हे ग काय, परत नाश्त्याला थालीपीठच? तुला माहित्येय मला थालीपीठ अजिबात आवडत नाही ते', मी फुरंगटून आईकडे तक्रार नेली.
सकाळची गडबड, आजोबा बाहेर नाश्त्याची वाट बघत असलेले, बाबा अंघोळीला गेलेले, आमची शाळेला जायची वेळ, त्यात भांडी घासणारी राधामावशी कधीची येवून ताटकळत बसलेली. ही सगळी अष्टावधानं सांभाळत असलेली बिचारी माझी आई. तापत्या तव्याजवळ खूप वेळ उभी राहिलेली असल्यामुळे लालबुंद झालेला तिचा चेहेरा माझ्या तक्रारखोरपणामुळे रागाने अजूनच लालेलाल झालेला.
'खायचं असेल तर खा नाहीतर जा उपाशी शाळेला', करवादून आई बोलली आणि माझ्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाला लागली.
एवढा अपमान न सोसल्यामुळे मी लगेच भोकांड पसरलं. आई आणखीनच चिडली आणि तिने मस्तपैकी एक धपाटा घातला पाठीत. माझ्या रडण्याने तारस्वर गाठला. मोठे दोघे भाऊ समजूतदारपणे शेजारी बसून नाश्ता करत होते. 'त्यांच्याकडे बघ जरा', आई ओरडली.
माझं रडणं संपून आता मुसमुसणं सुरु झालं होतं. कुणी आपल्याकडे फार लक्ष देत नाहीये हे उमजून मी थालीपीठ हातात घेतलं, पण घास गळ्याखाली उतरेना. तेवढ्यात खांद्यावर मोठ्या भावाने हात ठेवला. 'चल, आपण एक खेळ खेळू', तो म्हणाला, आणि त्याने बशीत चहा ओतून घेतला. 'हा मोठ्ठा समुद्र, हो की नाही'? भाऊ म्हणाला आणि त्याने बशीमध्ये फुंकर मारली. बशीतला चहा डुचमळला. 'बघ, ह्या समुद्रातल्या लाटा', भाऊ म्हणाला.
आता माझं कुतूहल चाळवलं होतं. रडणं सोडून मी उत्सुकतेने बशीकडे बघायला लागले. आता भावाने माझ्या पुढ्यातल्या थालीपीठाचे बरेच लहान-मोठे तुकडे केले होते. 'हे सगळे मासे आहेत. हा बांगडा, हा विस्वोण, ही मोरी, हा पापलेट आणि हा पिरान्हा', भाऊ म्हणाला आणि हातात एकेक तुकडा घेऊन चहात बुडवायला लागला. 'हे सगळे समुद्रात फिरतायत'.
मी डोळे विस्फारून बघायला लागले. भाऊ थालीपीठाचे तुकडे बशीत गोल गोल फिरवायला लागला. 'आणि तू आहेस एक मोठ्ठा देवमासा', भाऊ मला म्हणाला, 'आ कर बघू .' आज्ञाधारकपणे मी तोंड उघडलं. 'आता देवमासा येवून बांगड्याला खाणार', भाऊ म्हणाला आणि त्याने एक थालीपिठाचा तुकडा माझ्या तोंडात कोंबला. मी देवमासा होते त्यामुळे मी तो मटामट गिळून टाकला. मग विस्वोण, मग पापलेट, मग पिरान्हा असं करत करत मी ते अख्खं थालीपीठ कधी संपवून टाकलं ते मला कळलंसुद्धा नाही. 'बघ खाल्लंस की नाही सगळं शहाण्यासारखं', खांद्यावर हात टाकत भाऊ मायेने म्हणाला. आईदेखील आता कौतुकाने हसायला लागलेली होती.
मोठ्या भावांच्या समर्थ हातानी सावरून नेलेले आयुष्यातले असे कितीतरी लहान मोठे प्रसंग आठवतात मला. प्रत्येक कसोटीच्या प्रसंगांमध्ये दोघा भावांनी दिलेला भावनिक आणि प्रत्यक्ष आधार नसता तर आयुष्य इतकं सोपं, इतकं सुकर झालंच नसतं. माझ्या दादाचा आणि वहिनीचा भरभक्कम आधार नसता तर माझ्या तिळ्या मुलांना इतकं समर्थपणे सांभाळूच नसते शकले मी.
भाऊ असावेच. कधी लाड करायला, कधी कचकचून भांडायला. कधी मैत्रिणींसमोर पचका करायला तर कधी अवघड गणितं सोडवायला. मुलांना मामाचा गाव द्यायला, आपल्या लग्नात डोळ्याच्या कोपऱ्यातलं पाणी हलकेच कुणाला नकळत निपटून टाकायला, वडीलकीने पाठीवरून हात फिरवायला आणि परत एकदा लहान होता यावं अशी हक्काची जागा द्यायला.