आकाशाशी जडले नाते- सूर्याचे वार्षिक भविष्य

    26-Oct-2016
Total Views |

“आजी, आबा, तुमच्यासाठी दिवाळीची भेट आणली आहे – हे घ्या, दिवाळी अंक!”, सुमितने आजी कडे  दिवाळी अंक दिले.

“वाह सुमित! अगदी योग्य भेट आणलीस. आता वार्षिक भाविष्या पासून वाचनाला सुरुवात करणार!”, अंक हातात घेऊन दुर्गाबाई म्हणाल्या.

“आबा, तुम्ही पण वाचता का हो ‘भविष्य’ वगैरे?”, सुमितने आबांना विचारले.

“माझं सोड रे, खुद्द सूर्य सुद्धा ग्रहस्थिती पाहिल्या शिवाय प्रवासाला जात नाही!”, आबा म्हणाले.

“काय आबा? आज तुमचा एकदम धक्के द्यायचा मूड दिसत आहे!”, सुमितने बरोबर कळ दाबली होती!

आबांचे डोळे चमकले, आणि त्यांनी लगेच पुढचा धक्का दिला – “हा घे अजून एक धक्का! तुमची  Breaking News की काय ते - पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही!”

“काहीतरीच! आम्ही पण शाळेत भूगोल शिकलोय म्हणलं.”, दुर्गाबाई अगदी न रहावून म्हणाल्या.

“आबा, इतके दिवस पृथ्वीची elliptical कक्षा काय अन् त्या कक्षेचे स्पंदन काय सांगितलेत आणि आज काय भलतच! असं कोड्यात बोलू नका!”, सुमित म्हणाला.

“अरे खरंच सांगतोय मी. पृथ्वी सूर्या भोवती फिरत नाही.

“कसं आहे, गुरु, शनी अशा वजनदार ग्रहांमुळे, सूर्यमालेच्या वस्तुमानाचा केंद्रबिंदू सूर्याच्या केंद्रात रहात नाही. मात्र सूर्यमालेचे ९९% वजन सूर्यातच असल्यामुळे हा केंद्रबिंदू अथवा barycenter, सूर्याच्या अगदी जवळ असतो.

“मुद्द्याची गोष्ट काय, तर सगळे ग्रह या barycenter भोवती फिरतात. आणि स्वतः सूर्यही या barycenter भोवती फिरतो. अर्थात संपूर्ण सूर्यमाला barycenter भोवती फिरते!” आबांनी फोड करून सांगितली.


“हां, मग तुमचं म्हणणं ठीक आहे! हा barycenter असतो कुठे?”, सुमितने विचारले.

“सुम्या, या dynamic जगात, तो barycenter एका जागी रहात नाही. होतं काय की, सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात. त्यामुळे barycenter सतत फिरत असतो. कधी गुरु आणि शनी दोन्ही एकाच दिशेला असतील तर barycenter सूर्याच्या केंद्रापासून खूप दूर जाते. जर गुरु सूर्याच्या एका बाजूला आणि शनी दुसऱ्या बाजूला असेल तर थोडाफार समतोल साधून barycenter सूर्याच्या केंद्राजवळ जातो. इतरही ग्रहांच्या स्थानाचा परिणाम barycenter वर होतो. पण गुरु आणि शनीच्या तुलनेत खूपच कमी. ह्या चित्रातून barycenter चा मागच्या काही दशकातला प्रवास पहा –


“एकूण ग्रहांच्या स्थानाप्रमाणे प्रमाणे barycenter ची जागा बदलत असते. आणि सूर्य या बदलत्या barycenter भोवती फिरत असतो.

“म्हणजे सूर्याचे भविष्यातील संभव्य स्थान आजच्या ग्रहस्थितीवर अवलंबून आहे! ग्रहस्थिती प्रमाणे सूर्यावरील डागांचा अंदाज सुद्धा वर्तवता येईल असे शास्त्रज्ञांना वाटते.

“केवळ आपल्याच सूर्यावर त्याच्या ग्रहांचा परिणाम होतो असे नाही. दूरचा सूर्य जर डोलतांना दिसला, तर शास्त्रज्ञ त्यावरून त्या सूर्याभोवती एखादा विशाल ग्रह फिरत आहे असा अंदाज बांधतात.” 

“हे कसे आहे सांगू का? आमच्या घरात बाबा म्हणतील तसं सगळं चालते. पण सर्व निर्णयांवर माझा आणि आईचा influence असतो. त्यातल्या त्यात जर माझे आणि आईचे एकमत असेल ना, तर आम्ही दोघे आमचंच खरे करतो!”, सुमितने घरातील analogy सांगितली.

“Perfect उदाहरण दिलेस! आमच्या घरात मात्र तुझ्या आजीचेच राज्य चालते! मी आपला उगीच कधीतरी माझे मत सांगतो, पण माझा influence प्लुटो इतका क्षुद्र असतो!”, आबा हसत हसत म्हणाले खरे, पण दुर्गाबाईंचा नूर पाहून त्यांनी लगेच विषय बदलला.

“ते असो. तुला अजून एक गंमत सांगतो – पृथ्वी barycenter भोवती सुद्धा फिरत नाही!

“गुरुत्वाकर्षण लहरी प्रकाशाच्या वेगाने धावतात. आणि पृथ्वी सूर्यापासून किंवा barycenter पासून साधारण ८ प्रकाश मिनिटे दूर आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पृथ्वी ८ मिनिटांपूर्वी  barycenter जिथे होता त्या स्थानाभोवती फिरते.”, आबा म्हणाले.

- दिपाली पाटवदकर

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121