श्रीलंका बॉम्बस्फोट : पर्यटनासाठी गेलेल्या जेडीएस सदस्यांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये रविवारी झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत २९० जणांचा मृत्यू झाला आहे तर ५०० हून अधिकजण जखमी झाले आहेत. या मृत व्यक्तींमध्ये पाच भारतीय व्यक्तींचा देखील समावेश असून जेडीएसच्या दोन नेत्यांचा देखील यात मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दोन जेडीएस नेत्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केजी हनुमंथरयप्पा, एम. रंगप्पा अशी मृत्यू झालेल्या दोन जेडीएसच्या नेत्यांची नावे आहेत.

 

"कोलंबोतील स्फोटांनंतर जेडीएसचे तेथे पर्यटनासाठी गेलेले ७ सदस्य बेपत्ता असल्याची माहिती मला मिळाली होती. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतेच स्पष्ट केल्याने मला धक्काच बसला आहे. हे दोघेही माझ्या चांगल्या परिचयाचे होते. या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आम्ही त्यांच्यासोबत आहोत." असे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

 

"श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन कन्नड नागरिकांचा समावेश आहे. के. जी. हनुमंतरायाप्पा आणि एम. रंगप्पा अशी या दोघांची नावे असून ते जेडीएस नेते आहेत. इतर तिघांची नावे लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर, रमेश अशी आहेत. त्यांची ओळख पटविण्यात आली आहे." अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे दिली आहे. कोलंबोतील तीन चर्च आणि तीन हॉटेल्समध्ये झालेल्या या आठ साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २९०वर पोहोचला आहे. यामध्ये ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@