
काही आजार असे असतात की एकदा त्यांची लागण झाली की ते बरेच होत नाहीत. कितीही प्रतिजैविके दिली, चांगल्या वातावरणात नेऊन ठेवले तरीही रोग्याच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नाही. त्याचे कारण हे असले आजार त्याच्या जनुकीय रचनेतच जाऊन घर करतात. जनुकीय आजारांचे वैशिष्ट्य असे की एरवी त्याचे विषाणू निद्रिस्त असतात, पण काही विशिष्ट प्रसंगी ते सक्रिय होतात. काही वेळा तर ते अत्यंत आक्रमक पद्धतीने सक्रिय होतात. या स्थितीत रोगाचे निदान चटकन करता येते. कारण त्याची बाह्य लक्षणे सक्रिय असतात. रोगी पाहूनच चटकन त्याचे निदान करता येते. लोकशाहीने आपल्याला दिलेल्या विचार व आचार स्वातंत्र्यामुळे अशा रोग्यांचे फारच फावले आहे. खरे तर रोग्याने योग्य उपचार घ्यावे आणि घरी आरामकरावा. मात्र उरीचा हल्ला किंवा त्यानंतर भारतीय सैन्यदलाने उगवलेला खणखणीत सूड असो; असे काही झाले की आपल्याकडच्या अशा रोग्यांच्या जनुकीय रचनेतले विषाणू वळवळायला लागतात. कधी मानवता तर कधी विद्वत्तेचा आव आणून ही मंडळी वाट्टेल ते बरळायला लागतात. अखिल मानवतेचा ठेका घेतलेले काही असेच रोगी देशात बर्याच ठिकाणी बोकाळलेले आहेत. त्यात काही पत्रकार आहेत, काही संपादक आहेत, फेलोशिपवर फुलणारे बांडगुळी विचारवंत आहेत. मनमोहन सिंगांची राजसत्ता गेली तरीही हे राजधानी सोडायला तयार नाहीत. देश ही संकल्पनाच न मानणारी आणि सतत कुणीतरी कुणाचे तरी शोषण करीत आहे अशा समजाच्या अफूत ही मंडळी तरंगत फिरत असतात. काश्मीरमध्ये बुर्हान वानीचा मुडदा पाडल्यापासून जी काही रडारड या मंडळींनी सुरू केली ती परवाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाला तरीही थांबायला तयार नाही. नितळ काही शोधण्यापेक्षा या मंडळींना सतत छिद्रंच दिसत असतात. या छिद्रांमध्ये बोट घालून शंका उपस्थित करण्यासाठीच की काय काही संपादकांना गलेलठ्ठ पगार आणि परदेशवार्यांची निमंत्रणे मिळतात.
आज देशातील सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय जवानांच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या जात आहेत. वृत्तपत्रांची पहिली पाने त्याने भरून गेली आहेत. मात्र पत्रकारितेतल्या धैर्याचा वारसा सांगणार्या इंग्रजी दैनिकाने युद्धामुळे विस्थपित होऊ शकणार्यांचे करूण चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा भलामोठा फोटोच त्यांनी प्रकाशित केला आहे. देशासाठी हजारो सैनिक आपले घरदार सोडून सीमांचे रक्षण करतात. त्यांच्यामुळेच इथे यांना अक्कल पाजळायला सुरक्षित संधी मिळते. युद्धामुळे होणारा विध्वंस कुणालाच नको असतो. मात्र समोरच्याला योग्य वेळी योग्य उत्तर दिले नाही, तर आपण दुबळे समजले जातो व पलीकडच्यांचे मनोधैर्य उंचावते. पाकिस्तानच्या बाबतीत तर काही बोलायलाच नको अशी स्थिती आहे. भारतीय सैन्य काहीच उत्तर देत नाही म्हटल्यावर पुढच्या हल्ल्याच्या तयारीला ते लागले असते. समोरून केलेल्या युद्धात भारताला आपण हरवू शकत नाही हे पाकिस्तानला पुरेपूर कळून चुकले आहे. राजकीय नेतृत्व कोणत्याही पक्षाचे असो. पाकिस्तानकडून हल्ला झाला की भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याची हमखास लांडगेतोड करते. पर्याय म्हणून पाकिस्तानने दहशतवाद्यांचा आधार घेऊन ही साठमारी चालविली आहे. अशा वेळी सडेतोड उत्तर दिले नाही, तर या कारवाया वाढतच जातात. मात्र निरनिराळ्या बौद्धिक चर्चांमध्ये आपली दिवाळखोरी दडवायला जाणार्यांना हे समजणे जरा कठीणच आहे. गेल्या वर्षी मनोहर पर्रिकरांनी ‘डीप असेट’ ही संज्ञा चर्चेत आणली होती. शत्रू राष्ट्रात कुठलीही कारवाई करण्यासाठी तिथले नागरिकही आपल्याला निरनिराळ्या कारणांनी मदत करू शकतात. अशा व्यक्तींना ‘डीप असेट’असे म्हटले जाते. हे छिद्रान्वेषी अनेकदा पलीकडच्यांचे ‘डीप असेट’ असल्यासारखे वागत राहतात. याच माध्यमसमूहाच्या मराठी भावंडाच्या संपादकाच्या विद्वत्तेवर तर काय बोलावे? मराठी पत्रकारितेतला अग्रलेख परत घेण्याचा एकमेव बौद्धिक चमत्कार यांनी करून दाखविला आहे. आपल्या अग्रलेखात हे महाशय पाकिस्तानला धडा शिकविण्याची अपेक्षा ठेवणार्यांना गणंग ठरवून मोकळे झाले आहे. घरचा कर्ता पुरुष सैनिक म्हणून धारातीर्थी पडला असताना स्वत:चे दु:ख सावरून देशावर झालेल्या या हल्ल्याचा बदला घ्या, असे आसवांनी भरलेल्या डोळ्यातच अंगार पेटवून सांगणार्या माता भगिनी यांच्या लेखी ‘भगतगण’ आहेत. मोदी सरकार आणि पाक सरकार यांच्या लेखी ‘गोंधळलेले’ आहेत. आधी आपण गोंधळलेले होतो, आता पाक गोंधळलेला असे यांचे आकलन. यांना चीनचा इशारा लक्षणीय वाटतो. युद्धज्वर आपल्याकडे पसरेल याची यांना भीती वाटते. आज हा युद्धज्वर का पसरला? याची यांना काहीच फिकीर नाही. किळस यावा अशी यांची ही मांडणी रोज सकाळी दिवस सुरू होताना पाहावी लागते. हे असले विचारवंत जिथून घडतात त्या जेएनयुमध्येही असलीच थेरं सुरू आहेत. तिथे जमलेले विद्यार्थी अभ्यास सोडून भारताने पाकिस्तानशी युद्ध न करता संवाद सुरू करून प्रश्न सोडवावा यासाठी हातात फलक घेऊन बसले आहेत. हे लोक जेएनयुत प्रवेश घेतल्यानंतर पास कधी होतात आणि पास झाले नाहीच, तर तिथे काय करीत असतात हे समजायला मार्ग नाही. डावे-उजवे विचार समजू शकतो पण सैन्य, देशाची अस्मिता यासारख्या गोष्टी या सगळ्याच्या उपर आहेत. हिंसा नको हे मान्यच, पण हिंसाच ज्याच्या कामाचा मुख्य भाग आहे, असेच अंगावर आले तर आपण काय करणार?
काश्मीरमधला हिंसाचार कठोर कृतीने हाताळायला सुरुवात केल्यानंतर तिथल्या पॅलेट गनच्या वापरावरही याच छिद्रान्वेषी मंडळींनी गदारोळ चालविला होता. तो इतका होता की, न्यायालयालाही त्याची दखल घ्यावी लागली. पाठीत छर्रे लागलेल्या मुलांची छायाचित्रे याच मंडळींनी प्रकाशित केली होती. त्यावर चर्चा झडल्या. प्राइमटाईममध्ये हे कसे अमानुष आहे वगैरे सांगितले गेले. आता मुळात शालेय विद्यार्थी मोर्चात का सहभागी झाले होते? त्यांना तिथे पोहोचायला कोणी भाग पाडले? त्यांच्यामागून कोणी दहशतीचे राजकारण करीत होते या सगळ्याची चिकित्सा का केली गेली नाही? ज्या महिला रस्त्यावर उतरून भारतविरोधी नारे, घोषणा देत होत्या त्यांना पाकिस्तानात जायचे आहे. त्यांचे प्रबोधन करायची जबाबदारी या छिद्रान्वेषींना मान्य नाही. बलात्कार झालेल्या स्त्रीला बलात्कारासाठी जबाबदार मानून जिथे दगडांनी ठेचून मारले जाते, पाठ्याक्रमाच्या जागी लहान मुलांच्या हातात कुराणाची प्रत देऊन जगाचा द्वेष करायला शिकविले जाते अशा पाकिस्तानमध्ये जाऊन ही मंडळी काय करणार? मानवतेचा ‘म’ देखील माहीत नसलेली अश्मयुगीन दाढीधारी माणसे तिथे सत्ता चालवितात. काश्मीरची आजादी म्हणजे या काश्मिरी जनतेला नरकात लोटण्याचा रेखीव आराखडा आहेे. हे देखील या मंडळींना कळत नाही. ‘युद्ध नको’चे साहित्य प्रसविणारे लेखक व कवीही आता मुसमुसू लागले आहेत. पंतप्रधानांच्या छातीची उठसूठ मापे काढायला निघालेले हे लोक फुकट सल्ले देण्यात पटाईत झाले आहेत. मोदींनी या सगळ्यांना चांगलाच गुंगारा दिला. पाकिस्तानला ज्या बुचकळ्यात मोदींनी ढकलले आहे त्यापेक्षा खोल बुचकळ्यात हे पाखंडी जाऊन पडले आहेत. मोदींनी एका बाजूला सिंधूचे पाणी, विशेष दर्जा काढून घेण्याची तयारी अशा बाबींकडे पाकिस्तानचे लक्ष वेधून घेतले आणि दुसर्या बाजूला दहशतवादी तळावर हल्लादेखील केला गेला. गाफिल ठेवून गारद करण्याची त्यांची ही नीती या विद्वानांच्या अकलेच्या पलीकडली आहे. पण लोकशाही ही एक गोष्ट आहे की, तिथे तुम्हाला हवा तो नेता निवडता येतो आणि नको असलेल्या लोकांचे ऐकत बसावे लागते. मुक्त माध्यमांमध्ये या मंडळींवर होणारी टीका आणि त्याची होणारी कुचेष्टा पाहिली तर नियतीचा काव्यगत न्याय ही कल्पना मानावीच लागते.