काश्मीर मधल्या उरी येथे आपल्या सैन्य तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भेकड हल्ल्यात आपले तब्बल १९ जवान शाहिद झाले, आणि सगळं देश पाकिस्तानविरुद्ध पेटून उठला. कसंही करून भारताने पाकिस्तानला धडा शिकवावाच अशी खदखद भारतीय जनतेच्या मनात होतीच. आपलं सैन्यही ह्या हल्ल्याचा बदला घ्यायला आतूर होतंच. भारतीय सैन्याच्या लष्करी कारवाई विभागाच्या प्रमुखांनी (DGMO) तर आपल्या प्रतिक्रियेत म्हटलंही होतं की ह्या हल्ल्याला आम्ही प्रत्त्युत्तर देऊच, पण कधी, कुठे आणि कसं प्रत्युत्तर द्यायचं ते आम्ही ठरवू. कुठलीही लष्करी कारवाई ही 'ऑन डिमांड' होत नसते. त्याला वेळ लागतो, काटेकोर नियोजन लागतं.
ह्या सगळ्या गोष्टी साधून येईपर्यंत मध्ये नऊ दिवस गेले. त्या नऊ दिवसात सरकारविरोधात बरीच शेरेबाजी झाली होती. विरोधी पक्ष तर सरकारच्या हात धुवून मागे लागलेच होते, पण मोदी सरकारचे कट्टर समर्थक देखील त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवत होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर ह्यांच्या शब्दात सांगायचं तर 'नऊ दिवस आम्ही खूप शिव्या खाल्ल्या'. तिकडून पाकिस्तानचे मंत्री फुरफुरून अणूहल्ल्याची धमकी द्यायला लागले होते, आणि पाकिस्तानला निष्ठा वाहिलेले आपल्याकडचे मीडियामधले काही पंचमस्तंभी लोक पाकिस्तानच्या पोकळ धमक्या इमानेइतबारे तिखटमीठ लावून भारतीयांपर्यंत पोचवण्याच्या कामाला लागले होते. सुदैवाने आपले लष्कर आणि आपले सध्याचे सरकार असल्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही, त्यामुळे पाकिस्तानच्या सदैव लक्षात राहील असे खणखणीत प्रत्युत्तर भारताने दिले.
उरीवरच्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर आपल्या सैन्याने नियंत्रणरेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने चालवलेले दहशतवादी तळ उध्वस्त करून दिले आणि #SurgicalStrikes हा इंग्रजी शब्द सगळ्या भारतीयांच्या जिभेवर खेळू लागला. हा हल्ला जरी आपल्या पॅरा कमांडोजनी केला असला तरी त्यांत उरी हल्ल्यात ज्यांचे १९ सैनिक शहिद झाले त्या बिहार आणि डोग्रा रेजिमेंटच्या घातक ह्या एलिट प्लॅटूनचा खूप मोठा सहभाग होता. आपल्या गमावलेल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा बदला घेणं हे ह्या रेजिमेंटसाठी खूप महत्वाचं होतं.
कुठल्याही सैन्यात सैनिकांचे मनोधैर्य आणि त्यांची विजिगिषू वृत्ती हे सगळ्यात मोठं आणि प्रभावी हत्यार असतं. जगातली सर्वश्रेष्ठ हत्यारं तुमच्याकडे असली तरी तुमच्या सैन्याचं मनोधैर्य कमी पडलं तर तुम्ही कुठलीही लढाई जिंकू शकत नाही. अमेरिकेकडून सगळ्या प्रभावी शस्त्रांची खैरात होऊनसुद्धा पाकिस्तानने ७१ च्या युद्धामध्ये सपशेल शरणागती पत्करली ती मनोधैर्य खच्ची झाल्यामुळेच.
सर्जिकल स्ट्राईक्स करून आपण जी बेधडक कारवाई केली त्यामुळे आपल्या सैन्यात तर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहेच पण भारताच्या दृष्टीने हा एक फार मोठा राजनैतिक विजय आहे. पाकिस्तान मात्र अजून हा हल्ला झाला हे मान्य करत नाहीये, कारण पाकिस्तानी सरकारला त्यांच्या जनतेपुढे ही नामुष्की मान्य करायची नाही आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रे हा हल्ला झालाच नाही असा विखारी, संतापजनक प्रचार करण्यात मग्न आहेत. पाकिस्तानच्या दृष्टीने विचार केला तर हा हल्ला झाला हे नाकारण्याचं कारण आपण समजू शकतो.
दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपली विश्वासार्हता गमावलेले काही भारतीय नेते, पत्रकार व स्वतःला विचारवंत म्हणवणारे काही तथाकथित भारतीय लिबरल पाकिस्तानची तळी उचलून धरण्यात धन्यता मनात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिग्विजय सिंग व संजय निरुपम सारखे आपल्या बेताल वक्तव्यांसाठीच प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे काही वाचाळवीर नेते ह्या विखारी प्रचारात आघाडीवर आहेत. सर्जिकल हल्ले झाले हे निवेदन सरकारतर्फे जाहीर झालेले नाही. भारतीय सैन्याच्या लष्करी कारवाई विभागाच्या प्रमुखांनी (DGMO) आपल्या अधिकृत निवेदनात हा दावा केलेला आहे. पाकिस्तानच्या खोट्या प्रचारावर विसंबून हा हल्ला झालाच नाही म्हणणारे लोक हे निव्वळ सरकारवर शंका घेत नाहीत तर ते भारतीय सैन्याच्या शौर्यावर आणि विश्वासार्हतेवर शंका घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय विरोध असू शकतो पण भारतीय सैन्यावर जे शंका घेतात, तेही शत्रू राष्ट्राच्या प्रचारावर विसंबून, ते लोक निव्वळ करंटे आहेत. लष्करी कारवाई म्हणजे काही संदीप कुमारची सेक्स सीडी नाही जी टीव्हीवर दाखवता येईल हे कुणीतरी अरविंद केजरीवाल ह्या माणसाला सांगितले पाहिजे. भारतीय लष्कर ही एक अत्यंत शिस्तीची, पूर्णपणे अराजकीय अशी संस्था आहे. जेव्हा तुम्ही भारतीय लष्करावर अविश्वास दाखवता तेव्हा तुम्ही ह्या देशात भव्य-दिव्य जे आहे त्या साऱ्यावर अविश्वास दाखवता.
सध्या देश पाकिस्तान-विरोधी जनमताने ढवळून निघालेला आहे. 'बरे झाले, सर्जिकल स्ट्राईक्स झाले. ह्या पाकिस्तान्यांना हल्ला शिकवायलाच हवा होता' ही भावना जनमानसात आहे. पण काही भारतीय 'विचारवंत' मात्र सैन्याचा उपमर्द करण्यात धन्यता मनात आहेत. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि अभिनेते ओम पुरी यांनी हल्लीच ह्या संदर्भात तोडलेले अकलेचे तारे ह्या नतदृष्ट, पाकधार्जिण्या वृत्तीचे उत्तम उदाहरण आहेत. पण सामान्य भारतीय एव्हढा कृतघ्न खचितच नाहीये. त्याचा आपल्या सरकारवर तर विश्वास आहेच पण आपल्या सैन्यावर त्याहूनही जास्त विश्वास आहे. ह्या विखारी, देशद्रोही प्रचाराला सामान्य भारतीय निश्चितच बळी पडणारा नाही हे ह्या लोकांना कळेलच. ओम पुरी ह्यांनी नंतर आपल्या वक्तव्याबद्दल मागितलेली माफी हे सामान्य जनतेच्या देशभक्तीचेच फळ आहे.
शेफाली वैद्य