जो बुंद से गई.....

    02-Oct-2016   
Total Views |


एका ताकदीच्या व्यंगचित्रामुळेच उभ्या राहिलेल्या व आकारास आलेल्या शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाला व्यंगचित्रामुळेच राजकीय कोंडीत अडकावे लागले, याला काय म्हणावे?

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मुखपत्रात आक्षेपाहर्र् व्यंगचित्र प्रकाशित झाले होते. व्यंगचित्राचा विषय मराठा मोर्चावर भाष्य करणारा नसला, तरीही त्यात जोडलेला संदर्भ मराठा मोर्चाचाच होता. शिवसेना जातीय राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध नाही. शिवसेनाप्रमुखांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणेही जातीय राजकारण केल्याचे आठवत नाही. इथेही खरं तर तसेच होते. व्यंगचित्राचा उद्देश निखळ असला तरीही राजकीयदृष्ट्या त्याचे ‘टायमिंग’ पूर्णपणे चुकले होते. प्रसारमाध्यमे व त्यातला मजकूर हे समाजात घडणार्‍या घटनांचे प्रतिबिंब असते. चालू घडामोडी पाहण्यासाठीच लोकं प्रसारमाध्यमांकडे जातात, अशावेळी अलिप्त असे काही असूच शकत नाही. सेनेच्या मुखपत्राचे चालक, पालक व मालक सेनेच्या रचनेप्रमाणे स्वतः पक्षप्रमुख व अन्य एक शिवसेनेचे नेतेच आहेत. लोकशाहीत मुखपत्राचा उपयोग आपले राजकीय तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला जातो. स्वतः उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांच्या काळात या मुखपत्राचा त्यांनी अत्यंत आक्रमक उपयोग करून घेतला. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सत्तेचे न जमलेले हिशेब फेडण्याचा हे मुखपत्र माध्यम झाले आहे. राज्यात सत्तेत सहभागी असूनसुद्धा खोडसाळ भाषेत राज्यातल्या नेतृत्वावर टीका करायची. स्वत:चे कर्तृत्व नसताना केंद्रातील सरकारवर टीका करायची. सूर अपेक्षेचा, मात्र उद्देश संशय घेण्याचा. अशा स्वरूपाचे मथळे, बातम्या, लेख व अग्रलेख मुखपत्राच्या संपादकांनी प्रकाशित केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत शिवसेना नेते सत्तेच्या सोन्याच्या ताटाचा उल्लेख वारंवार करायचे. नियतीचा खेळ असा की, महाराष्ट्रातील मतदारांनी हे सत्तेचे ताट भारतीय जनता पक्षासमोर वाढले. त्या दिवसापासून उरीच्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे मुखपत्राचे किती तरी मथळे असेच द्वेषपूर्ण आहेत. माध्यम एकदा नकारात्मक पद्धतीने वापरायचे ठरले की, त्याची वाटचाल नकारात्मकतेच्या गर्तेकडेच सुरू होते. दुर्दैवाने, मुखपत्राचेही तसेच झाले आहे. माध्यमांची भूमिका प्रबोधनाची न राहता विखारी प्रचाराची झाली की, माध्यमातल्या प्रबोधनात्मक मजकुराकडे दुर्लक्ष होते. या व्यंगचित्राच्या बाबतीत तसेच झाले. कुठल्याही माध्यमात प्रकाशित होणारा मजकूर संपादकाकडून तपासला जातो. इथे तसे झाले नाही, कारण मुखपत्राच्या संपादकांना भाजपद्वेषाच्या काविळीने पछाडले आहे. दुसरे काही पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. पर्यायाने चुकीच्या वेळी हे चुकीचे व्यंगचित्र प्रकाशित झाले. व्यंगचित्राचे ‘टायमिंग’ चुकले. साधारणतः अशी चूक झाल्यानंतर संपादक माफी मागून वादावर पडता टाकतात. मात्र, अशी कुठलीही माफी मुखपत्राने मागितली नाही. मोर्चेकरांमध्ये या व्यंगचित्राच्या निमित्ताने रोष निर्माण होऊ लागला आणि राज्यभर त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. यानंतरही संपादकांनी माफी न मागता व्यंगचित्रकारालाच माफी मागायला लावली. राजकीय पक्ष म्हणून शिवसेना जसजशी कोंडीत सापडायला लागली, तसतशी सेना नेत्यांची विधाने येऊ लागली. माफी न मागता शिवसेनेने जे केले ते राजकारणच होते. ‘मोर्चात फडकणारे भगवे झेंडे पाहून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पोटात दुखत आहे व तेच हा राजकीय कट करीत आहेत,’ असा दावा पहिल्यांदा सेनेकडून करण्यात आला. आधी काठावर बसलेली शिवसेना मग एकदममोर्चाची पाठराखी झाली. ‘शिवसेना मराठा समाजाच्या पाठीशी ठाम असून मराठा एकजुटीत विघ्न आणणार्‍यांकडे लक्ष देऊ नका,’ अशीही विधाने सेना नेत्यांकडून केली गेली. खरं तर महाराष्ट्रात सध्या होणार्‍या मोर्च्यांचे कुठल्याही राजकीय पक्षांशी काहीही घेणे-देणे नाही. शिवसेनेच्या पाठिंब्याची तर त्यांना मुळीच गरज नाही. परंतु, आपल्या नेत्याला माफी मागायला लागू नये म्हणून शिवसेना वेळ मारून नेत राहिली. मोर्च्यांच्या महिनाभराच्या काळानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. कुठल्याही पक्षाचे राजकीय नेतृत्व हे त्याच्या आकलन क्षमतेमुळे तरते किंवा विरते. नेत्याने माफी मागणे हा पक्षाचा, पक्षाच्या विचारसरणीचा पराभव मानला जातो. शिवसेनेच्या आजतागायतच्या इतिहासात उद्धव ठाकरे हे क्षमायाचना करणारे पहिलेच नेते ठरले आहेत. मधल्या काळात न जमलेले राजकीय डावपेच खेळल्याशिवाय त्यांनी लगेचच ही माफी मागितली असती, तर तो त्यांचा प्रांजळपणा ठरला असता. व्यंगचित्रावरून राजकारण खेळले गेले हे खरेच, पण त्याचा आवाका सेनेच्या नेतृत्वाला आला नाही. सेनेतूनच फुटलेल्या राणे वगैरेंसारख्या मंडळींनी यानिमित्ताने दबाव निर्माण केला व त्याला सेना नेतृत्व बळी पडले. पक्षप्रमुखांनी माफी मागण्यापूर्वी सेना नेत्यांनी ज्या मुलाखती दिल्या, त्या याच तोकड्या राजकीय आकलन शक्तीचे लक्षण होत्या. आज जी माफी त्यांनी मागितली त्यावरून बिरबल-बादशहाच्या विनोदी कथांमधील एक विनोदी कथा आठवते. गालिच्यावर सांडलेला अत्तराचा थेंब टिपण्यासाठी बादशहा खाली वाकला व तो थेंब टिपण्याचा प्रयत्न करू लागला. चाणाक्ष बिरबलाने हे मजेशीर दृश्य पाहिले. बिरबलाने आपल्याला असे करताना पाहिल्याचा बादशहाला खूप राग आला. दुसर्‍या दिवशी त्याने राज्यात अत्तराचे हौद भरून ते लोकांसाठी खुले केले व आपली गेलेली अब्रू झाकण्याचा प्रयत्न केला. यावर बिरबलाने म्हटले, ‘‘हुजूर, जो बुंद से गई वो हौद से नही आती.’’

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121