
देशभरात नुकताच विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या पार्श्र्वभूमीवर देशभरात एका वेगळ्याच प्रकारच्या ऊर्जेचा अनुभव घेता आला. नवरात्रींना जोडून येणार्या दसर्याच्या या उत्सवाला गालबोट लावणारी घटना उत्तरेत घडली. नवाजुद्दीन सिद्दिकी नावाच्या एका नटाला रामलीलेत कामकरण्यापासून रोखण्यात आले. तो केवळ मुस्लीम असल्याने त्याला रामलीलेत काम करू दिले गेले नाही. उत्तर प्रदेशातील बुधना या त्याच्या जन्मगावी साजर्या केल्या जाणार्या रामलीलेत ’मारिच’ राक्षसाची लहानशी भूमिका तो साकारणार होता. शिवसेनेच्या उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांनी त्याला रामलीलेत कामकरण्यापासून रोखले. त्यावर नवाजुद्दीनने दिलेले उत्तर त्याच्या मनाचा मोठेपणा दाखविणारे आहे. तो म्हणतो, ’’नट म्हणून माझा जो काही संघर्ष आहे त्यात अनेकदा माझी अशाप्रकारे अनेकदा संधी हुकली.’’ त्याने त्याच्याकडून या प्रकरणाला जातीय किंवा धार्मिक रंग दिलेला नाही. एक कलाकार म्हणून त्याच्या ठायी असलेली मूल्यव्यवस्था त्याला एक भान देते आणि त्यातूनच त्याच्या उदार प्रतिक्रियेचा साक्षात्कार होतो. ज्या पक्षाच्या लोकांनी त्याला रामलीलेत काम करण्यापासून रोखले, त्यांच्या मूल्यव्यवस्थेबद्दल काय लिहावे हा खरं तर प्रश्नच आहे. आक्रमकता हे या पक्षाचे मूल्य मानले, तर ते सध्या बुचकळ्यात असल्याचे लक्षात येईल. त्यांच्यासाठी ते हिंदुत्ववादी आहेत आणि नवाजुद्दीन मुसलमान. उत्तर प्रदेशात निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि ही त्यांना संधी वाटते.
विवेकबुद्धी असलेल्या कुणालाही ही घटना क्लेशकारक वाटावी अशीच आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक भारताची मूल्यव्यवस्था कोणती याचा शोध घ्यावा लागेल. सांस्कृतिक व पारंपरिक संचिताच्या मुळाशी जाऊन ही मूल्ये नक्कीच शोधावी लागतील. ज्या प्रकारच्या वैश्र्विक भारताची संकल्पना आजचे राजकीय नेतृत्व करीत आहे, त्या प्रकारच्या मूल्यव्यवस्थेचा शोध घ्यावा लागेल. अशी व्यवस्था आपल्याच पूर्वसंचितात सापडेल असा अट्टाहास धरण्याचे कारण नाही. परंतु, ती आपल्या संचिताच्या आधारावरच शोधावी लागेल, याबाबत मात्र दुमत नाही. व्यक्तीने, संस्थेने समाजाने प्रसंगोपात आपले वर्तन कसे ठेवावे याचे ज्ञान देणारी रचना म्हणून मूल्यांकडे पाहावे लागेल. व्यक्तिगत मूल्ये, सामाजिक मूल्ये व आपली राष्ट्रीय मूल्ये भिन्न असू शकतात, मात्र ती परस्परांना पूरक असली पाहिजेत. व्यक्तीची मूल्ये धर्माधिष्ठित किंवा अनुभवाच्या प्रचितीतून निर्माण होऊन ठाम झालेली असू शकतात, मात्र सामाजिक किंवा राष्ट्रीय मूल्यांचा विचार व्यक्ती या पातळीच्या वर उठूनच करावा लागेल. लोकसत्तेच्या उदयांची मीमांसा केली तर आपल्या लक्षात येईल की, जगभरात प्रस्थापित धर्मसत्तांच्या विरोधात संघर्ष करूनच काहींनी आपली राष्ट्रीय मूल्ये निश्र्चित केली आहेत.
’निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार’ या आपल्या पुस्तकात ज्येष्ठ विचारवंत ज. द. जोगळेकर यांनी आपापली राष्ट्रीय मूल्ये निश्र्चित करणार्या सात राष्ट्रपुरुषांची चरित्रे रेखाटली आहेत. ब्रिटिश सत्तेचा कालखंड व त्यानंतर सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संघर्षातून मिळालेले स्वातंत्र्य या प्रक्रियेतून एक नवा भारत उदयाला आला. आज आपल्याकडे जे काही होत आहे त्याची मुळेे कमीअधिक प्रमाणात याच प्रक्रियेत रूजलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर डावे, कॉंग्रेस व हिंदुत्ववादी असे तीन गट प्रामुख्याने या देशाची मूल्यव्यवस्था निश्र्चित करणारे म्हणून पुढे आले. नेहरूंचे समाजवादी मॉडेल पुरते गर्तेत गेले आणि नंतरच्या काळात सत्तेची मशगुलता एवढी होती की, सर्वधर्मसमभावाचे एक दिखाऊ मूल्य उच्चरवाने ओरडण्याचा परंतु ते अमलात न आणण्याचा पोरखेळ कॉंग्रेसने केला. अल्पसंख्याकांचे लांगुलचालन हे देखील याच वर्तनाचे अपत्य मानावे लागेल. अर्थात त्याची जबरदस्त राजकीय किंमतही कॉंग्रेसला मोजावी लागली. डाव्यांना शोषण आणि शोषित यांच्या पलीकडची मूल्ये कधीही समजली नाहीत; किंबहुना त्यांना ती पचविताही आली नाहीत. डांगे, दंडवते, रणदिवे यांच्यासारखे दिग्गज असूनही डाव्यांना इथल्या समाजमनावर कधीही पकड मिळविता आली नाही. डाव्यांचा भारत तर काही निराळाच होता. आजही जेएनयुमध्ये जे घडते ते याच संकुचित मूल्यव्यवस्थेचे प्रतीक आहे. शोषितांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचला पाहिजे, यात दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यासाठी सकारात्मक कार्यक्रमांची गरज असते. डाव्यांची संपूर्ण हयात प्रस्थापितांचा आणि नंतर संघ-भाजपचा द्वेष करण्यातच गेली. दसर्याला जेएनयुत मोदी आणि अमित शाह यांचे पुतळे जाळणे इतकीच यांची लायकी शिल्लक राहिली आहे. ज्या काही शिक्षणव्यवस्था आपल्याकडे निर्माण झाल्या, त्यातून काही मूल्ये नक्कीच पुढे आली, मात्र ती पुरेशी आहेत, असे म्हणायला सध्या तरी वाव नाही. १९४७ साली स्वतंत्र होऊन निर्माण झालेल्या लोकशाहीप्रधान भारताचे नीट निरीक्षण केले, तर असे लक्षात येईल की, इथली राष्ट्रीय मूल्ये शोधण्याचा व आचरणात आणून जपण्याचा जो काही प्रयत्न झाला तो १९२५ साली स्थापन झालेल्या रा. स्व. संघानेच केला आहे. विवेकानंद, योगी अरविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर या आणि अशा कितीतरी व्यक्तींनी ही राष्ट्रीय मूल्यरचना निश्र्चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघाचे प्रयत्न अधिक कृतिशीलतेकडे झुकलेले होते. आपल्या विविध आयामांच्या माध्यमातून ‘राष्ट्र प्रथम’ हे मूल्य मानून संघ पुढे जातच राहिला. संघाच्या स्वयंसेवकांनी ज्या राजकीय व्यवस्था निर्माण केल्या, त्याचाच परिणामम्हणून वाजपेयी व मोदी असे दोन सक्षमराजकीय पर्याय पंतप्रधानांच्या रूपाने देशाला मिळू शकले.
वाजपेयी प्रत्यक्ष लोकशाहीलाच एक मूल्य मानत होते. आपल्या एका भाषणात त्यांनी लोकशाहीला ’नैतिक व्यवस्था’ म्हटले आहे. या नैतिक व्यवस्थेची एक प्राणशक्ती आहे आणि ती न घटविण्याची जबाबदारीही आपली असल्याचे ते सांगतात. नरेंद्र मोदी एका नव्या भारताचे स्वप्न पाहात असल्याचे जाणवते. त्यांचे स्वप्न निश्र्चितच मोठे आहे. त्यांच्या स्वप्नातला रोमांच अनुभवता येण्याइतका सुस्पष्ट आहे. पण बेरोजगारी, आर्थिक विषमता, आरोग्य हे आणि असे कितीतरी जहाल प्रश्न सोडवतच पुढे सरकण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. राजकीय व्यवस्था लौकिक व भौतिक विकासाच्या मूल्यांची निर्मिती नक्कीच करू शकते. मात्र, या व्यवस्थेशी संवादी असलेल्या सामाजिक मूल्यांची निर्मिती करणारी रचनाही तितकीच महत्त्वाची आहे. हे एक वस्त्र आहे, ज्यात उभे धागे जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच आडवे धागेही महत्त्वाचे आहेत. काही महिन्यांपूर्वी टर्कीमध्ये लष्करी उठाव झाला. हा सत्तालोलुपतेतून झालेला उठाव नव्हता. टर्कीचे लष्कर केमाल अतातुर्कने घालून दिलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांमध्ये विश्वास ठेवते. केमालनी मोठ्या प्रयत्नाने इस्लामी मानसिकतेतून टर्कीला बाहेर काढले व आधुनिक राष्ट्र म्हणून उभे केले. मात्र, एर्देगान या सध्याच्या राष्ट्रप्रमुखाला धर्मनिरपेक्षतेतून येणारी मूल्यव्यवस्था कोरडी वाटते. पर्यायाने त्यांचा नैसर्गिक कल इस्लामकडेच आहे. इस्लामआला तर त्याला चिकटलेले दहशतवादाचे शेपूटही आपल्याकडे येईल आणि पुन्हा ‘राष्ट्र’ म्हणून आपली वाटचाल मध्ययुगाकडे सुरू होईल, अशी भीती लष्कराला वाटते. लोकशाही मूल्य मानणार्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी जे दोन उमेदवार लोकशाही व्यवस्थेतून पुढे आले आहेत त्या दोघांचाही दर्जा पाहिला, तर हा देश खरोखरच पुढच्या काळात जगाचे नेतृत्व करू शकेल का? अशी शंका उपस्थित होण्याला वाव आहे. हा सगळा कोलाहल पाहिला की व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांना एक स्तरावर आणून आधुनिक भारतासाठीच्या मूल्यांची निर्मिती करण्याची ऐतिहासिक जबाबदारी अजूनही शिल्लक आहे, असेच म्हणावे लागेल.