"मी मानसिक रुग्णालयात भरती होईन, पण बिग बॉस मध्ये नाही!"; कुणाल कामरा चा 'बिग बॉस'ला टोला!
09 Apr 2025 12:32:27
मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला सलमान खान यांच्या होस्टिंग असलेल्या 'बिग बॉस' च्या आगामी सिजनसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्याने ही ऑफर साफ नाकारत एक जोरदार टोला लगावला.
कुणालने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रिनशॉट शेअर करत हा प्रकार उघड केला. त्यात एका कास्टिंग डायरेक्टरचा मेसेज दिसतो, ज्यात लिहिलं आहे - "मी बिग बॉसच्या ह्या सिझनसाठी कास्टिंग बघत आहे आणि तुमचं नाव त्यात सुचवलं गेलंय. माहित आहे, हे कदाचित तुमच्या विचारात नव्हतं, पण हा एक वेगळाच प्लॅटफॉर्म आहे जिथे तुमचं खरं रूप लोकांसमोर येऊ शकतं आणि तुम्ही प्रचंड मोठ्या प्रेक्षकवर्गाला जिंकू शकता. काय वाटतंय? बोलूया का यावर?"
यावर उत्तर देताना कुणालने लिहिलं – "मी मानसिक रुग्णालयात भरती होईन, पण बिग बॉस मध्ये नाही!"
कुणालने ही ऑफर स्वीकारली नसली तरी त्याचा हा उपरोधिक आणि बोचरा प्रतिसाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, कुणाल कामरा सध्या एका विडंबनामुळे चर्चेत आहे, जे त्याने शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तयार केले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला तीन वेळा समन्स पाठवले, परंतु तो हजर झालेला नाही.
मद्रास उच्च न्यायालयाने त्याला अटक न करण्याचे अंतरिम संरक्षण दिले आहे. तसेच, कामराने बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली असून, त्याने आपल्या याचिकेत सांगितले आहे की हे खटले संविधानातील अनुच्छेद १९ (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) आणि अनुच्छेद २१ (जीवनाचा हक्क) चा भंग करतात.