“बघा, कशी मजा करतो कान्हू! भूक लागली की घर डोक्यावर घेतो आणि पोट भरले की खात नाही म्हणजे नाही, पठ्या! मगाचा घास त्याने फुर्रर्रर्र करून माझ्याच तोंडावर उडवला!”, मुग्धा आपल्या बाळाच्या कौतुकात रंगून गेली होती!
“आत्या झोपतांनाही असाच करतो लबाड. झोप आली तर बसल्या जागी झोपेल. आणि नाही तर मांडीवर घेऊन थोपटा वा भले फिरवून आणा! तस्सा टक्क जागा राहील!”, शिरीष लेकाला मांडीवर घेत म्हणाला.
बाळाला पहिल्यानेच पाहायला आलेल्या ज्योती आत्याला, शिरीष आणि मुग्धा बाळाच्या लीला भरभरून सांगत होते.
आहार तज्ञ ज्योती आत्या म्हणाल्या, “असंच असते लहान बाळांचे! ते कधी पण पोटाच्या वर खात नाहीत. पोट भरल्यावर न खाण्याची निसर्गाची देणगी, मोठे झाल्यावर प्रत्येकजण विसरून जातात काय की! जरा मोठे झाले की भूक असो वा नसो, चटकदार पदार्थ समोर आला की ताव मारतात! पोट भरलं तरी खादंती सुरूच. आधी अजीर्ण होई पर्यंत खायचं आणि मग दोन दिवस detox diet करायचं.
“अजून एक trend पाहायला मिळतो – वाईट वाटतंय? Choclate खा! Celebrate करायचय? Cake खा! चहा प्यायचाय? बरोबर सामोसे खा! गप्पा मारायच्या आहेत? चल कॉफी पिऊ! विशेष असे की या पैकी एकाही खाण्याचा भुकेशी संबंध नाही! पण आपल्या सगळ्यांना अशी सवयच लागून गेली आहे.
“माझ्या weightloss clinic मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मी हेच सांगते. भूक लागल्याशिवाय खाऊ नका. आणि जितकी भूक असेल तितकेच खा. एवढ केलं तरी वजन आटोक्यात राहील.”
शिरीष म्हणाला, “आत्या, तुझ्या सांगण्यावरून मला मागे वाचलेली एक झेन गोष्ट आठवली. पण त्या गोष्टीचा अर्थ मला आत्ता कळला! ती गोष्ट अशी होती - एक माणूस एका झेन मास्टरला विनंती करतो – मला तुमचे जीवना विषयीचे तत्वज्ञान शिकवा. तेंव्हा तो झेन मास्टर सांगतो – मी भूक लागली की जेवतो, आणि झोप आली की झोपतो. Eat when hungry. Sleep when tired.
आपला व्यवहार काही झेन मध्ये बसणार नाही! आपलं कसं होतं? पोट भरलं, पण मन भरलं नाही म्हणून अजून खायचं. किंवा झोप झाल्यावर सुद्धा लोळायचं. आणि कधी झोप आली असेल तरी चहा - कॉफी ढोसून जागायचं. हे त्या philosophy पासून फारच दूर आहे!”
ज्योती आत्या म्हणाली, “शिरीष, अरे आपल्या ग्रंथात सुद्धा असच सांगितले आहे. ज्ञानेश्वर म्हणतात - लहान बाळाच्या व्यवहाराप्रमाणे, योगी देहव्यापार करतो. त्याचे खाणे, पिणे, हिंडणे, फिरणे, झोपणे हे सगळे लहान बालका प्रमाणे असते. चैन म्हणून खाणे, आळस म्हणून झोपणे अशा गोष्टी त्यांच्या वागण्यात दिसत नाहीत.
हेच मराठे परियेशी | तरी बाळकाची चेष्टा जैशी |
योगिये कर्मे करिती तैशी | केवळा तनु || ५.५२ ||
- दिपाली पाटवदकर