अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप यांनी केवळ हिलरी यांचाच नाही तर अमेरिकन प्रसारमाध्यमांचाही पराभव केला आहे. न्यूयॉर्क टाईम्स हे वृत्तपत्र इतर अनेक वृत्तपत्रे व वृत्त वाहिन्या यांच्याप्रमाणे ट्रंप यांच्या विरोधात आघाडीवर होते. याच वृत्तपत्रातील एक स्तंभलेखक रॉजर कोहेन यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे की " अमेरिकन लोकांच्या मनात प्रचलित व्यवस्थेसंबंधी जो असंतोष आहे त्याची जाणीव डोनाल्ड ट्रंप यांना जेवढी झाली त्याची सुतराम कल्पनाही प्रसार माध्यमांना आली नाही. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान यांच्या प्रभावातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे की त्यातून निर्माण झालेल्या रागातून काहीही करून हे थांबविले पाहिजे या निष्कर्षाला लोक आले होते."
" पुरे झाली उच्चभ्रूंची मिरासदारी, पुरे झाले तज्ञांचे अंदाज, पुरे झाला स्थिती वाद, पुरे झाले कथित राजकीय शहाणपण, पुरे झाले उदारमतवादी विचारवंत व त्यांची प्रसारमाध्यमातील सांस्कृतिक मिरासदारी, पुरे झाले अर्थतज्ञ, ज्यांच्यामुळे निर्माण झाला २००८ चे आर्थिक संकट, उत्पन्नातील स्थितीशीलता व देशाबाहेर जाणारे रोजगार , हा ट्रंप यांचा संदेश होता आणि तो लोकांना भावला."
लोकांच्या या भावनेपासून प्रसारमाध्यमे इतकी दूर गेली होती की रात्री साडे नऊ वाजता जसा निकाल स्पष्ट होऊ लागला तसे सर्वाना धक्के बसायला सुरूवात झाली. सीएनएन वाहिनीवर बोलताना या वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार व लोकप्रिय राजकीय विश्लेषणकार जॉन किंग म्हणाले " आधीचे कितीतरी आठवडे आपण वस्तिस्थितीवर आधारित विश्लेषण करीत नव्हतो ". न्यूयॉर्क टाईम्सचे प्रसार माध्यम विषयाचे स्तंभलेखक जिम रूटेन बर्ग यांनी या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्यामते प्रसार माध्यमांच्या पूर्वग्रहामुळे समाज मन समजावून घेणे या प्रसार माध्यमांच्या मूलभूत कर्तव्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून आपली विश्वासार्हता धोक्यात आणली आहे. हिलरीच निवडून येणार अशी त्यांनी आपली कल्पना करून घेतल्याने जे निवडणुक अंदाज वर्तविले गेले त्यावर त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. अमेरिकन प्रसार माध्यमांच्या हातामधे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान, विश्लेषणाच्या आधुनिक पध्दती व सर्व प्रकारची माहिती असूनही, अध्यक्षीय निवडणुकीत मानवी मनाची अभिव्यक्ती कशी असेल याचा अंदाज न करता आल्यामुळे पत्रकारितेला या शोकांतिकेला तोंड द्यावे लागले आहे असे विश्लेषण त्यांनी आपल्या स्तंभातून केले आहे. नेमका कोणता उमेदवार किंवा पक्ष निवडून येईल याचे अचूक निदान करणे म्हणजे यशस्वी पत्रकारिता असे आपले मत नाही हे स्पष्ट करून ते म्हणतात, पण कोणते मुद्दे जनसमूहाला प्रभावित करीत आहेत हे समजून घेणे ही पत्रकारितेची मूलभूत जबाबदारी आहे. तसे झाले असते तर, ट्रंप अमेरिकेच्या एका मोठ्या जनसमूहाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करीत आहेत याचा प्रसार माध्यमाना अंदाज करता आला असता तर त्यांनी हे प्रश्न सोडविण्याकरिता ट्रंप कोणती धोरणे अनुसरणार आहेत अशा मुद्यांची चर्चा केली असती व त्या मुद्यांवर त्यांची तपासणी करता आली असती. परंतु या मानसिकतेचा अंदाजच न आल्याने ट्रंप यांच्या महिलासंबंधींची वक्तव्ये व भानगडी, त्यांनी न भरलेले कर, त्यांचे व्यक्तिमत्व यावरच ती टीका करीत राहिली जे प्रश्न ट्रंप यांना पाठिंबा देणार्यांच्या दृष्टीने महत्वाचे नव्हते.
जिम रूटेनबर्ग यांनी आधुनिक पत्रकारितेसमोरील एक महत्वाचा प्रश्न समोर मांडला आहे. प्रसार माध्यमे ही समाजाच्या समूह मनाशी निगडीत असतात. या समूह मनात नेमक्या कोणत्या उलथा पालथी सुरू आहेत याच्याशी संवाद असणे ही पत्रकारितेची प्राथमिक गरज असते. त्याकरिता समाजमन निर्माण करणार्या मुलभूत घटकांची विश्लेषक पत्रकाराला माहिती असावी लागते. पण आजच्या पत्रकारितेला त्याची आवश्यकता वाटत नाही. ते स्वनिर्मित , अहंकारी जगात रमून गेलेले असतात. वास्तवाची जाणीव करून घेण्याचे कष्ट न घेता, आपल्या हाती असलेले वृत्तपत्र हे आपल्या पूर्वग्रहानुसार जगाला उपदेश करण्याचे व ठीक करण्याचे साधन आहे अशा अभिनिवेशात ते असतात. त्यामुळेच पत्रकारितेचा समाजमनावर परिणाम करण्याची क्षमता कमी कमी होत आहे.
त्यामुळे ब्रेक्सिटसकट अनेक सामाजिक व राजकीय घडामोडींबाबत प्रसारमाध्यमे व जनमानस यांच्यात दुरावा उत्पन्न झाला आहे.
भारतातील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. विशेषतः १९८० पासून भारतातले समाज मानस बदलायला सुरूवात झाली. स्वातंत्र्यानंतर जन्मलेली नवी पिढी हळूहळू समाज मानसाला आकार देत होती. या पिढीवर स्वातंत्र्यपूर्व काळाचे ओझे तिच्या मनावर नव्हते व ती एका नव्या आत्मविश्वासाच्या व आपल्यासंस्कृतीच्या, परंपरेच्या व राष्ट्रवादाच्या भावनेने भारलेली होती. ही पिढी समाजाच्या समाज कारणाला, राजकारणाला आकार देत होती. परंतु प्रमार माध्यमांचे जग या बदलाचा वेध घ्यायला तयार नव्हते. हिंदुत्व, श्रीरामजन्मभूमीचा लढा, नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व यासंबंधीचे त्यांचे विश्लेषण हे जुन्याच मार्क्सवादी, कथित उदार मतवादी विचारसरणीवर चालत होते. परंतु या बदलत्या जनमानसाने प्रसार माध्यमांची बौध्दिक गुलामगिरी झुगारून दिली आणि त्यानंतरच्या तंत्रद्न्यातील प्रगतीमुळे खुले झालेल्या सोशल मिडियाच्या क्षेत्राने तर प्रसार माध्यमांचे जनमानस प्रभावित करण्याचे सामर्थ्यच संपवून टाकले. टाईम्स नाऊ च्या व्दारा अर्णव गोस्वामी यांनी इंग्रजी माध्यमातील प्रस्थापित पत्रकारितेला त्याची जागा दाखवून दिली.
परंतु असे होऊनही भारतीय पत्रकारितेत या विषयावर चर्चा सुरू झालेली नाही. किंबहुना जनमानसाशी आपला जिवंत संवाद असणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे याची जाणीवही तिला झालेली नाही. प्रसार माध्यमे आपल्या विरोधात असतानाही आपला जनमानसाशी संवाद असेल तर पंतप्रधान बनता येऊ शकते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. परंतु असे होउनही बदलत्या समाजमनाचा वेध घेण्याची वेळ आलेली आहे असे प्रसार माध्यमांना वाटत नाही. आपल्या जुन्याच चाकोरीतून त्यांची टिका टिपणी सुरू आहे. अमेरिकेतही अनेक पत्रकार अशा भारतीय पत्रकारांचे भाऊ शोभणारे आहेत. अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणुक प्रचार सुरू असताना , ट्रंप ऎवजी दुसरा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार असता तर जिंकला असता, असे म्हणणारे हे पत्रकार भाषा बदलून, हिलरी ऎवजी सॅंडर्स सारखा दुसरा उमेदवार असता तर जिंकला असता असे म्हणू लागले आहेत. प्रसार माध्यमांच्या दृ्ष्टीने प्रश्न हा ट्रंप किंवा हिलरी यांचा नसून बदलत्या सामाजिक मानसिकतेतील बदल टिपण्याव्या पत्रकारितेच्या क्षमतेचा आहे हा जिम रेटेनबर्ग यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचा आहे ही बाब त्यांच्या आकलनक्षमतेच्या बाहेरची आहे.
- दिलीप करंबेळकर