अक्षयतृतीयेस अयोध्येत स्थापन होणार राम दरबार!

    09-Apr-2025
Total Views |

 
( Ram Darbar in Ayodhya on Akshaya Tritiya )
 
नवी दिल्ली: ( Ram Darbar  in Ayodhya on Akshaya Tritiya ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात अक्षयतृतीयेस अर्थात ३० एप्रिल रोजी श्रीराम दरबाराची स्थापना करण्यात येणार आहे.
 
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपतराय यांनी बुधवारी अयोध्येतील कारसेवकपुरम येथे पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीराम दरबाराची स्थापना होईल.
 
त्यानंतर जूनमध्ये एक पवित्र तारीख निश्चित करून, सर्व मूर्तींचे अभिषेक केले जाईल. हा तीन दिवसांचा कार्यक्रम असेल. मुख्य दिवसाच्या दोन दिवस आधीपासून, जलवास, अन्नवास, औषधाधीवास, शय्यवास यासारख्या अनिवार्य धार्मिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, असे ते म्हणाले.
 
मंदिरातील अन्य मूर्त्यांचेही काम अंतिम टप्प्यात असल्याचे चंपतराय यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, साधारणपणे १५ एप्रिल नंतर मूर्त्या आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये सप्तमंडपातील महर्षी वाल्मिकी, गुरु वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषादराज, शबरी, अहिल्या आदींच्या मूर्ती तयार होणार आहेत. कपडे आणि दागिने बनवले जात आहेत. अन्नपूर्णा, हनुमान आणि किल्ल्यावरील शिव यांच्यासह सर्व सहा मंदिरांच्या मूर्ती देखील आणण्यात येणार असल्याचे चंपतराय यांनी नमूद केले आहे.