“Dad, तुम्ही मला सारखं सारखं अभ्यास करायला सांगू नका हं. किती bore होतं! आम्हाला किनई वर्गात fail करतच नाहीत! तसही मी पुढच्या वर्गात जाणारच आहे! कशाला करायचा अभ्यास?”, मीनूने अगदी निरागसपणे की काय ते बाबाला समजावले!
“दिनू, काय रे ही आजकालची पिढी!”, सुधा आजी म्हणाली, “मीनू, अग फुकटात काही मिळत नाही. साधी भाकरी हवी असली तरी आधी हाताला चार चटके बसल्या शिवाय मिळत नाही ग राणी! फुकटात जे काही मिळते ते टिकत नाही.
“अभ्यास न करता तू ५ वी तून ६ वीत जाशील ग! पण ५वी मधले गणित जर कळले नसेल, तर ते तुला नंतर त्रास देणार. पुढचे समजण्यासाठी मागचे पुन्हा शिकावे लागणार. वर वर वाटेल, मस्त फुकटात ६वी मध्ये गेले, पण त्याची किंमत मोजावीच लागते. आधी मोजावी लागते, नाहीतर नंतर व्याजा सकट भरावी लागते!”
दिनेश म्हणाला, “आपल्याला सगळे आयते मिळावे असे वाटते. अभ्यास न करता वरचा वर्ग हवा! मार्क न मिळवता प्रवेश हवा. विशेष काम न करता बढती हवी. स्वच्छता न ठेवता आम्हाला स्वच्छ, सुंदर शहर हवं. सिग्नल न पाळता, आम्हाला smooth traffic हवी. व्यायाम न करता उत्तम आरोग्य हवं. आहार न सांभाळता छान फिगर हवी. असं शक्य आहे का, सांग बर मीनू.”
उत्तरादाखल मीनू खुदकन हसली!
सुधा आजी म्हणाली, “तुझे drawing चे सर काय म्हणतात – चित्रापेक्षा चित्र काढण्याच्या process मध्ये आनंद आहे. हो की नाई? उपनिषदात, गीते मध्ये हेच सांगितले आहे. आळसाने कुणाचं भलं झालं नाही. सगळा आनंद श्रमात आहे. कष्ट करा. सततोद्योगी असा. १०० वर्ष उत्साहाने, आनंदाने, कर्मरत जीवन जगण्याची मनीषा बाळगा! ज्ञानेश्वर म्हणतात - आपल्या कर्माच्या सुगंधी पुष्पांनी केलेली विश्वाची पूजा हीच सर्वात सुंदर प्रार्थना आहे! कष्टापेक्षा उत्तम व्रत नाही! श्रमापेक्षा मधुर भजन नाही!”
-दिपाली पाटवदकर