अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या चर्चेची तिसरी व अखेरची फेरी संपली आहे. पहिल्या दोन फेर्यांच्या तुलनेत ही फेरी एका महासत्तेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला थोडीतरी शोभादायक झाली.
या चर्चेच्या दुसर्या फेरीत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांची एवढी उणीदुणी काढली होती की त्या फेरीनंतर लगेच ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, त्यात ही निवडणूक ही राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील निवडणूक आहे, अशा प्रकारच्या होत्या. आजवर ज्या पद्धतीने या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे तो पाहाता यापेक्षा वेगळा निष्कर्ष काढणे अवघड आहे. त्यामुळे मराठीतील एखाद्या संपादकाचा बालिश उत्साह वगळता, अमेरिकेतील लोकांमध्येही या निवडणुकीबद्दल फारसा उत्साह नाही.
वास्तविक पाहता हिलरी क्लिटंन यांचा डेमोक्रॅटिक पक्ष गेले आठ वर्षे सत्तेवर आहे; परंतु ओबामांनी निवडून येताना मोठ्या अपेक्षा निर्माण केलेल्या होत्या. तरी त्यांच्या कारकीर्दीच्या आधारावर मते मागता येतील, अशी हिलरी क्लिटंन यांची अवस्था नाही. अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे. मोठा गाजावाजा करून आणलेल्या ’ओबामा केअर’ या आरोग्यविम्याबद्दल प्रचंड असंतोष आहे. या विम्याच्या वाढत्या दराने लोक हैराण झालेले असून त्यातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दहशतवाद व अंतर्गत असंतोष याचा धोका कमी न होता वाढलेलाच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही ओबामांना फारसे यश मिळालेले नाही. अफगाणिस्तानचा प्रश्न सुटण्याची चिन्हे नाहीत. याउलट ‘इसिस’चा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रश्नावर मात करण्याची कुवत हिलरी क्लिटंन यांच्यात आहे, असा विश्वास कोणालाही वाटत नाही.
या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाला सत्तेवर यायला उत्तमसंधी होती, परंतु या पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे ज्या प्रकारे निवडणूक लढवित आहेत, ते पाहिले तर ते आपल्या वक्तव्याबद्दल, वागण्याबद्दल किती गंभीर आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे एक कुवत नसलेला उमेदवार आणि अध्यक्षपदाचे कोणतेही गांभीर्य नसलेला उमेदवार यांच्यातील ही लढत आहे. त्यामुळे स्वाभाविकच उमेदवारांच्या पसंतीपेक्षा नापसंतीचे आकडेच अधिक मोठे आहेत व निदान आज तरी क्लिटंन यांच्यापेक्षा ट्रम्प यांना नापसंत करणार्या मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे क्लिटंन निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीची शोकांतिका केवळ उमेदवारांच्या कुवतीपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. त्यांच्या निवडणुकीतील प्रचाराची पातळी अत्यंत खालच्या पातळीवर गेली असून त्यात प्रचारमाध्यमांनीही हातभार लावला आहे. ट्रम्प यांच्या उमेदवारीला प्रथमकोणी गांभीर्याने घेतले नव्हते, परंतु त्यांनी मांडलेल्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्याला अपेक्षेहून अधिक पाठिंबा मिळू लागला व रिपब्लिकन पक्षातील आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव करून ते निवडून आले. त्यांना आपण पाठिंबा देणार नाही, असे सांगणार्या रिपब्लिकन नेत्यांवरही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जो दबाव आला त्यामुळे रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनाही त्यांच्यामागे उभे राहाणे भाग पडले. त्यातच हिलरी क्लिटंन यांनी आपल्या शासकीय कामासाठी खाजगी ई-मेलचा वापर केला असल्याचे उघड झाले व त्याची चौकशी झाली. त्यात हिलरी क्लिटंन यांनी ३३ हजार ई-मेल रद्द करून टाकले. ते ई-मेल खाजगी होते, असे त्यांनी कारण दिले, परंतु त्याभोवतीचा संशय कायमआहे.
हिलरी यांची कुवत व हा उद्योग पाहता ट्रम्प यांना पराभूत करणे ही हिलरी यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे, असे प्रसारमाध्यमांच्या लक्षात आले व जणू काही ट्रम्प यांना पराभूत करणे ही आपली जबाबदारी आहे, असे समजून तशी अधिकृत भूमिका घेतली. यामुळे ट्रम्प पिसाळले व त्यांनी प्रसारमाध्यमांवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे ही लढत केवळ ट्रम्प आणि क्लिटंन यांच्यात न राहाता, ट्रम्प विरुद्ध प्रसारमाध्यमे व हिलरी क्लिटंन अशी झाली आहे व ‘वॉशिंग्टन पोस्ट’ व ‘न्यूयॉर्क टाईम्स’ आदी प्रमुख वृत्तपत्रे, वाहिन्या यांनी उघडपणे ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेतली.
त्यातूनच आपल्या स्थानाचा उपयोग करून आपण कोणत्याही स्त्रीचा उपभोग घेऊ शकतो, अशा ट्रम्प यांनी मारलेल्या बढायांचे व्हिडिओ प्रसारमाध्यमात आले. या व्हिडिओमुळे ट्रम्प दुसर्या फेरीत आपोआप बाद होतील, असा त्यांचा अंदाज होता. पण ट्रम्प त्यांच्यापेक्षा सवाई निघाले. चर्चेच्या दुसर्या फेरीत हिलरी क्लिटंन यांनी त्या व्हिडिओंचा प्रश्न उपस्थित करताच, ‘‘मी केवळ तसे बोललो, पण बिल क्लिटंन तसे वागले व त्याचे तुम्ही समर्थन केले,’’ असे सांगून त्यांचा आवाज बंद केला.
या फेरीत देशांसमोरील मुद्द्यांवर चर्चा होण्यापेक्षा ‘माझ्यापेक्षा तू किती वाईट आहेस’ असे सांगण्यासच दोघांनीही त्या चर्चेचा उपयोग केला. ट्रम्प यांनी अनेक वर्षे कर भरलेला नाही, या आरोपावर क्लिटंन यांनी ई-मेल रद्द केल्याचा प्रत्यारोप ट्रम्प यांनी केला. अध्यक्षपदाच्या प्रचारात आपण नव्या पिढीसमोर कोणते उदाहरण ठेवत आहात? असा प्रश्न या चर्चेच्या प्रारंभीच एका श्रोत्याने विचारला, पण त्या प्रश्नाला दोघांनीही बगल दिली. आपण प्रकाशित केलेल्या व्हिडिओचा व्हावा तसा परिणाम न झाल्याने प्रसारमाध्यमांनी नव नव्या स्त्रियांना आणून आपल्यावर ट्रम्प यांनी कसा अतिप्रसंग केला याच्या कहाण्या द्यायला सुरुवात केली.
या निवडणुकीतील प्रचाराने एवढी खालची पातळी गाठली होती. त्यामुळे तिसरी फेरी आणखी किती खालची पातळी गाठू शकते, असा अंदाज सर्वजण बांधत होते. परंतु ज्या प्रकारे ही फेरी हाताळली गेली त्यामुळे या निवडणुकीची थोडीतरी पत राखली गेली, असे म्हटले पाहिजे.
या फेरीत साधारणपणे सहा गटातील मुद्द्यांबाबत चर्चा झाली. अमेरिकेतील नागरिकांना शस्त्रे बाळगण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यावर बंधने आणावीत का? व गर्भपाताचा अधिकार केवळ मातेलाच असला पाहिजे का? या दोन्ही बाबतीत रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षाच्या वेगळ्या भूमिका आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाला शस्त्रे बाळगण्याच्या अधिकारावर बंधने हवी आहेत, तर गर्भपाताच्या आईच्या अधिकारावर शासकीय नियंत्रणे नको आहेत. आर्थिक स्थिती सुधारण्याची उपाययोजना हा प्रश्नांचा दुसरा गट होता. त्यात ट्रम्प यांना कर कमी करून उद्योगांना चालना देणारे धोरण हवे आहे, तर क्लिटंन यांना कर वाढवून सामाजिक व मूलभूत बाबींवरचा खर्च वाढवून ती करायची आहे. तिसरा गट अमेरिकेत येणार्या अन्य देशातील व्यक्ती व वस्तू यांच्याबाबत होता. यात ट्रम्प यांची भूमिका कडक आहे. सुरक्षितता व अमेरिकेतील नोकर्या व उद्योगांचे रक्षण याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे, तर क्लिटंन यांची भूमिका मानवतावादी आहे. ‘इसिस’चा प्रश्न प्राधान्याने हाताळला पाहिजे व त्यासाठी रशियाची मदत घेतली पाहिजे, असे ट्रम्प यांना वाटते, तर या निवडणुकीच्या निमित्ताने रशिया अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करीत आहे व ट्रम्प त्यांचे हस्तक म्हणून कामकरीत आहेत, असा आरोप हिलरींनी केला. प्रश्नांचा पाचवा गट या दोघांवर होणार्या व्यक्तिगत आरोपांसंबंधी होता. त्यावर उत्तर देण्यापेक्षा तो डावलणे हेच दोघांनी पसंत केले. सहाव्या गटातील प्रश्न निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबद्दलचा होता. त्यावर ट्रम्प यांनी निःसंदिग्ध उत्तर दिले नाही.
एकूणच या निवडणुकीत आपण मानवतावादी, स्त्रिया व समाजातील दुर्बल घटक यांचे संरक्षक असून ट्रम्प हे कायद्याचा, नीतिमत्तेचा, मानवतेचा धरबंध नसलेले अमेरिकन विकृत भांडवलशाहीचे प्रतीक आहेत, असा क्लिटंन यांचा दावा असून हिलरी या कुवत नसलेल्या, आपल्या स्थानाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करून तो पुरावा नष्ट करणार्या, खोट्यारड्या असून देशाला खड्ड्यात घालणारी ओबामा यांचीच धोरणे पुढे चालविणार्या आहेत, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. यावर लोकांची प्रतिक्रिया लेखाच्या प्रारंभी दिलीच आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वाधिक पसंतीचा अध्यक्ष कोण, यापेक्षा सर्वाधिक नापसंती असलेला उमेदवार पराभूत होईल असे दिसते व त्यात आजतरी ट्रम्प हे आघाडीवर आहेत.
भारताच्या दृष्टीने विचार केला तर क्लिटंन यांचे व्यक्तिगत मत पाकिस्तानच्या बाजूने झुकलेले राहील हे निश्चित आहे. क्लिटंन कुटुंबीयांची बेनझीर भुट्टो यांच्याशी मैत्री होती व त्याचा त्यांच्यावरचा प्रभाव अजूनही कायम आहे. ट्रम्प यांच्यावर विविध भानगडींची शस्त्रे घेऊन रोज प्रसारमाध्यमे नवे प्रहार करीत असली तरी त्यांच्या मूळ समर्थकांवर कोणताही परिणाम झालेला नाही, उलट प्रसारमाध्यमांच्या दबावाखाली ज्या रिपब्लिकन नेत्यांनी पाठिंबा मागे घेतला त्यांना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करणे भाग पडले. ट्रम्प यांनी हिंदू मतदारांच्या सभेत मोदींना पाठिंबा देणारे भाषण करून भारताच्या दहशतवादाच्या लढ्याला पाठिंबा दिला असला तरी त्यांच्या राजकीय परिपक्वतेबद्दल कोणालाही खात्री वाटत नाही. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी प्रभावित झालेले काही उत्साही व स्वतःला विचारवंत म्हणवणारे पत्रकार छू... म्हणून सोडल्यासारखे ट्रम्प यांच्या विरोधात आग ओकत आहेत. पण भारताच्या दृष्टीने विचार केला, तर हल्लीच्या काळात आपल्याला डेमोक्रॅटिक अध्यक्षापेक्षा रिपब्लिकन अध्यक्षच अधिक फायद्याचे ठरले आहेत, या वास्तवाकडे दुर्लक्ष न केलेले बरे.