महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरला देव दिवाळी साजरी होईल...; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

30 Oct 2024 19:34:22
maharashtra assembly election
 

ठाणे :      दिवाळीत फटाके फुटतीलच पण आपले ॲटम बॉम्ब २३ नोव्हेबरला रोजी फुटणार असुन तीच आपली सर्वात मोठी देव दिवाळी असेल. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे शहरातील कोपरी विभागात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी संध्या’ या संगीतमय कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शवुन ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.




ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील अष्टविनायक चौकात मंगळवारी धनत्रयोदशी दिवशी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आलेल्या दिवाळी संध्या या संगीतमय कार्यक्रमात सादर झालेल्या गाण्यांवर ठाणेकरांनी मनसोक्त फेर धरला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी लता शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय मोरे, मा.नगरसेवक राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, प्रवक्ते राहुल लोंढे, प्रकाश कोटवानी तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री शिंदे यांनी, दिवाळीचा सण हा आनंदाचा, उत्साहाचा सण असून आपल्या सर्वांना सुख, समृद्धी लाभावी अशी मनोकामना व्यक्त केली. आपण सर्वांनी संधी दिलीत म्हणून आमदार ते मुख्यमंत्री असा प्रवास करू शकलो. गेल्या दोन वर्षात राज्यातील सर्वसामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून जेवढे निर्णय घेता आले ते घेतले असल्याचे यासमयी नमूद केले. आता पुन्हा एकदा आपण नक्की संधी द्याल असा विश्वास व्यक्त केला. सध्या दिवाळीत फटाके फुटतीलच पण २० नोव्हेंबर रोजी मतदानाला आपले ॲटमबॉम्ब फुटणार असून २३ नोव्हेंबर रोजी जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हा महायुती देव दिवाळी साजरी करणार, असा विश्वास व्यक्त केला.





Powered By Sangraha 9.0