मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून फोन करून शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच घरी येऊन मारण्याची धमकीही या अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, संदीप देशपांडे यांनी या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
राज्यात सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदूविरोधी असून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेकडून करण्यात आली होती. यावर मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली होती.
त्यानंतर मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने संदीप देशपांडेंना फोन करून शिवीगाळ केली. या फोनची एक ऑडिओ क्लिप सध्या माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. याबद्दल बोलतानां संदीप देशपांडे म्हणाले की, "रात्री एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि तो नुसता शिव्या घालत होता. त्यानंतर पुन्हा कॉल आला तेव्हा तुम्हाला घरी येऊन मारू, असे बोलला. परंतू, अशा धमक्यांना मी घाबरत नाही," असे ते म्हणाले.