
ड्रायफ्रूट्समध्ये प्रामुख्याने ज्याचा समावेश होतो असा बदाम. स्मरणशक्ती तल्लख होण्यासाठी सहसा बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर त्वचेचा शुष्कपणा दूर करण्यासाठीही बदामाच्या तेलाचा चांगला उपयोग होतो. केसांच्या चकाकीसाठी आणि वाढीसाठीही बदामाचे तेल पोषक ठरते. तेव्हा, आज अशा या बहुगुणी बदामाची माहिती करुन घेऊया.
सुक्या मेवामध्ये बदाम हा एक प्रमुख घटक आहे. लाडू, खीर, शिरा, मसाला दूध इ. मध्ये पौष्टिक म्हणून बदाम हमखास वापरला जातो. उपवासाच्या विविध जिन्नसांमधूनही बदाम वापरला जातो. बदामाच्या बियांचा काही पारंपरिक वापर केला जातो. जसे- त्वचेवर तुकतुकी येण्यासाठी बदाम दुधात उगाळून लावला जातो. लहान मुलांना बदामाच्या तेलाने मालिश केली जाते. या व्यतिरिक्त बदामाचे काही आणखी आभ्यंतर व बाह्य वापर खालीलप्रमाणे आहेत.
बदामाचे वृक्ष सारक (शौचास साफ करणारे), उष्ण (अंगात उष्णता निर्माण करणारे) गुरु (पचायला जड) अम्ल (आंबट) कफकारक (कफाचे प्रमाण वाढविणारे) स्निग्ध (स्नेहांश युक्त), मधुर (गोड), शुक्रवर्धक (शुक्राची वृद्धि करणारे) आणि वातनाशक (वाताचा नाश) करणारे आहे.
बदामाचे कोवळे फळ हिरवे असते. त्याचे गुणधर्म वृक्षापेक्षा भिन्न आहेत. तसेच फळ पिकले आणि सुकले तरी त्याचे गुणधर्म बदलतात. कोवळ्या बदामाचे गुणधर्म म्हणजे ते पित्तनाशक आहे. (अन्य गुण जसे गुरु, सारवत आणि उष्ण वृक्षासमानच आहेत.) पिकलेले फळ चवीला मधुर (गोड) असतेे. हे स्निग्ध (स्नेहयुक्त) धातुवर्धक (शरीरातील उपयोगी असे सान ही धातूंची वाढ करणारे), वृष्य (शुक्र धातूसाठी पोषक), पौष्टिक आहे, सुकलेला बदाम चवीला गोड, स्निग्ध धातुवर्धक, शुक्रत्व आणि कफकारक आहे. औषधी वापर या फळांच्या कठीण कवचाचा, आत असलेल्या बीयांचा औषधी वापर होतो.
बिब्बा लावल्यावर काही वेळेस तो उठतो (rash येते) त्यावर बदामाची बी उगाळून लावल्यास उरलेला बिब्बा शमतो. बदाम रात्री भिजवून त्याची साले काढून दुधातून बदामाची खीर बनवावी. ही खीर पौष्टिक आहे. आजारपणामुळे आलेल्या थकव्यात ती द्यावी. बदामामुळे शुक्रवर्धनही होते आणि स्मरणशक्तीतही वाढ होते. बदाम जसा मेंदूसाठी उपयोगी सांगितला जातो, तसाच तो डोळ्यांसाठीही हितकर आहे. बदामाच्या खिरीप्रमाणेच तूप, खडी साखर, कंकोळ, मध व वेलची आणि बदाम एकत्र करून सकाळ-संध्याकाळ खावे, यानेही अशक्तपणा घालविण्यास मदत होते. विविध शिरोरोगांमध्ये बदाम आणि कापूर उगाळून लेप तयार करावा. लेप तयार करताना दुधातून उगाळावा आणि हा लेप शिरोभागी लावावा. त्याने आराम पडतो. डोके दुखत असल्यास, अर्धशिशी असल्यास बदाम आणि केशर गोधृतात(गाईच्या तूपात) एकजीव करावे. या मिश्रणाचे २-२ थेंब नाकपुडीत घालावेत (नस्य). अर्धशिशी कमी होते. बदाम उगाळून त्याचा लेप कपाळावर लावल्यानेही आराम पडतो. दातांच्या आरोग्यासाठी बदामाच्या सालीची राख करावी आणि ही राख मीठाबरोबर घालून दात घासावेत. दात स्वच्छ व मजबूत होतात. बाळंतपणी पौष्टिक आहाराची गरज असते. बदामाची खीर यासाठी उत्तम आहे. याच खिरीत खारीक, खसखस, बेदाणे इ. घालून रोज पिण्यास द्यावी. याने स्तन्य निर्मिती सुधारते. कंबर दुखणे, केस गळणे इ. तक्रारी कमी होतात.
Patch test शरीर काटक असल्यास, मांसवृद्धीसाठी बदामाच्या तेलाने रोज मालिश करावी. पण, हे तेल उष्ण पडू शकते. त्यामुळे वापरायला सुरुवात करण्यापूर्वी आवश्यक माहिती करून घ्यावी. कोपराच्या आतील बाजूस तेल चोळावे आणि तसेच राहू द्यावे. जर त्वचेवर खाज उठली, त्वचा लाल झाली, पुरळ उठले तर तेल उष्ण पडले, असे समजावे. असे असल्यास बदामाचे तेल अन्य कोणत्याही तेलात एकत्र करून वापरावे. चंदन तेल आणि बदाम तेल, खोबरेल तेल आणि बदाम तेल. इ. एकत्र करून वापरावे. प्रामुख्याने थंडीत बदामाच्या तेलाने अभ्यंग करणे फायदेशीर आहे. बदामामध्ये व्हिटॅमिन ’ई’चे, प्रोटिनचे प्रमाण खूप अधिक असते. हे पोषणासाठी उत्तम आहे. विविध वातविकारांमध्ये बदामाच्या तेलाने स्नेहन करावे, चोळावे.
केसांच्या वाढीसाठी आवळा चूर्णाबरोबर घ्यावे. आवळा चूर्ण बदामाच्या तेलात मिसळून ठेवावे. थोड्या वेळाने हे तेल केसांच्या मुळाशी लावावे. केसांच्या वाढीसाठी त्याचा फायदा होतो. बदामाच्या तेलाने त्वचेवर आणि केसांवर लगेच तुकतुकी येते. त्वचा आणि केस चमकतात. नुसते बदामाचे तेल उष्ण पडत असल्यास त्यात प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार अन्य तेल मिसळावे (समप्रमाणात) आणि हे तेल लावण्यास द्यावे.
बदाम रोज खावा का? त्याने जाडी तर नाही वाढणार ना? अशी चौकशी बर्याचदा दवाखान्यात रुग्ण करतात. बदामामध्ये उष्ण वीर्य असते. म्हणजे तो गरम असतो. म्हणून मूठ-मूठ भरून बदाम खाऊ नयेत. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी दोन बदामांपेक्षा अधिक खाऊ नयेत. ते सुद्धा भिजवून, सालं काढून उन्हाळ्यात तशी ही टाळावीत. बदामात खूप प्रथिने आहेत. त्यामुळे शाकाहारी व्यक्तींच्या आहारात बदाम असावा. पण, आपल्याला बाधत नाही ना, हे बघूनच घ्यावे. बदामाची काही जणांना ऍलर्जी होेऊ शकते. यात खूप तीव्रतेने पोट दुखते, मळमळ, उलट्या, जुलाब होऊ शकतात. त्याचबरोबर श्वास घेताना त्रास होणे, खोकला, शिंकताना त्रास होणे, बोलताना त्रास होणे. तेव्हा प्रकृतीचा आणि ऋतूचा विचार करूनच बदाम खावा. बदामाने ना जाडी वाढते ना कोलेस्टेरॉल, पण याचे योग्य प्रमाणात सेवन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्वचेसाठी उत्तम पोषणाचे काम बदाम तेलाने घडते. बदामाचे तेल कोमट न करताच लावावे. चेहर्यावर लावताना कशाततरी मिसळून लावावे. खूप कोरडी खरखरीत त्वचा असल्यास नारळाचे दूध आणि बदाम तेल एकत्र करून लावावे. थंडीत त्वचा तडतडते, भेगाळते. अशा वेळेस शतधौत घृत (औषधी तूप) आणि बदाम तेल एकत्र करून लावावे. याने त्वचेतील आर्द्रता आणि लवचिकता अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते. सुरकुत्या निर्माण होण्यास विलंब होतो. त्वचेवर तजेला येण्यास मदत होते. तसेच, केसांवरही बदामतेलाचा उपयोग होतो. त्वचेला आणि केसांना पोषण पुरविण्याचे काम बदामतेल करते. परिणामी, केसांची वाढ सुधारते, पोत (Texture Hair Pack, Conditioner Pack) सुधारते आणि केसही चमकदार होतात. केसांचे गळण्याचे प्रमाण आटोक्यात येते. केसांचे आरोग्य सुधारते. पण हे सर्व गुणधर्म अस्सल बदामतेलाचे आहेत. भेसळयुक्त, मिनरल ऑईलयुक्त बदामतेलाने अपायच होतो. केसांचा लावतेवेळी त्यात थोडे बदामतेलाचे थेंब घातले, तर केसांवर उत्तम चमक येते. केसांचा पोत सुधारतो. आहारातून तूप आणि बदाम यांचा वापर थंडीत अधिक करावा. त्वचेवर आणि आभ्यंतर सेवन करतेवेळी प्रमाणाची काळजी नेहमी घ्यावी.
-वैद्य किर्ती देव