मुंबई : जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, ८ एप्रिल रोजी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला मुंबई महापालिका सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्यासह अन्य अधिकारी तसेच डॉ. असिम गोकर्ण हरवंश उपस्थित होते. दिनांक ३१ मे २०२५ रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा सुशोभीत आणि पुष्पमंडित पुतळा तयार करण्यात येत आहे. दरम्यान, दिनांक १५ मे च्या आत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशन जवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे दुरुस्तीकार्य तसेच पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य, महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार, वृक्षसंवर्धन इत्यादी बाबींचा देखावा आकर्षक स्वरुपातील प्रकाश योजनेसह मांडण्यात येणार आहे.