थांबायचं नाय आता थांबायचं नाय! मुंबईतील बचत गटाच्या महिला चालविणार प्रवासी रिक्षा

09 Apr 2025 21:36:38

Mumbai Passanger Auto
 
मुंबई (Mumbai passenger rickshaw) : मुंबईतील  बचत गटाच्या महिला आता प्रवासी रिक्षा चालविणार आहेत. मुंबई पालिका, ‘नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका’ अभियान आणि टीव्हीएस यांच्या संयुक्त विद्यमाने ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. मुंबई पालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण आणि सर्व प्रकारचे परवाने मोफत देण्यात आले आहेत.
 
दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, आमदार मंगेश कुडाळकर, पालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर आदींसह महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या रिक्षांचे वाटप करण्यात आले. कुर्ला येथील नेहरू नगरातील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी हा कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या ५० रिक्षांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ‘वुमेन्स ऑन व्हिल’ या महत्वाकांक्षी उपक्रम अंतर्गत या रिक्षांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला टिव्हीएसचे अधिकारी निशांत दास, अभ्युदय बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक प्रिती सावंत आदींसह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
 
मुंबईतील होतकरू महिलांचे आर्थिक सशक्तीकरणासाठी मुंबई महानगरपालिका महिलांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. त्यामुळे बचत गटांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो. त्याचाच एक भाग म्हणून आता महिलांना बँकांकडून कमी व्याजदरावर या रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या. या रिक्षांतून महिला प्रवाशी वाहतूक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, आवश्यक परवाने, रिक्षा नोंदणी बिल्ला इत्यादी सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. या ५० महिलांपैकी बहुतांश महिला या भांडूप आणि कुर्ला परिसरातील रहिवासी आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0