पाश्चात्य देशांकडून निर्बंध, रशियाची विमानसेवा कोलमडली; भारताला 'कॅबोटेज' कराराचा प्रस्ताव!
30-Oct-2024
Total Views |
मुंबई : रशिया सद्यस्थितीस पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा सामना करताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने भारतीय एअरलाइन्सला आपल्या देशात देशांतर्गत उड्डाणे चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियन एअरलाईन्स देशांतर्गत मागणी पूर्ण करु शकत नसल्याने भारताकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. रशियाने या समस्येचे निराकरण करण्यासाठी 'कॅबोटेज' कराराचा प्रस्ताव दिला आहे.
दरम्यान, 'कॅबोटेज' कराराच्या माध्यमातून परदेशी विमान कंपन्यांना रशियामध्ये उड्डाणे चालवता येतील, असे द इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत, चीन आणि काही मध्य आशियाई देशांना हा प्रस्ताव महिनाभरापूर्वी देण्यात आला होता. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेत यावर चर्चा झाली होती. पाश्चात्य निर्बंधांमुळे, रशियन विमान कंपन्यांना अमेरिकन आणि युरोपियन देशांकडून आवश्यक भागांच्या पुरवठ्यात निर्बंध लावले आहेत.
युरोपियन देशांकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रशियाला विमाने आणि आवश्यक भागांच्या पुरवठ्यात अडचणी येत आहेत. याचा परिणाम म्हणजे रशियाची देशांतर्गत विमान सेवा प्रभावित होत आहेत. या पाश्चात्य निर्बंधांदरम्यान रशियाने देशांतर्गत उड्डाणांसाठी भारतीय विमान कंपन्यांची मदत घेतली आहे.
भारत-रशिया व्यापारी संबंध
मात्र, या निर्बंधानंतरही भारत आणि रशियामधील व्यापारी संबंध मजबूत आहेत. रशियन विमान कंपन्यांना त्यांची उड्डाणे चालवण्याची परवानगी देणाऱ्या काही देशांपैकी भारत एक आहे. युरोपियन आणि अमेरिकन एअरलाईन्सच्या तुलनेत कमी उड्डाण वेळेचा फायदा देत एअर इंडिया रशियन एअरस्पेसच्या मदतीने उड्डाणे चालू ठेवते.