आकाशाशी जडले नाते - बदलते हवामान

    12-Oct-2016
Total Views |

Hi आबा!”, म्हणत सुमित चपला जागेवर ठेवून आत आला. आजीकडे दुधाची पिशवी देऊन त्याच्या आवडत्या खुर्चीत, उशी पोटाशी धरून बसला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सुमितने, “आता पुढची गोष्ट सांगा!” ची मागणी केली.

त्यासाठी पुनश्च अंतराळातून पृथ्वी पहायला लागेल. पण यावेळी फार दूर नको, आजचे निरीक्षण चंद्रावरून केले तरी चालण्यासारखे आहे.”, आबा म्हणाले.

चालेल चंद्रावर आता आपली एक observatory करू!”, सुमित म्हणाला.

तर सुमित, पहिली गोष्ट अशी की, पृथ्वी ज्या plane मधून सूर्याभोवती प्रवास करते, त्याला ecliptic म्हणतात. सगळे ग्रह साधारण याच plane मध्ये सूर्याभोवती फिरतात. त्यामुळे आपल्याला आकाशात सूर्य आणि इतर ग्रह एकाच मार्गाने जातांना दिसतात.

 

असो. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरायचा अक्ष या मार्गाला perpendicular नाही. आपला अक्ष perpendicular ला कलला आहे. या कलण्यामुळे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्यकिरणे वेगवेगळ्या तीव्रतेने पोचतात. सहा महिने उत्तरगोलार्धात अधिक तीव्र तर सहा महिने दक्षिण गोलार्धात अधिक तीव्र उन मिळते. यामुळे आपण उन्हाळा आणि हिवाळा अनुभवतो.

पृथ्वीचा कल जर फार कमी किंवा फार जास्त असता, तर आपले ऋतू अति उष्ण व अति शीतल झाले असते. अर्थात तसे झाले असते तर पृथ्वीवरची प्राण्यांची उत्क्रांती वेगळीच झाली असती!”

म्हणजे, पृथ्वीचा कल मनुष्य निर्माण करण्याकडे होता तर!”, सुमित म्हणाला.

खरे आहे सुमित! आपल्या जगण्याच्या बाबतीत, ज्या गोष्टी आपल्या गिनतीत सुद्धा नाहीत, त्या विश्वरचेत्याने किती काळजीपूर्वक करून ठेवल्या आहेत!

बर, आपण आपल्या मूळ मुद्याकडे वळू. या विश्वात काहीही स्थिर नाही. प्रत्येकात चैतन्य आहे. प्रत्येकाला गती आहे. तिथे या अक्षाने तरी का स्थिर असावे? पृथ्वीचा अक्ष चक्क डोलतो! त्याला कोणत्या गंधर्वाचे गाणे ऐकू येते, ते देवच जाणे! सध्या पृथ्वीच्या अक्षाचा कोन २३.५ अंश आहे. तो कोन कमी होत २२.१ अंश होउन, परत मोठा होत २४.५ अंश होतो.

 

अक्षाच्या २२.१ ते २४.५ ते परत २२.१ च्या एका फेरीला ४१,००० वर्ष लागतात!”, आबांनी अक्षाबद्दल माहिती सांगितली.

आज मला माझ्या मॅनेजरचे पटले - Change is the essence of life!”, सुमित म्हणाला, “आबा या डोलणाऱ्या अक्षाचा पृथ्वीवर काय परिणाम होतो?”

सूर्याची किरणे किती तीव्रतेने पृथ्वीवर पोचतात हे कक्षाच्या कोनावर अवलंबून आहे. किरणे जितकी जास्त तिरपी तितकी त्यांची तीव्रता कमी होते. जशी सकाळ संध्याकाळची किरणे. आणि किरणे जितकी perpendicular तितकी तीव्रता अधिक. मध्यान्हाच्या उन्हासारखी. हे चित्र पाहून तुझ्या लक्षात येईल – “

 

 

पृथ्वीच्या अक्षाचा कोन जसा वाढतो तसं पृथ्वीच्या ध्रुवीय भागावर अधिक तीव्र उन्ह पोचतात. आणि मग उन्हाळे अधिक उष्ण होतात तर हिवाळे अधिक थंड होतात. कोन कमी झाला की उन्हाळ्याची तीव्रता कमी होते, उन्हाळ्यात ध्रुवीय बर्फाची चादर संपूर्ण वितळत नाही. आणि मग पुढची थंडी आणखी मोठी बर्फाची चादर विणते.

सध्या हा कोन कमी होत आहे, त्यामुळे पृथ्वीचे तापमान कमी व्हायला हवे. पण मनुष्याने आपल्या अगाध करणीने Green House Gases तयार करून या नैसर्गिक चक्रात बदल केला आहे. त्यामुळे जरी तापमान कमी होणे अपेक्षित असले तरी सध्या ते वाढतांना दिसत आहे.”, आबा म्हणाले.

निसर्गाच्या या अफाट आणि अचाट नाटकात आपण विघ्न आणून स्वतःचाच घात करून घेतोय.”, सुमित निराशेने म्हणाला.

पहा बुवा सुमित शेठ, एक दिवस पुढच्या पिढीकडे पृथ्वी handover करायची वेळ येईल, तर आजपासून सायकलने फिरण्याचे करा! चला, आता चंद्रावरून डोलणारी पृथ्वी पाहून झालीये, तर परत घरी जाऊ.”

अहो! येतांना चंद्राला तेवढा दुधाचा नैवेद्य दाखवूनच या म्हणते मी! म्हणजे पृथ्वीवर अवतरलात की कोजागिरीचे दूध पिता येईल!”, स्वयंपाकघरातून दुध आटवता आटवता दुर्गाबाईंनी चिमटा काढला!

 

- दिपाली पाटवदकर

 

 

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121