“Hi आई! Office मध्ये आज एक self-improvement training होते. त्यांनी काय सांगितले माहित आहे? आनंदी राहाण्याचा आवश्यक गुण – कृतज्ञता. आपल्याला असे वाटते ना - जी माणसे आनंदी असतात, ती कृतज्ञ असतात. पण त्यांचं म्हणणं असे - जी माणसे कृतज्ञ असतात, ती आनंदी असतात.” Office मधून आलेल्या प्रितीने नेहेमी प्रमाणे दिवसभरातल्या घटनांबद्दल भरभरून बोलू लागली.
“हा तर उत्तम संदेश आहे! आणखीन काय सांगितले?", आईने चहाचा कप प्रीतीकडे देत विचारले.
“अग, रोज रात्री झोपतांना दिवसभरात घडलेल्या ५ चांगल्या गोष्टी लिहून काढायच्या. ‘Gratitude Journal’ मध्ये. 'माझ्यावर नेहेमी अन्याय होतो' या दृष्टीतून बाहेर येऊन, काय चांगलं घडलं ते मोजायला लागतो. ज्या गोष्टी आपण आपला ‘अधिकार’ मानतो, त्या आपल्याला मिळालेली 'gift' आहे, असे पाहायला शिकतो. ज्यांच्यामुळे आजचा दिवस चांगला गेला त्यांना मनातुन धन्यवाद द्यायला लागतो. आपल्या वाट्याला आलेल्या सुंदर गोष्टी दिसायला लागतात. आणि आपण अधिकाधिक आनंदी होऊ लागतो." प्रीतीने माहिती पुरवली.
“कृतज्ञतेची भावना मनात कशी रुजवायची?”, आईचा पुढचा प्रश्न.
"हो! त्यांनी एक युक्ती सांगितली, बरे! आपली भाषा बदलली की भाव बदलतो म्हणे. जसं 'रोज उठून office ला जायला लागते!' असे म्हणण्या पेक्षा जर, 'मला रोज office ला जायला मिळते' असं म्हटलं की मूडच बदलतो."
आई म्हणाली, “प्रीती, लहानपणी आम्हा भावंडाना आजोबा रोज गीतेचा एक अध्याय वाचायला लावायचे. आम्ही कपाळाला आठ्या घालून कसातरी एक अध्याय म्हणायचो! दादा तर म्हणायचा - काय गरज होती अर्जुनाला इतके प्रश्न विचारायची? उगीच आम्हाला हे सगळं वाचायला लागते!' अर्थातच, या attitude मुळे आमच्या मनात राग असायचा.
“पुढे इतक्या वर्षांनी ज्ञानेश्वरी वाचताना, आमच्याच वयाच्या ज्ञानेश्वरांचे, अर्जुना बद्दलचे विचार वाचले, आणि स्वतःची लाज वाटली.
“अर्जुना बद्दल ज्ञानेश्वर म्हणतात - अर्जुनाने प्रश्न विचारले, म्हणून आज आम्हाला हा अमृताचा ठेवा मिळाला. एका चातकाची कणव आल्यामुळे मेघ पाऊस पडतो, पण त्या पावसाने सर्व जीवांचे कल्याण होते. तसे एका अर्जुना मुळे संपूर्ण जगाचा उद्धार झाला! आपल्याकडे अर्जुना सारखी भक्ती नाही, त्याच्या सारखे प्रश्न पडले नाहीत, त्याच्या प्रमाणे आपल्याला सखा म्हणून कृष्ण मिळला नाही … तरी आपल्यावर ह्या बोधाचा वर्षाव झाला!”समाजाने ज्ञानेश्वरांचा छळ करून सुद्धा, त्यांच्या मनात त्याबद्दल राग, संताप काही नाही! समाजाकडून काय मिळालं असेल तर फक्त अपमान आणि अवहेलना. आणि तरी सुद्धा ज्ञानेश्वर म्हणतात ‘आनंदे भरीन तिन्ही लोकं!’ कुठून आला असेल त्यांच्याकडे इतका आनंद? त्या आनंदाचा एक सरोत, त्यांची कृतज्ञतेची भावाना असणार!
-दिपाली पाटवदकर