सिद्धहस्त लेखिकेचा यथोचित गौरव!

    03-Oct-2018
Total Views | 237



‘एक होता कार्व्हर’ या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांना आज अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा ‘स्नेहांजली’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यशैलीचा अल्पपरिचय करुन देणारा हा लेख....

 

आपण पहिल्यांदा वाचन सुरू करतो तेव्हा एखादे उत्तम पुस्तक हाती येणे, ही मोठी भाग्याची गोष्ट असते. अशी पुस्तके आपल्याला वाचनाचा लळा लावतात आणि त्यातूनच आपली जडणघडण होते. केवळ वाचक म्हणूनच नाही, तर व्यक्ती म्हणूनही आणि नागरिक म्हणूनही. ‘एक होता कार्व्हर’ हे असेच एक पुस्तक. ते माझ्या हातात आले तेव्हाच त्याच्या अनेक आवृत्त्या येऊन गेलेल्या होत्या. वाचकांवर जी मोहिनी या पुस्तकाने घातली होती, ती तेव्हाही कायम होती. आधी एका बैठकीत हे पुस्तक वाचून काढले आणि त्यानंतरही या पुस्तकाची पारायणे होत राहिली. इतकेच नाही, तर आमच्या मित्रमंडळीत पुस्तकप्रेमी अशा मित्रांनी एकमेकांना अक्षरश: गळ घालून हे पुस्तक वाचायला लावले. गुलाम म्हणून जन्माला आलेले, परंतु स्वकर्तृत्वावर वनस्पतिशास्त्रज्ञ, शिक्षक आणि संशोधक म्हणून मान्यता पावलेले जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे हे चरित्र. एका आईने आपल्या मुलांना झोपताना सांगितलेल्या कथांमधून हा चरित्रग्रंथ आकाराला आला. हळूहळू वीणा गवाणकर यांचा अन्य पुस्तकांतूनही परिचय होत राहिला. वीणा गवाणकर यांचा जन्म पुण्याजवळच्या लोणी काळभोर येथील, ६ मे १९४३ रोजीचा. त्यांचे वडील पोलीस खात्यात होते. त्यामुळे त्यांच्या वारंवार बदल्या व्हायच्या. त्यामुळे वीणाताईंचे शालेय शिक्षण एका ठिकाणी न होता विविध ठिकाणी झाले. महाविद्यालयीन शिक्षण मात्र त्यांनी पुण्यात फर्ग्युसनमध्येच केले. त्या मुळात ग्रंथपाल. मात्र, ग्रंथपालांच्या पठडीपेक्षा वेगळ्या. त्या स्वत: उत्साही वाचक आहेत. त्यामुळे ती त्यांची नोकरी न बनता छंद होता. त्यामुळे त्यांनी भरपूर वाचन केले.
 

‘कार्व्हर’ची पहिली आवृत्ती १९८१ साली प्रकाशित झाली आणि त्याने इतिहास रचला. आज या पुस्तकाच्या ४२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. हा आकडाच या पुस्तकाच्या लोकप्रियतेबाबत सर्व काही बोलून जातो. ‘कार्व्हर’ची लोकप्रियता पाहता त्याच्या आवृत्त्यांचे अर्धशतक येत्या काही वर्षांतच पूर्ण होईल, याची खात्री वाटते. काही वर्षांपूर्वी त्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला. एखाद्या मराठी पुस्तकासाठी हा दुर्मिळच योग म्हणायला हवा. तरुण आणि प्रौढ वाचकांना तर या पुस्तकाने मंत्रमुग्ध केले आहे. लाखो पालकांनी आपल्या मुलांना हे पुस्तक वाचायला लावले आहे आणि लावलेच पाहिजे. या पुस्तकाची संस्कारक्षमताच तशी अफाट आहे. सकारात्मकता आणि आशावाद याचे मूर्तिमंत चित्रण त्यात आहे आणि त्याला गवाणकर यांच्या सिद्धहस्त परंतु संयमी लेखणीची जोड मिळाली आहे. कुठेही शब्दांची उधळण नाही की अतिरंजित भावनाशीलता नाही. अगदी नेटके, मोजूनमापून आणि चपखल लेखन कसे करावे, याचा हा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक आहे. म्हणूनच गेली चार दशके त्या मराठी वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. वीणा गवाणकर यांनी वाचकांच्या किमान दोन पिढ्या घडविल्या आहेत. मराठीतील अन्य क्वचितच कोणा लेखिकेला हे श्रेय मिळेल. ‘एक होता कार्व्हर’नंतर गवाणकर यांचे नाव साहित्यजगतात स्थिर झाले. त्यानंतर डॉ. आयडा स्कडर, सर्पतज्ज्ञ रेमंड डिट्मार्स, पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली, महान क्रांतिकारक आणि कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे, जलतज्ज्ञ विलासराव साळुंके यांच्या जीवनावरही त्यांनी पुस्तके लिहिली आणि वाचकांनी त्यांनाही भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, गवाणकर यांचे नाव ‘कार्व्हर’शी अतूटपणे जोडलेले आहे.

 

कृषी, निसर्ग, पर्यावरण आणि पाणी या क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या तज्ज्ञांच्या चरित्रावर आधारित ललितलेखन त्या करतात. त्यांना तीन वेळा महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा धनंजय कीर पुरस्कार आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार एसएनडीटी विद्यापीठातर्फे २०१४ मध्ये ‘वूमन ऑफ दी इयर’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. पर्यावरण साहित्य संमेलनाच्याही त्या अध्यक्ष होत्या. अशा या लेखिकेला अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा ‘स्नेहांजली पुरस्कार’ मिळत आहे. साहित्यजगतातील मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार या निमित्ताने एका सर्वार्थाने योग्य व्यक्तीला मिळत आहे. यानिमित्ताने त्यांचे अभिनंदन करतानाच त्यांच्या हातून आणखी उत्तमोत्तम साहित्यसेवा घडत राहो, ही शुभेच्छा!

- देविदास देशपांडे 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...