मुंबईच्या राणीच्या बागेत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या एका पेंग्विनमुळे देशभरात एका निराळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. कुठलीही गोष्ट राजकारणापासून अलिप्त न ठेऊ शकणार्या आपल्या समाजात हा मेलेला पेंग्विनही अपवाद होऊ शकला नाही; किंबहुना करदात्यांच्या पैशावर आणलेला असल्याने अशी चर्चा होणे नैसर्गिकच आहे. पेंग्विन आणण्याचे वेळापत्रक पेंग्विन आपल्याकडे रूळतील असा काळ पाहण्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीचे मतदान होण्याआधी ते लोकांना पाहण्यासाठी खुले केले जातील, अशाप्रकारे आखण्यात आले होते. ज्यांनी पेंग्विन आणून त्याचे श्रेय मिळविण्याचा प्रयत्न केला त्यातल्या कुणीही पेंग्विन मेल्यावर तिथे जाऊन चार गोष्टी तपासण्याची, चार तज्ज्ञ मंडळींशी बोलण्याचीही जबाबदारी घेतली नाही. हा सगळा झाला राजकीय भाग.
पण यादरम्यान एका वेगळ्या मुद्द्यालाही तोंड फुटले, ते म्हणजे अशा प्रकारच्या परदेशी प्राण्यांना भारतात आणायचे की नाही. काहींनी प्राणीसंग्रहालये बंद करण्याची मागणी केली, तर काहींनी तर सरळ या प्राण्यांसाठी छळछावण्या असल्याचा दावा केला. राजकारणाचा भाग सोडला तर प्राणी संग्रहालये हवीत की नकोत? असली तर ती कशी असायला हवीत? त्यातून नेमके काय साध्य होणार आहे? या प्रश्नांचा नेमका उहापोह व्हायला हवा. जगभरात प्राणीसंग्रहालये ही आकर्षणाची, लहान मुलांच्या भावविश्वाची केंद्रस्थाने असतात. त्यातून काहींना मनोरंजन मिळते, तर काहींनी प्रेरणा. पिंजर्यात प्राणी-पक्षी ठेवायचे की नाही याबाबत प्रवाद आहेतच. यातून मिळणार्या अवकाशाचा विचार केला जात नाही.
क्रॉफर्ड मार्केटच्या पक्षी बाजारात हिंडून आपले कुतूहल शमविणारा लहानगा सलीमनंतरच्या काळात डॉ. सलीम अली झाला. जगातील कुठल्याही शास्त्रज्ञांच्या पंक्तीत अत्यंत सन्मानाने जाऊन बसेल असे हे भारतीय नाव. ‘फॉल ऑफ अ स्पॅरो’ या त्यांच्या चरित्रात त्यांचा सगळा जीवनपट उलगडला आहे. त्यांनी लहानपणी छर्यांच्या बंदुकीने मारलेला पक्षी कोणता, हे समजण्यासाठी जंगजंग पछाडल्यानंतर ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ला डॉ. सलीम अली जाऊन पोहोचले आणि नंतर त्यांचा पुढचा प्रवास झाला. पशु-पक्षी हे मनोरंजनासाठी नसून ते सहचर आहेत आणि मानवी अस्तित्वा इतकाच त्यांचा विचार सन्मानाने केला पाहिजे, ही भावना दृढ करण्यात आपण फसलो आहोत. पेंग्विन मरण्यामागचे, राणीचा बाग अत्यंत गचाळ पद्धतीने चालविण्यामागे आणि महाराष्ट्रात एकही चांगले प्राणीसंग्रहालय नसण्यामागे हीच कारणे आहेत. प्राणीसंग्रहालये नेमकी कशासाठी, त्यांचे उद्देश काय? याची उत्तरे काढता न आल्याने त्याच्या अनुषंगाने येणार्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता आलेली नाहीत.
प्राणी पाळण्याच्या शास्त्राला वैज्ञानिक परिभाषेत ‘झुऑलॉजी’ म्हणतात, तर पक्षी पाळण्याच्या शास्त्राला ‘एव्हिकल्चर’ म्हणतात. या दोन्ही विज्ञानाच्या शाखा आहेत. आफ्रिका व युरोपात अनेक नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती वाचविण्याचे व त्यांना निसर्गात पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम या विज्ञान शाखांनी केले आहे. हा केवळ प्राणी वाचविण्याचा मुद्दा नाही. सामाजिक शास्त्राचे संशोधक मानवी वर्तनाच्या विविध प्रकारच्या छटांची कारण मीमांसा करताना मानवाच्या मुळातल्या प्राणीज भावनांचा विचार करायला लावतात. राष्ट्रवादाची आधुनिक संकल्पना ही भूमीशी जोडलेली आहे. ज्या भूमीशी आम्ही निगडित आहोत तिच्या रक्षणासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ. प्राण्यांच्या स्वत:च्या हद्दीचे रक्षण करण्याच्या मूळ भावनेचाच अधिक सुसंस्कृत आविष्कार आहे.
हवामान बदलाच्या संकटाची चर्चा आज मोठ्या प्रमाणावर होत असते. हवामान बदलाच्या परिणमाची झळ पहिल्यांदा या पशुपक्ष्यांना, मग पिकांना आणि पर्यायाने माणसांना बसते. प्राणीशास्त्राचा, त्यांच्या वागणुकीचा समूळ अभ्यास केलेला नसेल, तर पर्यायाने मानवासमोर उद्या उभ्या राहाणार्या संकटांचा अंदाज आपल्याला कसा बांधता येईल? ‘शास्त्र’ म्हणून या सगळ्याचा विचार आपल्याला कसा करता येईल, याचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे याचा विचार केला गेला नव्हता, असे नाही. बरेच मागे गेले तर प्राणीशास्त्राच्या सखोल निरीक्षणांच्या आधारावर आपल्याकडे केल्या गेलेल्या नोंदी या विलक्षण आहेत. अनुष्ठुप छंदात हंसदेवाने लिहिलेला ’मृगपक्षीशास्त्र’ हा ग्रंथ आजच्या भाषेत सांगायचे तर ‘ऑब्झर्वेशन बेस डॉक्युमेंट’चा उत्तम नमुना आहे.
पशुपक्ष्यांच्या विविध आचरणांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या कळपाबरोबर दोस्ती करणार्या युरोपियन प्राणीशास्त्रज्ञांच्या डॉक्युमेंटरी गाजतात. मात्र, भारतीय ऋषींनी याबाबत केलेले काम फारसे चर्चिले जात नाही. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांनीही पशुपक्ष्यांचे वर्गीकरण केले आहे. कळपाबरोबर मैत्री करून त्यांच्याबाबतचे ज्ञान उलगडणे भारतीयांना नवीन नाही. शास्त्रपरिसमाप्ती या शेवटच्या भागात पक्ष्यांशी अनेक वर्षे परिचय करून त्यांचे मनोगत जाणून घेण्याविषयी श्लोक लिहिला आहे. ‘पालकाप्यम’ या हत्तीच्या वंशांचा, त्यांच्यातील गुणांचा, प्रजननांचा, आजारांचा उहापोह करणारा ग्रंथ पालकाप्याने लिहिला आहे. अनेक वर्ष तो हत्तीच्या कळपातच राहिला. गंमत म्हणजे ’करेणुपुत्र’ या नावानेही त्याला संबोधले जाई. ‘करेणु’ शब्दाचा अर्थ हत्तीण. मृगपक्षीशास्त्रात नावासकट सिंहाच्या ६, वाघाच्या ३, हत्तीच्या १३, हरिणांच्या १८ अशा जाती सांगितल्या आहेत. हत्तीचे आयुर्मान १०० वर्षे, वाघाचे १६ वर्षे, सिंहाचे २० वर्षे अशा बर्याच आजच्या काळाशी मिळत्याजुळत्या नोेंदीदेखील इथे सापडतात. मृगपक्षीशास्त्रातील सिंहाच्या वर्तनाची वर्णने आजही नाकारता येत नाहीत. हे ज्ञान श्लोकस्वरूपात असले तरीही ती कविकल्पना नाही हे जाणवत राहते. आज आपल्याकडे सिंहाची व हत्तीची फक्त एकच प्रजाती शिल्लक आहे ज्याला ‘आशियायी हत्ती’ किंवा ‘आशियायी सिंह’ म्हणून ओळखले जाते. आता उरलेल्या प्रजातींचे काय? त्यावर कुणीही फारसा विचार केलेला नाही. संशोधन तर नाहीच नाही.
काळाच्या ओघात या प्रजाती नष्ट झाल्याचे नाकारता येत नाही. वनोपनिषदकार मारूती चित्तमपल्लींनीच याबाबतचे संशोधन उपलब्ध करून ठेवले आहे. याव्यतिरिक्त अन्य कुठेही या विषयाबाबत ठोस संदर्भ जतन करून ठेवल्याचे सापडत नाही. ग्रंंथाची रचना करताना हंसदेवाने प्राचीन ग्रंथांचा आधार घेतला आहे. काही राजांच्या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या आधारावरही काही भाष्य केले आहे. प्राणीसंग्रहालये ही आपल्याला नवीन नाहीत. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही प्राणीसंग्रहालयाचा उल्लेख आहे. हंसदेवापासून ते सलीमअलींपर्यंत खूप मोठ्या कालखंडाची पोकळी आपल्याकडे आहे आणि सलीमअलींनंतर तितक्या ताकदीचे कामकरणारा अद्याप तरी कोणीही झालेला नाही. पुन्हा मूळ मुद्द्याकडे यायचे तर या संदर्भाच्या आधारावर ‘मनोरंजनासाठी प्राणीशास्त्राऐवजी ज्ञानासाठी प्राणीशास्त्र’ याकडे वळावे लागेल. कृत्रिमअधिवासाची निर्मिती योग्य प्रकारे न केल्याने मेलेल्या पेंग्विनकडे पाहिले, तर या विषयातले आपले ज्ञान किती तोकडे आहे याचाच परिचय येतो. सिंगापूर-मलेशिया यासारख्या आपल्या वातावरणाशी मिळत्याजुळत्या असणार्या देशांतल्या अनेक प्राणीसंग्रहालयात हेंबॉल्ट पेंग्विन आनंदाने आपली प्रजा वाढविताना दिसतात. ज्या आईवडिलांना आपल्या मुलांना हजारो डॉलर खर्च करून आफ्रिकेला नेता येत नाही त्या मुलांना जिराफ पाहण्याचा अधिकारच नाही काय? प्राणिसंग्रहालये हवीत ती यासाठीच. प्राणीशास्त्रातल्या ज्ञानासाठी आपल्याला आशाळभूतपणे पाश्र्चिमात्यांकडे पाहावे लागते ते या विषयातल्या आपल्या काहीतरी खुळचट कल्पनांमुळेच.
-किरण शेलार