“सुमित, मागे चंद्रावरून आपण पृथ्वीचा डोलणारा अक्ष पहिला. आज पुन्हा चंद्रावरून पृथ्वीचे निरीक्षण करू.”, आबा म्हणाले.
“चला, आबा चला, घाई करा! चांदसे होकर सडक जाती है, वही पे आगे जाके अपनी observatory है|”, सुमित गाण्यात म्हणाला, “आबा, हे सारखं सारखं चंद्रावर जाऊन मी astronaut जरी झालो नाही ना, तरी कवी मात्र नक्की होणार आहे!”
“पण सुम्या, असली observatory ची गाणी ऐकून कोणताही ‘चांदसा चेहेरा’ भुलणार नाही बरे!”, दुर्गाबाई म्हणाल्या, “अशा गाण्याने फक्त ‘चांदसे डोकं’ झालेले माझे शंकरराव खुश होतील हो!”
आबा हसत हसत सुमितला म्हणाले, “काळाचा महिमा दुसरे काय? असो. आपण आपलं चंद्रावर जाऊन पृथ्वीचे निरीक्षण करू!”
“सुमित पृथ्वीचा अक्ष eliptic ला २३.५ अंश कललेला आहे. हा असा -
“पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे आपल्याला सूर्य-चंद्राचा उदयास्त दिसतो. रात्री चांदण्यांचा पण उदय आणि अस्त दिसतो. म्हणजे खरे तर संपूर्ण आकाशच पृथ्वीभोवती गोल फिरल्याचा भास होतो.
“आकाश गोल फिरते, तर त्याला एक केंद्र बिंदू असणार. पृथ्वीचा अक्ष आकाशात जिथे पाहतो, तिथे हा केंद्रबिंदू आहे. पृथ्वीचा अक्ष उत्तरेच्या आकाशातील ध्रुव ताऱ्याकडे पाहतो. त्यामुळे संपूर्ण आकाश ध्रुव ताऱ्याभोवती फिरतांना दिसते. आपण जर ३-४ तासांचा exposure चा उत्तर आकाशाचा फोटो काढला तर असे दिसते की – ध्रुव तारा स्थिर आहे आणि अवती भवातीचे तारे त्याच्या भोवती फिरत आहेत. हे असे –
”असा एक केंद्र बिंदू दक्षिण आकाशात पण आहे का?”, सुमितने विचारले.
“Right! दक्षिण आकाशात पण असाच केंद्र बिंदू आहे. एकतर आपल्या सारख्या उत्तरगोलार्धात राहणाऱ्यांना दक्षिण आकाश दिसत नाही. आणि अधिकांश लोकं उत्तरगोर्लार्धात राहत असल्याने, फक्त उत्तर ध्रुव तारा माहित असतो.
“तर सुमित, इथे प्रत्येकाला गति आहे, मग या आकाशाच्या केंद्र बिंदूने का बरे गतिमान असू नये? मग काय! हा पठ्ठ्या पण स्वस्थ न बसता फिरतो!
“भोवऱ्याचा अक्ष ज्याप्रमाणे डगमगतो, त्याप्रमाणे पृथ्वीचा अक्ष डगमगतो. त्यामुळे आकाश ज्या केंद्रबिंदू भोवती फिरते, तो केंद्रबिंदू फिरतो. आणि मग ध्रुव तारा अढळ रहात नाही. केंद्र बिंदूच्या गोल मार्गावर जो तारा येतो तो ध्रुव तारा होतो!
“म्हणजे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या तारा ‘ध्रुव’ तारा होत्या?”, सुमितने विचारले.
“अगदी योग्य निष्कर्ष आहे तुझा! पण हा बदल अत्यंत सूक्ष्म आहे, ७२ वर्षात १ अंश सरकत, २६,००० वर्षात एक फेरी पूर्ण होते! हा बदल एका आयुष्यात लक्षात येण्यासारखा नाही. हजारो वर्ष आकाश निरीक्षण करून, अभ्यासपूर्वक नोंदी ठेवणाऱ्या समाजालाच हा बदल कळू शकतो.
“आपल्या पूर्वजांनी आकाश निरीक्षण केले होते. नोंदी ठेवल्या होत्या. आणि सामान्यांना कळण्यासाठी त्या गोष्टीत ओवल्या. जशी आपली पुराणातील ध्रुवबाळाची गोष्ट. ती गोष्ट ‘ध्रुव तारा अढळपदावर विराजमान झाला’ या आकाशातील घटनेची आठवण आहे!”, आबा म्हणाले.
“म्हणजे लहानपणी मी जी ध्रुवबाळाची गोष्ट ऐकली ती समाज मनातली २५,००० वर्ष जुनी आठवण असू शकते?!”
“का नाही? चांदण्यांची, नक्षत्रांची नावे फार पूर्वी दिली गेली आहेत. कधीतरी तुला चांदण्यांच्या नावांच्या गोष्टी सांगेन. मला आठवण कर.”, आबा म्हणाले, “आणि अजून एक म्हणजे, या बदलत्या धृवाचे अनेक परिणाम होतात – जसे सायन-निरायन राशी, सप्तर्षी कॅलेंडर इत्यादी. ते सुद्धा आपण पुन्हा कधीतरी पाहू.”, आबा म्हणाले.
“सुमित, जेवायला थांबतोस का रे?”, पाने मांडत दुर्गाबाईनी विचारले.
“नाही आजी. मला आज मित्रांबरोबर dinner आहे.” डोळ्यावरचे केस ऐटीत मागे करत सुमित म्हणाला.
“जा सुमित जा! मी माझी tragedy आळवीत बसतो!”, गुळगुळीत डोक्यावरून हात फिरवत आबा दु:खी स्वरात म्हणाले, “देवानंदा सारखे, जे दुर्गेला भावले, ते जुल्फ आता आटले, सखे जुल्फ आता आटले!”
“देवानंद, चला जेवायला!”, दुर्गाबाई हसत म्हणाल्या.
- दिपाली पाटवदकर
शुभम भवतु म्हणणारा आवाज कायमचा थांबला: जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!..