
घराघरातून गणपतीला वाहण्यासाठी दूर्वांची जुडी वापरली जाते. ३ ते ५ पानांची २१ दूर्वांची १ जुडी असते. हा झाला धार्मिक भाग पण दूर्वांचा औषधी वापर ही आहे, त्याबद्दल आज जाणून घेऊया.
दुर्वा ही तृण जातीतील वनस्पती आहे, हा बहुवर्षायु जमिनीलगत पसरणारे तृण आहे. उष्ण कटिबंधातील हे तृण बाराही महिने उगवते. एका कांडापासून अनेक पर्व फुटतात आणि प्रत्येक पर्वातून (पेरातून) मूळ निघते. जमिनीपेक्षा वर थोडेच वाढते. एक संग पसरत असल्याने गालिचा समान सुंदर दिसते. एका कांडापासून अनेक पर्व असल्यामुळेच याला संस्कृतमध्ये ’शतपर्वा’ असेही म्हणतात. याला इंग्रजीत ‘bervyoda grass' म्हणतात. दूर्वांचे मूळ, पेर, कांड, पानं इ. सर्व भाग औषधी आहेत. त्यामुळे सगळेच वापरले जाते. याचेही बाह्यप्रयोग (local application) आणि काही आभ्यंतर प्रयोग (Internal use) बघूयात.
सकाळच्या वेळेस दूर्वांवर चालणे खूप आरामदायक आहे. ज्यांना खूप ताण-तणावात राहावे लागते, त्यांनी गवतावर (म्हणजेच दूर्वांवर) अनवाणी चालावे. सकाळच्या वेळेस त्यावरील दवबिंदूंचा तळव्यांशी संपर्क येताच आल्हाददायी वाटते. जेव्हा मधुमेही रुग्णांमध्ये अति तणावामुळे ब्लड शुगर आटोक्यात येत नसेल, त्यांच्यासाठी हा प्रयोग अति गुणकारी आहे. दूर्वांवर चालणे शक्य नसल्यास, त्याचा पाण्यातून वाटून लगदा करावा आणि तो तळव्यावर लावावा. त्यानेही तणाव कमी होण्यास मदत होते पण, हे नियमित करणे गरजेचे आहे. तसेच जेव्हा नेत्रदृष्टी (eye disorders(weak vision) किंवा मंददृष्टी ) चा त्रास होतो अशा वेळेसही दररोज सकाळी दूर्वांच्या गालिच्यावर चालावे. फायदा होतो.
दूर्वांमुळे शरीरातील उष्णता-दाह कमी होण्यास मदत होते. पित्तामुळे होणारे शिरोरोग, डोकेदुखी, अंगावर पित्त उठणे (urticaria (pimples), अग्निविसर्प (नागीण) इ. त्रासांमध्येे दूर्वांचा रस काढून त्याचा लेप लावावा किंवा वाटून त्याची पेस्ट लावावी. दाह / आग-आग कमी होते. जखम झाली असल्यास, दुखत असल्यास दूर्वांच्या रसाचा लेप लावावा. मूळव्याधीचा त्रास होत असल्यास ठणका आणि आग कमी करण्यासाठीही दूर्वा उत्तम आहेत. अंगदुखी किंवा सूज असल्यास दूर्वांचा लेप करावा. सूज व दुखणे कमी होते. कफामुळे आणि पित्तामुळे होणार्या विविध त्रासांवर दूर्वांचा उत्तम फायदा होतो. उष्णतेमुळे त्वचेतील लक्षणांवरही दूर्वांचा रस लावावा. लालबुंद तारुण्यपिटिका तसेच त्वचा उन्हात जाऊन आल्यावर काळवंडणे (Tanning) कंड येणे, त्वचा निस्तेज होणे या लक्षणांवर दूर्वांचा वापर करावा, त्यांचा लेप लावावा. आराम पडतो. भाजले असल्यास त्यावरही जर दूर्वांचा लगदा लावला, तर जळजळ कमी होऊन जखम भरण्यास मदत होते. बरेचसे त्वचेचे त्रास पित्तामुळे आणि कफाच्या पुष्टीमुळेच घडतात. असे असताना, नक्की फायदा होतो. तसेच छोटे-मोठे खरचटणे, रक्त येणे अशा जखमांवरही उपयोगी आहे. घामोळ्याचा (prickly heat) त्रास असताना याचा लगदा लावावा. आग कमी होऊन लाली आणि फोडपण बसतात.
डोळ्याचा उष्णतेशी अधिक संपर्क आल्याने किंवा अधिक ताण पडल्याने डोळे चुरचुरतात, लाल होतात, पाणावतात. या सर्वावर दूर्वांचा रस हा उपयोगी पडतो. पापण्यांवर हा लेप (रसाचा) लावावा. आराम पडतो. डोळे आले असता दूर्वांच्या रसाचे थेंब डोळ्यांत घालावेत, आराम पडतो. पण, रस काढण्यापूर्वी दूर्वा स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि पाणीही शुद्ध वापरावे. हा रस मलमलच्या स्वच्छ कापडाने गाळून मगच वापरावा. रस ताजाच असावा.(डोळ्यात घालतेवेळी)
दूर्वांचा आयुर्वेदात ‘प्रजास्थापन’ या वनस्पतींमध्ये उल्लेख होतो. म्हणजे, वारंवार गर्भपात किंवा गर्भस्राव (miscarriage) होत असल्यास दूर्वांचा रस प्यावा. दूर्वांच्या रसामुळे गर्भाचे पोषण होते, रक्तस्राव थांबतो आणि गर्भाशयाचेही बळ /ताकद वाढते. त्यामुळे वारंवार होणार्या गर्भपातानंतर जेव्हा दिवस राहातात तेव्हा पूर्ण नऊ महिने दूर्वांचा रस घ्यावा. नक्की फायदा होतो. याचबरोबर मासिक स्रावाच्या वेळेस अधिक रक्तस्राव होत असल्यास दूर्वांचा रस २ भाग आणि मध (शुद्ध) १ भाग घ्यावा. मासिक स्राव सुरू असते वेळी वरील मिश्रण २-२ चमचे, २ वेळा घ्यावे. आराम पडतो.
astringant action तसेच अन्य कुठूनही रक्तस्राव होत असल्यास (जसे नाकांचा घोणा फुटणे, रक्ती मूळव्याध, लाल लघवी होणे, हिरड्यांमधून रक्त येणे इ.) या सर्व रक्तस्रावांना दूर्वांचा रस थांबवतो. नाकाचा घोणा फुटला असल्यास, आडवे पडून, नाकपुड्यांमधून २-२ थेंब दूर्वांचा रस घालावा व पडून राहावे. हिरड्यांमधून रक्त येणे, मुखदुर्गंधी, हिरड्या सुजणे व त्यामुळे दात दुखणे/हलणे इ. लक्षणांवर दूर्वा थोड्या चावून खाव्यात. चोथा टाकून द्यावा. दूर्वांमध्ये असल्यामुळे मुखदुर्गंधीवर दूर्वा उपयोगी ठरतात. रक्ती मूळव्याधीवर दूर्वांचा रस घ्यावा किंवा २ चमचे दूर्वांचा लगदा आणि १ कप गाईचे दूध एकत्र करून मंद आचेवर उकळावे. (साधारण १५ मिली.) निम्मे (अर्धे) आटले की ते गाळून प्यावे. असे दिवसातून दोन वेळा करावे. दोन-तीन दिवसांतच आराम पडतो आणि दही १ कप (छोटा) एकत्र करून घ्यावे / खावे. असे दिवसातून एकदा करावे. मात्र सर्दी असते वेळी टाळावे. हाच वापर मूळव्याधीवरही उपयोगी आहे.
infection
(UTI - Urinary Trace Infection)
लघवी साफ होत नसल्यास वारंवार थोडी थोडी होत असल्यास गडद पिवळी आणि आग होत असतेवेळी दूर्वा वापराव्यात. दूर्वांची मुळे स्वच्छ धुवून त्याचा काढा करावा. १ भाग दूर्वांची मुळे आणि ४ भाग पाणी गरम करायला ठेवावे. एक कप पाणी उरेपर्यंत आटवावे आणि मग थंड झाल्यावर प्यावे. असे रोज एकदा करावे. याने मूत्र प्रवृत्ती साफ होते. त्रास निघून जातो. वारंवार होणार्या मूत्रवहाचे वर आणि गुदभागी होणार्या खाजेवरही दूर्वांचा वापर होतो. यासाठी दूर्वांचा वाटलेला लगदा १० ग्रॅमआणि पाणी ५० मिली घ्यावे. हे मिश्रण (काढा)गाळून त्यात पांढरी मिरी (चिमटीभर) आणि लोणी एक चमचा घालून रोज एकदा प्यावे. वारंवार होणार्या इन्फेक्शनवर आराम पडतो. मूत्रप्रवृत्ती होतेवेळी जर ती अडत असली तर दूर्वांच्या मुळांपासून बनविलेला काढा २० मिली इतका रोज एकदा घ्यावा. तसेच अंगावर सूज असली तर वरील काढा निम्म्या प्रमाणात म्हणजे १० मिली इतका प्यावा. लघवीवाटे सूज निघून जाते(Lasix समान याचे कार्य होते.)
पाय फुटले असल्यास, भेगा पडल्या असल्यास पाणी ३ भाग आणि दूर्वांचा रस १ भाग या प्रमाणात प्यावे. यात नारळपाणी घालून प्यायले तरी चालेल. असे केल्याने भेगा मऊ पडतात, भरून येतात व त्वचा मऊ आणि नितळ होते. तळव्यांची आग होत असल्यास तीही थांबते. पित्त वाढल्याने सारखी तहान लागणे, भूक लागणे किंवा उलट्या होणे इ. लक्षणे असल्यास दूर्वांचा रस वापरावा. उपयोगी आहे.
दुर्वामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते, असे हल्लीच्या शोधातून समोर येत आहे. त्या म्हणजेच वारंवार होणार्या त्रासांना आटोक्यात ठेवण्यासाठी, त्याची प्रखरता (intensity + frequency) कमी ठेवण्यासाठी दूर्वा उपयोगी आहेत.
त्वचाविकारांमध्ये दूर्वांचा लगदा आणि हळद एकत्र करून लावावे. हे प्रतिजैविकासारखे कामकरते. जखमभरून काढण्यास मदत होते. (जखमलवकर भरून येते) त्वचेवर उठणारे पुरळ आणि खाज थांबते. वारंवार होणार्या त्वचाविकारांवर (skin infection )१/२ कप दुर्वा, ३ मिर्या, १/२ चमचा जिरे हे मिश्रण कुटावे. त्यात पाणी घालून गाळून घ्यावे आणि चवीनुसार साखर-मीठ घालून सकाळी (प्रात:काळी) अंशपोटी घ्यावे. यामुळे रक्तदाब नियमित राहतो, मधुमेह नियंत्रित राहतो आणि त्वचाविकारांवर आराम पडतो.
दूर्वांचा वापर (मज्जासंस्थेवर प्रभावी) म्हणूनही होतो मस्तिष्क दौर्बल्यामध्ये याचा रस द्यावा. ताकद वाढत विविध मस्तिष्कजन्य विकृतींमध्ये याचा वापर उपयोगी आहे. यासाठी दूर्वांचा रस तूपाबरोबर घ्यावा. अशा पद्धतीने सर्वसाधारण दिसणारी ही वनस्पती आरोग्यासाठी किती उपयोगी आहे, हे सहज लक्षात येते.
-वैद्य किर्ती देव