
ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास...
कडाक्याच्या थंडीतून हिमालयाच्या कुशीतला अंजना देवस्थळे यांचा प्रवास अखेरीस ब्रह्मकमळाच्या स्पर्शाने पूर्णत्वास आला. सह्याद्रीच्या भूमीतून देशाच्या शिखरापर्यंत ज्या फुलाची आस घेऊन आली, त्या ब्रह्मकमळाला डोळ्यात भरुन घेताना झालेला परमानंद चितारणारे या शोधप्रवासातील शेवटचे पुष्प...
सन १९३१. गढवाल हिमालयातल्या २५,४४७ फूट उंचीचे कामेट शिखर सहा इंग्रज गिर्यारोहकांनी सर केले. परतीच्या मार्गावर धवली दरीतल्या गमसाली गावात ते उतरले, तोवर सर्व ठीक होतं. मान्सूनचं आगमन झालं होतं. वाटा ओल्या होत्या. त्या वातावरणात ओलावा, थंडी, गोंगाट, गार वारा गोठवत होता. अंगावरचे भिजलेले कपडे थिजत होते. थिजलेल्या कपड्यांची थंडी वातावरणातल्या थंडीत भर घालून अक्षरशः हाडांना गोठवत होती. वाट कुठे आहे, याचा काही पत्ता नाही. पुढे काय? याचा विचार करत असतानाच अचानक त्या चमूतला वनस्पतीतज्ज्ञ होल्डस्वर्थ ओरडला, ‘‘हे बघा!!’’ Primula बघणं जरा अवघडच होतं, पण जेव्हा नजर स्थिरावली लांब पर्वतांच्या खडकांवर निळ्या रंगांचे ताटवे दिसले. त्या निळ्या रंगाने पर्वतांच्या कडा उजळल्या होत्या. मग काय? थंडी, शीण, दुःख सगळं एकाएकी विसरायला झालं. त्या दरीच्या दिशेने उतरलो तसे देखण्याच्या फुलांनी आणि त्यांच्या मंद सुवासाने घेरलं. निळ्या पाकळ्यांवर पडणारे पावसाचे थेंब त्यांच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होते. खाली दरीत असंख्य प्रकारची वैविध्यपूर्ण फुलं होती. फुलांना न तुडवता एकही पाऊल टाकणं अवघड होतं.
फ्रँक स्मिथ या गिर्यारोहकाने ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ मध्ये लिहिलेलं हे वर्णन. पुढे या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन जोआन मार्गारेट लेगे या दरीत जून १९३९ मध्ये दाखल झाली. इथल्या फुलांचा अभ्यास करायला तिला इंग्लडच्या रॉयल बोटॅनिकल गार्डनने पाठवलं. फुलं ओळखणं, गोळा करून त्यांचे व्यवस्थित जतन करण्यात ती तज्ज्ञ होतीच म्हणा. दुर्दैवाने, हे काम करत असताना पाचव्याच दिवशी कड्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. तिच्या स्मृतीत तिच्या बहिणीने इथेच थडगं बांधलं आणि त्यावर ‘I will lift up mine eyes unto the hills, from whence cometh my help' आणि आज वनस्पतीप्रेमी, ट्रेकर्स आवर्जून या थडग्याला भेट देतात. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ची ओळख जरी फ्रँक स्मिथने करून दिली असली तरी स्थानिक लोकांना ‘नंदन कानन’ परिचयाचे होतेच. इथे पर्या खेळायला येतात अशीही एक समजूत आहे. ‘नंदन कानन’ म्हणजे इंद्राची बाग असाही उल्लेख आढळतो.
इथल्या नदीत फुलं वाहताना पाहून पांडवांनी याला ‘पुष्पवती’ नाव दिले, अशीही एक आख्यायिका आहे. एकंदर काय, तर इथली झाडं, पानं, फुलं सर्व ज्ञात होते. इथली जैवविविधता लक्षात घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी संपूर्ण परिसराचे म्हणून आजही संरक्षण केले जाते. पश्चिम हिमालयाच्या परिसरात असंख्य एन्डेमिक (फक्त पश्चिम हिमालयात आढळणार्या) वनस्पतींच्या संरक्षणार्थ १९८२ साली नंदा देवी नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला, तर २००५ साली ‘युनेस्को’ने ही जैवविविधता संपन्न फुलांची दरी ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केली.
Actonium संपूर्ण परिसर भौगोलिक, जैविक आणि वनस्पतीच्या दृष्टीने अद्वितीय आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची ३,२०० ते ६,६७५ मीटर (सुमारे १० हजार ते २० हजार फूट) एवढी आहे. पुष्पावती नदीच्या खोर्यात वाहणारे अनेक लहानमोठे ओढे, हिमशिखरांबरोबर वाहून आलेला गाळ या सगळ्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने एकमेवाद्वितीय झाला आहे. तसेच, या परिसरात अनेक लहानमोठी तळीदेखील आहेेत. नागतल या तळ्याच्या भोवती असंख्य विषारी वनस्पतीही आढळतात. विशेषतः नावाची वनस्पती विपुल प्रमाणात सापडते. निव्वळ ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ च्या ८७.५० चौ.किमीच्या परिसरातच ५२१ प्रजातीच्या वनस्पती आढळतात. यामध्ये ७२ वनस्पतींच्या कुळांचा समावेश आहे.
इतके वैविध्यपूर्ण वनस्पतींचे प्रकार असताना भारतीय टपाल खात्याने निवडक चार प्रजातींना हिमालयातली खासं फुलं म्हणून निवडले. यामध्ये ‘Queen of Himalayas', ‘Blue Poppy', ‘गुल-ए-निलम’, ‘Inula grandiflora ‘पोशकर’ ‘Arisagema', ‘कोबरा लिली’ किंवा ’सर्पकुंभ’ आणि ’ब्रह्मकमळ’ या फुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यापैकी माझा शोध ब्रह्मकमळाचा होता. वाटेत असंख्य लोक भेटले आणि प्रत्येकाला ब्रह्मकमळ माहीत होते आणि प्रत्येकाने ते बघितलेही होते. लोकांशी बोलताना एवढी माहिती मिळत गेली आणि ही फुलं बघण्याची उत्कंठा अधिकच वाढत गेली. ब्रह्मकमळ पूर्वी उत्तर प्रदेशाचे राज्य फूल होते. भारताचे सर्वात मोठे राज्य नोव्हेंबर २००० मध्ये विभागले गेले आणि उत्तराखंड या नव्या राज्याची स्थापना झाली. मग प्रश्न आला, तो मानचिन्हाचा... ब्रह्मकमळाचा. नव्या राज्याने सर्व काही नव्याने करावे असं गृहीत धरल्यास ब्रह्मकमळ उत्तर प्रदेशाकडे राहायला हवं होतं. पण, ब्रह्मकमळ मुळात उत्तराखंडात उगवतं. त्याला लागणारा उंच थंड प्रदेश मुळात उत्तराखंडात असल्यामुळे उत्तर प्रदेशाचे राज्य फूल ठेवण्यास काही तथ्य नव्हते आणि ब्रह्मकमळ हे उत्तराखंडाचे झाले. (पुढे पळस उत्तर प्रदेशाचे राज्य फूल म्हणून निवडले गेले.)
हे फूल निव्वळ राज्याच्या महत्त्वाच्या स्थानांवर नाही, तर सर्व देवस्थानांच्या ठिकाणी देखील मानाच्या स्थानावर आढळते. बद्रिनाथ येथे विष्णूला आणि केदारनाथाला शंकराला हे पळसाचं फूल वाहिलं जातं. नंदाष्टमीच्या पर्वाच्या वेळी प्रसाद म्हणूनही हे फूल वाटलं जातं.
ब्रह्मकमळ या फुलाच्या निर्मितीच्या देखील काही दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एका कथेत उल्लेख आढळतो की, शंकराला जेव्हा गणपतीच्या धडावर हत्तीचं डोकं जोडायचं होतं, त्यासाठी ब्रह्माने ब्रह्मकमळ निर्माण केले. त्याच्या पाकळीतून अमृत स्त्रवलं. तर दुसरी कथा अशी की, संजीवनीचा उपाय झाल्यावर लक्ष्मण जेव्हा उठला, तेव्हा देवांनी स्वर्गातून या फुलांचा वर्षाव केला. म्हणजे, ही फुले स्वर्गातून अवतरली आहेत, असा या कथेचा आशय.
अशा दंतकथा बर्याच वेळा त्या फुलाचे गुणधर्मही कळत-नकळत सांगून जातात. ब्रह्मकमळाचे औषधी गुणधर्म हिमालयाच्या परिसरात सर्वज्ञात आहेत. अगदी साधी जखम, ते खरचटण्यापासून थेट मज्जासंस्थेच्या आजारांपर्यंत अनेक रोग आणि व्याधींवर ब्रह्मकमळ उपायकारक आहे. ‘तिबेटियन मेडिसिन’ ही देखील एक औषधपद्धती आहे. त्यातही ब्रह्मकमळाला खूप महत्त्व दिलं आहे. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यास ब्रह्मकमळाची मात्रा दिली जाते.
ब्रह्मकमळाचे सौंदर्य, त्याचे धार्मिक महत्त्व आणि औषधी गुणधर्म हेच नेमके त्याच्या विनाशाचे कारण ठरले आहे. अनेक ठिकाणी या बहुगुणी फुलाची संख्या रोडावतेय. अनेक उत्सवांसाठी स्थानिक लोक टोपल्या भरभरून ब्रह्मकमळ आणतात. त्यामुळे बीजप्रसार होत नाही. त्यातच ब्रह्मकमळाची फुलं प्रसाद म्हणून वाटली जात असल्यामुळे लोकांकडून दिवसेंदिवस या फुलांची मागणी वाढतच चालली आहे. तसेच औषधी गुणधर्मासाठीही लोक सर्रास ब्रह्मकमळ उपटून नेतात. तेव्हा, या मौल्यवान फुलाच्या प्रसारासाठी शास्त्रीय कामसुरू असले तरी त्याच्या वाढीसाठी अति उंच, अति थंडीचे वातावरण गरजेचे असल्यामुळे काही अडचणी निश्चितच येतात. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ मध्ये अतिदुर्गम ठिकाणी ब्रह्मकमळ उगवत असल्यामुळे त्यातल्या त्यात सहज पाहाता यावं म्हणून ’हेमकुंड साहेब’ची वाट धरली. पण सुरुवातीच्या टप्प्यात काही ब्रह्मकमळ दिसेना. आधी बघितलेली फुलंच होती, थोडी नवीनही होती. पण, हळूहळू वातावरण बदलत गेलं. थंडी, ढग वाढू लागले. श्वास घेणं अधिकच अवघड होऊ लागलं. क्वचित मनात विचार आला, कशासाठी हा द्राविडी प्राणायाम करतोय? जो निसर्ग बघितला, ज्या जंगलांचा, झर्यांचा आनंद घेतला, बस्सं झालं की आता...
वाटाड्याला सारखा एकच प्रश्र्न विचारत होते, ‘‘कब दिखेगा?’’ त्याचं एकच उत्तर, ‘‘बस और थोडा उपर.’’ आणि मग अचानक एका तीव्र कड्यावर एक भलंमोठं कळीच्या आकाराचं फूल दिसलं. अगदी लहानपणी त्या पोस्टाच्या तिकिटांवर बघितलेलं होतं तसंच, मनात जशी त्याची छबी होती, अगदी तसंच त्या अवघड कड्यावर चढून वर गेले. खूप वेळ त्याच्याकडे बघतच बसले. एवढी वर्षे उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याचा इतका आनंद झाला. हळूच त्या फुलाला स्पर्श केला. बाहेरच्या कळीसारख्या फुलांच्या पाकळ्या नसून हरित दल होते. फुलांच्या देठाशी असणारी ही पाकळ्यांसमपानं या अतिथंड प्रदेशात फुलांचं रक्षण करतात, जेणेकरून त्या खर्या फुलांना ऊब मिळून ती वाढावी. त्यांनी बिया तयार कराव्या. नवी रोपं व्हावी. खरी फुलं बारीक जांभळट रंगाची असून काहीशी आपल्याला परिचित असलेल्या अस्टरच्या फुलांसारखी दिसतात. ती काही मला दिसली नाही आणि त्या हरित दलांना उलगडून आत झाकायची इच्छा मला मुळीच झाली नाही. अजून थोडी उंची गाठली आणि पुढे फक्त ब्रह्मकमळच!!! बाकी एवढ्या उंचीवर कोणतीच फुलं तग धरू शकत नाही. मनसोक्त ब्रह्मकमळ बघितले, त्यांच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला आणि अगदी नाईलाजाने परतीची वाट धरली.
-अंजना देवस्थळे