण्याचा एकही प्रसंग सोडलेला नाही. नोटा बदलून देण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेत राज्य सहकारी बँकांना बाजूला ठेवले. एरवी राज्य सहकारी बँकांच्या भ्रष्टाचारांवर अग्रलेखांमागून अग्रलेख लिहिणार्यांना मात्र एकदम त्यांची कीव आली. जर या योजनेत रिझर्व्ह बँकेने अशा बँकांना सहभागी करून घेतले असते, तर भ्रष्टाचारयुक्त यंत्रणा भ्रष्टाचार कसा निपटून काढणार? असा प्रश्न यांनीच विचारला असता! कोणतीही गोष्ट करणारा एका वेळी एकच गोष्ट करू शकतो, पण शब्दांच्या फोलपटांनी बोलणार्यांना हजार वाटा मोकळ्या असतात. उंदीर आणि राजाची गोष्ट प्रसिद्ध आहे. राजाने टोपी घेतली की राजा भिकारी, माझी टोपी घेतली, असे म्हणत राहायचे आणि राजाने टोपी परत केली, तर राजा मला घाबरला आणि माझी टोपी दिली म्हणून डांगोरा पिटायचा, असे या आजच्या पत्रकारितेचे स्वरूप आहे.
-दिलीप करंबेळकर