मुंबई : ( ecosystem for investment in every district Devendra Fadanvis ) “महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागांत गुंतवणूक व्हावी, यासाठी ‘इकोसिस्टम’ तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी दिली.
वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्ड’ सेंटर येथे आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट २५ ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘इंडिया ग्लोबल फोरम’चे संस्थापक मनोज लढवा, ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन आदींसह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी नवनवीन प्रत्येक जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी ‘इकोसिस्टम’ संधी निर्माण करत आहोत.
जागतिक पुरवठा साखळीसाठीही सुविधा उपलब्ध करत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातसुद्धा महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. याशिवाय, जगभरातील तसेच देशातील महत्त्वाच्या उद्योग कंपन्या महाराष्ट्रात आहेत. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करत असून त्यासाठी कौशल्य विद्यापीठ कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. हरित व स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांवरही आम्ही भर देत आहोत.”
८५ टक्के सामंजस्य करार मार्गी
“राज्य सरकारने केलेल्या सामंजस्य करारातील 85 टक्के करार हे मार्गी लागत असून उर्वरित २० टक्के करार प्रत्यक्षात येण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. लवकरच हे करारही मार्गी लागतील. यासाठी उद्योगांना लागणार्या सर्व सुविधा, जमीन तसेच परवाने देण्याचे काम राज्य शासन वेगाने करत आहे,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
‘एमएमआर’वर विशेष लक्ष
“महाराष्ट्राला तीन ट्रिलियन डॉलर्स अर्थ व्यवस्था करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशाचे मोठे योगदान असणार आहे. एकट्या ‘एमएमआर’ क्षेत्रात १.५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था उभारण्याची क्षमता आहे. त्यामुळे या भागावर जास्त फोकस आहे. मुंबई ही ‘फिनटेक कॅपिटल’ असून नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार करत आहोत. या ठिकाणी ‘एज्युसिटी’, ‘इनोव्हेशन सिटी’ निर्माण होत आहे. ‘एज्युसिटी’मध्ये जगातील सर्वांत मोठे विद्यापीठ येण्यास उत्सुक असून पाच विद्यापीठे अंतिम होत आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार असून अटल सेतुमुळे विमानतळ व परिसराशी कनेक्टिव्हिटी वाढली आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. “देशातील सर्वांत मोठे बंदर वाढवण येथे होत आहे. तसेच समृद्धी महामार्गही या बंदराशी जोडले जाणार आहे. त्यामुळे या परिसरात चौथी मुंबई निर्माण होत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागांचा नियोजनबद्ध विकास
“मुंबई महानगर प्रदेशबरोबरच राज्यातील ग्रामीण भागासह, तर भागाच्या विकासावरही लक्ष देण्यात येत आहे. पुण्यात ऑटोमोबाईल, छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहन उद्योग हब होत आहे. तसेच गडचिरोली जिल्हा हा देशातील नवीन स्टील हब म्हणून उदयास येत आहे.
तर विदर्भात सोलर उत्पादन क्षेत्र वाढत आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे १५ जिल्ह्यांतील शेतकर्यांना, उद्योजकांना लाभ होणार आहे. नवीन प्रस्तावित शक्तिपीठ मार्गामुळे मराठवाड्याचा फायदा होणार आहे. शिर्डी, पुणे, नागपूर येथे विमानतळाचे काम सुरू आहे, तर दुष्काळमुक्तीसाठी सुमारे तीन लाख कोटींचे चार नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत असून विदर्भात कॅनॉलने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.