राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा चीनला 'दे धक्का'! चीनी वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर

09 Apr 2025 12:07:35
 
us imposes 104 percent tarrif on china imports
 
 
वॉशिंग्टन डी सी : (104 % Tarrif on China) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या काही प्रमुख निर्णयांपैकी एक म्हणजे नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क), याअंतर्गत अनेक देशांवर अतिरिक्त व्यापारी कर लादण्यात येणार आहे. चीनने ट्रम्प यांच्या व्यापार कराला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर अतिरिक्त कर लागू करण्याची भूमिका घेतली होती. परिणामी अमेरिकेने आता चीनवर ५० टक्के अतिरिक्त टॅरिफ दर लागू केला आहे. त्यामुळे चीनवर एकूण १०४ टक्क्यांचा टॅरिफ दर लागू झाला आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांमधून याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेने आधी चीनवर ३४ टक्के आयात शुल्क लागू केले होते. मात्र, अमेरिकेने चीनवर लादलेल्या या ३४ टक्के आयात शुल्कानंतर चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर ३४ टक्के आयात शुल्क लावण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर ३४ टक्के आयात शुल्क लावण्याच्या निर्णयावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'जर चीनने ८ एप्रिलपर्यंत ३४ टक्के कर लागू करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर अमेरिका चीनवर ५० टक्के अतिरिक्त कर लागू करेल', असा इशारा दिला होता.
 
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर देखील चीनने माघार घेण्यास नकार दिला. यानंतर आता ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का देत चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर १०४ टक्के इतका मोठा कर लादण्याची घोषणा केली आहे. मार्चमध्ये २० टक्के कर आणि गेल्या आठवड्यात ३४ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आज थेट ५० टक्के अतिरिक्त कर लादण्याच्या घोषणेमुळे चिनी आयातीवरील एकूण कर १०४ टक्क्यांवर पोहोचले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0