जोशीबुवांचे तर्कट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |


वस्तुत: श्रीपाद जोशी ही व्यक्ती नसून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात निर्माण झालेली प्रवृत्ती आहे. स्वत: आपल्या कळपाच्या आधारावर झुंडशाही उभी करायची, आपल्या कंपूबाहेरच्या लोकांना जागा द्यायची नाही आणि मग असहिष्णुतेची कोल्हेकुई करीत राहायची, अशी ही एक नवपरंपरा महाराष्ट्रात रुजली आहे. एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा, अशी ही सगळी माणसे आहेत.

 

मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला. कालच्या आमच्या संपादकीयात आम्ही तशी जाहीर मागणीही केली होती. साहित्य संमेलनाला आपल्या घरच्या गोठ्यातील गाय मानणार्‍या श्रीपाद जोशींसारख्या व्यक्तीने राजीनामा दिला, हे बरेच झाले. साहित्य रसिकांची साहित्य संमेलनाकडून अत्यंत माफक अपेक्षा असते. ती म्हणजे, त्यांना सकस साहित्य वाचायला मिळावे आणि साहित्य संमेलनासारख्या शारदीय उत्सवात काही तरी उत्तम घडावे. आता इतकी माफक अपेक्षाही पूर्ण करता येत नसेल आणि त्याउपर असले उफराटे उद्योग करावे लागत असतील तर अशा मंडळींनी इतक्या महत्त्वाच्या पदावर जाऊन का बसावे? खरे तर ज्या कारणासाठी साहित्य संमेलन सुरू झाले, तो उद्देश मागे पडून राजकीय पाठीराख्यांच्या जीवावर आपले झेंडे मिरविण्याचेच प्रकार गेली काही वर्षे सुरू आहेत.

 

तू अधिक पाताळयंत्री की मी?’ असाच निकष लावून या परिषदा आणि आयोजक संस्था माणसे भरती करतात की काय, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. जोशी राजीनामा दिल्यानंतर पोपटासारखे भरपूर बोलले, पण आपण नयनतारा सहगल यांच्याकडे विनवण्या करायला का गेलो होतो? कोणाच्या सांगण्यावरून गेलो होतो? हे मात्र त्यांना सांगायचे नाही. त्यांनी जी काही पोपटपंची केली ती नयनतारा सहगलांच्या भाषणाचीच नक्कल होती. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द झाल्याबरोबर त्यांची मुलाखत प्रसिद्ध होते. त्या भाषणात काय आणि भाषणाव्यतिरिक्त काय, त्या जे जे काही बोलतात त्यात फारसा फरक नसतो. हा सगळाच पूर्वनियोजित डाव असल्यासारखे वाटते. फरक एवढाच पडतो की, कुणीतरी संमेलन उधळण्याची धमकी देते आणि या सगळ्यांचे अवसानच गळते. हा सगळाच मामला कळसूत्री बाहुल्यांचा वाटतो. नयनतारा सहगल काय किंवा श्रीपाद जोशी काय, यांना आपली राजकीय मते असण्याचा अधिकार आहेच आणि त्याचा अवाजवी उपयोग करताना आपण गेले अनेक दिवस पाहातच आहोत. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मात्र आपल्या राजकीय मतांसाठी वापरू नये. शिखांचे हत्याकांड, काश्मिरी हिंदूंची ससेहोलपट, गोध्य्रात जिवंत जाळलेले रामभक्त यापैकी कुठल्याही घटनेविरोधात या मंडळींनी एक अवाक्षर काढलेले नाही. न काढल्यास हरकतही नाही कारण, या मंडळींकडून तशी अपेक्षाही ठेवता येणार नाही. एरव्ही सगळीकडेच ही मंडळी आपल्या द्वेषाच्या ओकार्‍या काढत फिरत असतात. पण, साहित्य संमेलन तरी त्यांनी सोडावे.

 

राजीनामा नाट्यानंतर माध्यमांशी श्रीपाद जोशी जे बोलले, ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलता आले नाही तेच. वस्तुत: श्रीपाद जोशी ही व्यक्ती नसून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात निर्माण झालेली प्रवृत्ती आहे. स्वत: आपल्या कळपाच्या आधारावर झुंडशाही उभी करायची, आपल्या कंपूबाहेरच्या लोकांना जागा द्यायची नाही आणि मग असहिष्णुतेची कोल्हेकुई करीत राहायची, अशी ही एक नवपरंपरा महाराष्ट्रात रुजली आहे. एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा, अशी ही सगळी माणसे आहेत. आपण काठाला लागतोय, असे लक्षात आले की फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध अशांचे स्मरण यांना व्हायला लागते. श्रीपाद जोशींचेही तेच झाले. जात, विचारसरणी, वर्ग या सगळ्याचाच वापर मग ही मंडळी करायला लागतात. जातीच्या पलीकडे गेलेल्या अरुणा ढेरेंसारख्या विद्वान व्यक्तीची जात काढली गेली, हे यातल्या कुणालाही खटकले नाही. पुरोगामी महाराष्ट्राची तुणतुणी वाजवत फिरणार्‍यांनी यावर एकही अक्षर काढले नाही. ‘अभिजन विरुद्ध बहुजन’ असाही कांगावा झाला. या सगळ्या सावळ्या गोंधळात खरी कुचंबणा झाली आहे, ती आता बहिष्कारवाल्यांची. ‘मला बी जत्रंला येऊ द्या की...’ गाण्यातल्या पेंद्यासारखी यांची स्थिती झाली आहे.

 

साहित्य संमेलन यशस्वी होण्याची, मोठ्या संख्येने लोक येण्याची सुचिन्हे सगळीकडे दिसत आहेत. आता या भल्यामोठ्या माध्यमांच्या खुजा संपादकांनी काय करायचे हाच मोठा प्रश्न आहे. संमेलन अव्हेरून तर चालणारच नाही. नयनतारा सहगल, श्रीपाद जोशी अशी सगळीच प्रकरणे एक एक करून आपली आपणच निकालात निघाल्याने संपूर्ण लक्ष आता डॉ. अरुणा ढेरेंच्या भाषणावरच आहे. पहिल्या दिवसापासून साहित्य संमेलनाचे माध्यम वापरून मोदींसाठी खड्डे खोदणारे लोक आता स्वत:च त्या खड्ड्यात पडले आहेत. साहित्य संमेलनासाठी नवा उद्घाटक शोधण्याची वेळ या मंडळींवर आता आली आहे. आपल्या पापाचे खापर अलगदपणे अरुणा ढेरेंच्या, मुख्यमंत्र्यांच्या आणि मदन येरावारांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करून नामानिराळे राहण्याची यांची कल्पनाही फसली आहे.

 

इतके सारे डाव फसूनहीमला राजीनामा देण्याची वेळ आली, संमेलनाच्या उद्घाटकाला येता आले नाही, अशी स्थिती कुणामुळे आली, याचा शोध महाराष्ट्राने घ्यावा आणि माझ्यापर्यंतही पोहोचवावे.” अशी पोरकट विधाने या महाशयांनी केली. आता यांच्यासाठी पत्रकारांनी शोधपत्रकारिता करायची का? बरे, त्यातून जे सत्य बाहेर येईल त्याच्या विरोधात कांगावा करण्याची संधीही हे लोक सोडणार नाही. साहित्य संमेलनाला आवर्जून हजर राहणार्‍या आणि साहित्यिकांचा ‘रमणा’ बाळगणार्‍या कुठल्या राजकारण्याचा याच्याशी संबंध आहे? अरुणा ढेरेंची निवड झाल्यापासून कोणत्या माणसाच्या नादी श्रीपाद जोशी लागले होते, हे त्यांनीच महाराष्ट्राला सांगावे, जेणेकरून अनेकांचे कष्ट वाचतील. इतके होऊनही आता अरुणा ढेरेंनी काय बोलावे यासाठी दबाव निर्माण करणार्‍यांनी ज्या काही कसरती गेल्या आठवड्याभरात केल्या त्याला तोड नाही. बाबासाहेब आंबेडकरांंचा वारसा सांगत काँग्रेसकडून खासदारकी मिळवलेले एक महाशय आता रानडेंचे अनुयायी झाले आहेत. शिसारी यावी, असा हा सगळा प्रकार आहे. आता एकच वाटते ते म्हणजे हे सगळे मळभ आटोपत चाललेले असताना, असे होत असताना विवेकाचा अस्सल सूर साहित्य संमेलनात उत्तम लागावा आणि महाराष्ट्राचा हा शारदीय महोत्सव यशस्वी व्हावा.

 

- किरण शेलार

संपादक

महा MTB

 

-

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@