वेळ गप्प बसण्याची नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |


 


आयोजकांच्या कचखाऊपणाची शिक्षा साहित्य संमेलनाला आणि साहित्य रसिकांना देणे सर्वस्वी चुकीचे आहे. यामागे कोण कोण? काय काय राजकारण खेळले, ते साहित्य रसिकांच्या समोर आले पाहिजे. साहित्य संमेलन यशस्वी करणे, हेच आपल्यासमोरचे आव्हान आहे.

 

यवतमाळ येथे होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जो काही धुरळा उडतोय त्याची जबर किंमत निर्मळ मनाने साहित्य संमेलनाला येऊ इच्छिणाऱ्या साहित्य रसिकांना मोजावी लागणार, असे चित्र आता निर्माण होत आहे. आता अध्यक्षांनाही यात ओढता येईल, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेल्यांनीच संमेलनाची जी काही लक्तरे फाडली त्यामुळे साहित्यरसिकांत वेदेनेचे वातावरण होतेच. डॉ. अरुणा ढेरेंच्या निमित्ताने साहित्य संमेलनाला एक कसदार व्यक्तिमत्त्व अध्यक्ष म्हणून लाभले व त्याचे बृहन्महाराष्ट्रात उत्साहाने स्वागतही झाले. या निवडीने साहित्य संमेलनाकडून चांगल्या मजकुराची अपेक्षा ठेवणाऱ्या सर्वसामान्य साहित्यप्रेमींच्या मनात आशा पल्लवित झाल्या होत्या. त्या विरून जाण्याची चिन्हेच आयोजक मंडळींमुळे दिसत आहेत. नयनतारा सहगल यांच्या येण्या न येण्याच्या निमित्ताने आता साहित्य संमेलनावरच बहिष्कार घालण्याची आणि ही सारस्वतीय परंपरा खंडित करण्याची मागणी अत्यंत क्लेषकारक असून त्याविरोधात बोलले पाहिजे, अभिव्यक्त झाले पाहिजे. ज्या कोणी ही भूमिका घेतली आहे, त्यांनी याचेही भान ठेवले पाहिजे की, असे करून आपण साहित्य संमेलन वादग्रस्त करण्याच्या कामालाच हातभार लावत आहोत. आज यवतमाळची स्थिती अशी आहे की, लोक उत्सुकतेने यायला सुरुवात झाली आहे. साहित्यप्रेमींच्या या उत्साहाला चांगल्या प्रकारे साहित्य संमेलन घडवून आणणे हाच प्रतिसाद असू शकतो.

 

मग मुद्दा उरतो तो आयोजकांचा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना सर्वाधिकार असतात, अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे. गेल्या काही वर्षांत साहित्यबाह्य मंडळींनी आपल्या राजकीय हेतूसाठी या निवडी ताब्यात घेतल्या होत्या. सर्वसामान्य रसिकांच्या भावनांना यात काही स्थानच नाही. दुर्गाबाई भागवत, पु.ल. देशपांडे यांसारख्या अन्य कितीतरी दिग्गजांना ज्या आसनावर विराजमान होताना आणि दीपस्तभांप्रमाणे झळकताना पाहिले तिथे सुमार दर्जाची माणसे जागा पटकावताना साहित्य रसिकांना पाहावी लागली. आयोजकांमधल्या अशा लोकांच्या बजबजपुरीमुळेच हे चित्र पाहावे लागले. या सगळ्या प्रक्रिया इतक्या कमी क्षमतेच्या लोकांच्या हाती गेल्या आहेत की, आपण काय करतो आणि त्याचे समाजात काय परिणाम होऊ शकतात याचेही त्यांना भान नाही. नयनतारा सहगल यांची उद्घाटक म्हणून निवड कोणी केली? वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांना दिल्लीहून यवतमाळला आणण्यासाठी राजी करायला कोण गेले होते? या खर्चाची जबाबदारी कोण उचलणार होते? या प्रक्रियेत कोणते साहित्यिक सहभागी होते? आणि कोण व्यक्ती या साऱ्यासाठी पुढाकार घेऊन हे नाट्य रचित होती? या प्रश्नाची उत्तरे सर्वसामान्य साहित्य रसिकांना मिळाली पाहिजेत. मराठी साहित्याचा, साहित्य संमेलनाच्या दर्जाचा घसरता आलेख सावरण्यापेक्षा राजकीय वाद घडवून आणण्याचे उद्योग करण्याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य मानले जात असेल, तर अशा विचाराला उत्तरही याच साहित्यसंमेलनात व्यासपीठावरून दिले जाणे आवश्यक होते. मात्र आयोजकांनी काही लोकांच्या पुंडशाहीला बळी पडून पळ काढला आणि नयनतारा सहगल यांनाआपण येऊ नये’ असे पत्र पाठविले. आता निरनिराळ्या अफवा पसरवून दबावाच्या कथा रचल्या जात आहेत. या पळ काढण्यातून स्वत:च्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याची त्यांची ताकद किती क्षीण आहे, हे समोर आलेच आहे पण एकंदरीत साहित्य संमेलनाच्या आयोजनासमोर या कचखाऊ मंडळींनी प्रश्नचिन्ह उभे करून ठेवले आहे. साहित्य संमेलन कुणासाठी? या प्रश्नाचे उत्तर,‘त्यात सहभागी होणाऱ्या सर्वसामान्य साहित्य रसिकांसाठी’ एवढेच असले पाहिजे. ही एवढी एक माफक अपेक्षा जर का आयोजक मंडळींना आणि महामंडळात भरलेल्या सुमार लोकांना पुरी करता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली करून नव्या पिढीसाठी वाट मोकळी करून द्यावी.

 

नयनतारा सहगल यांचे भाषण आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एक शेवटच्या मोजून अकरा ओळी सोडल्या तर हे भाषण खरोखरच राजकीय आहे. नयनतारा सहगल यांचे राजकीय विचार त्यांच्या अभिव्यक्तीचा भाग असू शकतो आणि तो सहिष्णूपणे मान्यही केला पाहिजे. या विचाराला उत्तरही विचारानेच दिले पाहिजे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण माध्यमाच्या हाती लागू न देणे, मात्र नयनतारा सहगलांचे भाषण अलगदपणे माध्यमांत सोडून देण्याचे नतद्रष्ट उद्योग कोण करीत आहे? हे आणि असे कितीतरी प्रश्न यातून निर्माण झाले आहेत आणि होत राहतील. ज्यांनी आयोजन करायचे त्यांनीच आपल्या हितसंबंधांसाठी केलेले उद्योग आणि आयोजकांची सुमार क्षमता लक्षात घेऊन सर्वसामान्य साहित्य रसिकांनीच आता पुढे आले पाहिजे. साहित्य संमेलन यशस्वी करायचे असेल तर बहिष्काराच्या कटाला बळी न पडता आपण सगळ्यांनी साहित्य संमेलन यशस्वी केले पाहिजे. साहित्य संमेलन ही आयोजन करणाऱ्यांची मक्तेदारी नसून साहित्य संमेलनाशी भावनिकरित्या जोडल्या गेलेल्या मंडळींचाही त्यावर हक्क आहे. कुणा मूठभर लोकांच्या आव्हानाला बळी पडून आयोजकांच्या मूर्खपणाची शिक्षा अध्यक्षांना देऊन चालणार नाही. मी साहित्य संमेलनाला जाणारच. तुम्ही जाणार आहात का?

 

- किरण शेलार

संपादक

महा MTB

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@