दोनेक महिन्यांपूर्वी मिडियामध्ये एक बातमी खूप चघळली गेली होती. जेव्हा बीफ प्रकरणावरून जाणून-बाजून देश पेटवला जात होता, त्याच दिवसांमध्ये मुंबईत बरून कश्यप नावाच्या एका फिल्म कंपनीत काम करणाऱ्या आसाममधल्या माणसाने आपल्या फेसबुक पोस्टवरून अशी आवई उठवली होती की सकाळी कामावर जाताना तो आंबोलीमध्ये एका रिक्षात बसला होता. रिक्षावाल्याने त्याची चामड्याची ब्रिफकेस बघितली आणि त्याला म्हणे विचारलं की 'ही गाईच्या चामड्यापासून बनवलेली बॅग आहे का'? आपल्या फेसबुक पोस्टमध्ये बरून कश्यपने असंही म्हटलं होतं की त्यानंतर रिक्षावाल्याने रिक्षा एका मंदिरात नेली आणि तिथल्या 'गो-रक्षकांनी' त्याला धमकावलं आणि त्याचं नाव विचारलं. त्याचं नाव कळताच त्या लोकांनी म्हणे त्याला म्हटलं, 'ब्राह्मण आहेस म्हणून आज सोडून देतो'.
आपली प्रसारमाध्यमं कायम गिधाडांसारखी टपूनच बसलेली असतात अश्या एखाद्या सनसनाटी खबरीसाठी. लगेच ह्या फेसबुक पोस्टची 'बातमी' बनवली गेली. मूळच्या चार आण्याच्या कोंबडीला बारा आण्याचा मसाला लावून 'गो-रक्षकांचा हैदोस' वगैरे प्रक्षोभक भाषा वापरून ही बातमी पद्धतशीरपणे व्हायरल केली गेली. आपचे रघू रामन आणि टाईम्स ग्रुपचे विनीत जैन ह्यासारख्या लोकांनी लगेच ट्विटरवरून ही बातमी पसरवण्याचे सत्कृत्य पार पाडले. फेसबुकवरच्या, ट्विटरवरच्या विचारवंतांनी लगेच गोरक्षकांच्या नावाने ढीगभर वांत्या काढल्या. पण ह्यापैकी कुठल्याही महाभागाने ही घटना खरोखरच घडली का हे तपासण्याची तसदी घेतली नाही.
मुळात मुंबईतल्या रिक्षावाले गिऱ्हाईकाकडे ढुंकूनही बघत नाहीत, त्यांच्या बॅगा-बिगा तपासणे तर दूरच राहिले. त्यांचे सगळे लक्ष असते मीटरकडे. कुठल्याही विचारी माणसाला ही बातमी तद्दन खोटी आहे हे वाचताक्षणीच समजलं असतं. पण विचारी लोक आणि स्वतःला 'विचारवंत' समजणारे लोक ह्यांच्यात हाच तर फरक असतो. गोरक्षकांना फुकटच्या शिव्या देण्याची ही आयती चालून आलेली संधी तथाकथित लिबरल लोक कशाला सोडतील? ही बातमी व्हायरल केली गेली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या बातमीची दखल घेऊन पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. आंबोली परिसरातल्या तब्बल पन्नास रिक्षावाल्यानां ताब्यात घेऊन कसून चौकशी केली गेली आणि ह्या चौकशीतून पोलिसांना कळलं की बातमीतला कुठलाच तपशील जुळत नव्हता.
पोलिसांनी मग बरून काश्यपची उलटतपासणी घेतली. त्याला रिक्षाचा नंबर, रिक्षा कुठे पकडली होती, रिक्षाचालकाचे वर्णन, त्याला नेले होते ते मंदिर कुठले होते वगैरे कुठलेच तपशील नीट सांगता येईनात. कसे येतील? कारण ती घटना मुळात घडलेलीच नव्हती. फिल्म लाईनमधल्या ह्या बरून कश्यप नावाच्या फिल्मी माणसाने सवंग प्रसिद्धीसाठी रचलेला तो एक स्टंट होता. पोलिसांच्या चौकशीत बरून कश्यपचे पितळ पुरते उघडे पडले. त्याने कबुली दिली की असे काही त्याच्या बाबतीत घडलेच नव्हते. मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने ही तद्दन खोटी कहाणी रचली होती!
खोटी तक्रार करणे आणि सामाजिक शांतीचा भंग करणे ह्या आरोपांखाली आंबोली पोलिसांनी आता बरून काश्यपविरुद्धच तक्रार नोंदवली आहे, पण ह्या खोट्या तक्रारीचा तपास करण्यात पोलिसांचा इतका वेळ आणि प्रयास खर्च झाला. त्यांचा काहीही दोष नसताना आंबोलीतल्या रिक्षावाल्यांना पोलिसांचा ससेमिरा सहन करावा लागला. गोरक्षकांची, हिंदूंची नाहक बदनामी झाली त्या सगळ्याची भरपाई कोण देणार?
मीडियामधल्या ज्या ज्या लोकांनी मोठ्या चवीने ह्या बातमीची हाडे चघळली ते आपली चूक कधी कबूल करणार आहेत? मुळात सोशल मीडियावर कुणीही कसलीही वावडी उठवू शकतं पण स्वतःला पत्रकार वगैरे म्हणणाऱ्या लोकांनी कसलीही शहनिशा ना करता केवळ एका माणसाच्या फेसबुक पोस्टची 'बातमी' करणं बरोबर आहे का? हिंदूंच्या विरोधात कुणीही काहीही म्हटलं तरी ह्या देशात लगेच त्याची 'बातमी' होते. भरपूर तिखटमीठ लावून ती बातमी सर्वदूर पसरवली जाते आणि शेवटी सत्य बाहेर आलं तरी ते कुठल्या तरी आतल्या पानात दोन ओळींची बातमी देऊन दडपलं जातं. मुळातल्या खोटी बातमी देऊन जे साध्य करायचं असतं ते साध्य झालेलंच असतं. काहीही शहानिशा न करता खोटी बातमी देणाऱ्या आणि दोन समाजांमध्ये तेढ पसरवणाऱ्या प्रसारमाध्यमांवर काहीतरी कारवाई व्हायलाच हवी.
- शेफाली वैद्य