गेल्या आठवड्यात मी कोथरूडमध्ये कुठेतरी चालले होते. जवळच जायचं होतं म्हणून रिक्षा पकडली. रिक्षाचालकाच्या सीटच्या वरच्या पट्टीवर नीट घडी करून ठेवलेले मराठी वृत्तपत्र दिसत होते. अश्या रिक्षात वृत्तपत्र ठेवणाऱ्या रिक्षावाल्यांशी राजकारणावर बोलायला मला आवडतं, कारण त्यांना देशात काय घडतंय हे माहिती तर असतंच त्यांचे स्वतःचे असे पक्के विचार असतात, ठाम मतं असतात. मी रिक्षात बसले म्हटल्यावर त्याने रेडियो लावला, कुठल्या तरी एफएम चॅनेलवर 'ऐ दिल है मुश्किल' ह्या वितरणापूर्वीच गाजलेल्या करण जोहरच्या सिनेमातलं 'बुलेया' हे गाणं लागलं होतं. त्या गाण्याचे दोन शब्द ऐकू येताक्षणी रिक्षावाल्याने खाट्कन कळ फिरवून चॅनेल बदललं. विविधभारतीचं एफएम लावलं.
'का हो, ते आधीचं गाणं का बदललं? तुम्हाला नवीन गाणी आवडत नाहीत का?'? मी विचारलं.
'ह्या पिक्चरमध्ये तो फवाद खान आहे मॅडम, त्याचे सिनेमे नाही बघायचे असं ठरवलंय ना आपून? ह्या पाकड्याना धडा शिकवायलाच पायजेल होता.' रिक्षावाल्याने मागे न बघताच मला उत्तर दिलं.
दोन दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप ह्याच्या ट्विटवरून प्रसार माध्यमांमध्ये जो गदारोळ झाला तो बघितल्यावर मला त्या रिक्षावाल्याचे शब्द आठवले. त्याच्या पुरता त्याने पाकिस्तानी कलाकारांचा प्रश्न निकालात काढलेला होता. सध्या करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा प्रसिद्ध होण्यापूर्वीच गाजतोय. २८ ऑक्टोबरला हा सिनेमा चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होणार होता, पण सिंगल स्क्रीन थिएटर असोएशन आणि सिनेमा ओनर असोएशन ह्या दोन चित्रपटगृह मालकांच्या संघटनांनी पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा ह्यात अभिनय असल्यामुळे हा चित्रपट आम्ही आमच्या चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होऊ देणार नाही असा एकमुखाने निर्णय घेतलाय.
'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट ऐश्वर्या राय, रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा इत्यादी बडी नावे असलेला चित्रपट आहे, गाणी सुश्राव्य आहेत आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन सारख्या दांडग्या प्रॉड्यूसरचं आर्थिक पाठबळ ह्या सिनेमाला आहे. त्यामुळे हा सिनेमा आम्ही दाखवणार नाही हा निर्णय खरं तर चित्रपटगृहांसाठी नुकसानदायकच आहे. तरीही आर्थिक झीज सोसून ह्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा निर्णय चित्रपटगृह मालकांच्या संघटनांनी स्वखुशीने घेतलाय ही गोष्ट खरोखरच विचार करण्यासारखी आहे. सध्या देशात एकूणच पाकिस्तान ह्या विषयावर वातावरण किती तापलंय, सामान्य नागरिकांच्या मनात पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांविरुद्ध किती चीड आहे हेच ह्या निर्णयावरून स्पष्ट होतं.
पण आपल्या तथाकथित कलेची झापडं ओढून बसलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या काही लोकांपर्यंत मात्र हा सामान्य जनतेमध्ये खदखदणारा असंतोष कधी पोचतच नाही. अनुराग कश्यप हा तथाकथित न्यू एज चित्रपटांचा दिग्दर्शक ह्यापैकींच एक. त्याने तर आपल्या ट्विटस द्वारे चक्क थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच याबद्दल जबाबदार धरलंय आणि दहा महिन्यांपूर्वी पंतप्रधांनानी पाकिस्तानला भेट दिली होती त्याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी आचरट मागणी अनुराग कश्यपने केली आहे.
ह्या चित्रपटावर सरकारने बंदी घातलेली आहे असा अपप्रचारही जाणून बुजून ट्विटरवरून केला जातोय. मुळात ह्या चित्रपटावर कोणीही बंदी घातलेली नाही. मला भेटलेल्या रिक्षावाल्यासारख्या अनेक सामान्य नागरिकांनी मात्र ह्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा आपला निर्णय उघड बोलून दाखवलाय. चित्रपटगृह मालकांच्या संघटनांनीही चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. अत्यंत शांततामय मार्गाने आणि लोकशाही पद्धतीने भारतीय जनता फवाद खानच्या उरी हल्ल्याविरुद्ध काहीही वक्तव्य न करण्याच्या कृत्याचा निषेध करत आहे. हा खरंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा किती मोठा विजय आहे? त्याबद्दल भारतीय जनतेचे कौतुक करायचे सोडून बॉलीवूड मधले काही बोलभांड कलाकार जाणून बुजून खोट्या बाता पसरवण्यात मग्न आहेत. मुळात ज्याला बंदी आणि बहिष्कार ह्या दोन शब्दांमधील मूलभूत फरक समजत नाही त्या माणसांनी ह्या विषयात बोलूच नये.
खरं तर अनुराग कश्यप काय बरळला ते सोडून द्या, पण खुद्द करण जोहरला मात्र भारतीय जनमत सध्या पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात आहे ह्याची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही जर सध्या टीव्ही वर दाखवण्यात येणारे 'ए दिल है मुश्किल' चे प्रोमोज आणि 'बुलेया' सारख्या गाण्याचे व्हीडियो पाहिले, चित्रपटाचे पोस्टर्स पहिले तर तुमच्या लक्षात येईल की करण जोहरने फवाद खानला जाणून बुजून वगळले आहे. 'बुलेया' ह्या गाण्याच्या अख्ख्या व्हीडीयोत फवाद खान फक्त एका फ्रेम मध्ये दिसतो, तो सुद्धा जेमतेम तीन सेकंद! हिंदी चित्रपट ही लोकाभिमुख कला आहे आणि जनमताचा आदर केला नाही तर काय होतं हे शाहरुख खानच्या मागच्या चित्रपटाचा जो बॉक्स ऑफिसवर सपशेल फज्ज्या उडाला त्यावरून दिसून आलेलंच आहे. अनुराग कश्यप सारख्या बॉलीवूडच्या बोलभांडांनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी त्याचा चित्रपटाला काहीही फायदा होणार नाही, उलट झालं तर नुकसानच होईल. सामान्य भारतीय चित्रपट प्रेक्षक भाबडा असला तरी मूर्ख नक्कीच नाही आणि देशद्रोही त्याहून नाही!
- शेफाली वैद्य